Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

प्रजापतिसंस्था बहुसंख्य झाल्याचे एकच शाब्दिक प्रमाण येथे देतो. कुटुंबाच्या मुख्य धन्याला प्रजापती हे जसे नामाभिधान मिळाले, तसेच प्रजापतीपासून झालेल्या प्रजेला प्रजा व प्रज हे नाव मिळाले. हा प्रज व प्रजा शब्द इतका प्रसिद्ध आहे की, दोनचारशे वर्षांपलीकडील जुन्या मराठी कागदपत्रांत शेतकरी या अर्थाने प्रज शब्द वापरलेला आधुनिक इतिहाससंशोधकांच्या चांगला परिचयाचा आहे. ऋग्वेदात ज व प्रज हे शब्द येतात, हेही सांगावयाला नकोच. देशातल्या देशात राहून प्रजापतिक कुटुंबस्थापकांचा हा पहिला मार्ग झाला. तिसरा मार्ग स्वदेशत्याग करून दूरदेशी वसाहत करणा-यांचा. ह्या दूरदेशी वसाहत करणा-यांचा उल्लेख हरिवंशाच्या तिस-या अध्यायात आलेला आहे. दक्षप्रजापतीला वरिणप्रजापतीची मुलगी असिवकी इच्या पोटी पाच हजार पुत्र झाले. त्यांना बेसुमार प्रजावृद्धी करण्याच्या नैसर्गिक छंदात निमग्न होण्याच्या बेतात असलेले पाहून, नारदाने अर्थशास्त्रीय उपदेश करून दूरदेशी घालवून दिले. नारद म्हणाला, तुम्ही प्रजावृद्धी करू इच्छिता खरे, परंतु वर्धमान प्रजेला अन्न पुरविण्याचे पृथ्वीला सामर्थ्य कितपत आहे ते प्रथम पाहा आणि मग प्रजावृद्धीच्या उद्योगाला लागा. नारदाचा हा उपदेश त्या पाच हजार पुत्रांना पटला व ते दूरदेशी जे अन्नशोधार्थ गेले ते पुन्हा परत आले नाहीत; बहुधा जिकडे गेले तिकडेच वसती करून कायमचे राहिले. अशा युक्तीने पाच हजार पुत्रांची वासलात लागल्यावर दक्षाने असिवकीच्या ठायी पुनः एक हजार पुत्र उत्पन्न केले, त्यांचीही वाट पूर्वीच्याचप्रमाणे नारदांनी लाविली. मूळ आर्य लोकांची फाटाफूट होऊन पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे व उत्तरेकडे रशिया, जर्मनी, इटली, ग्रीस, हिंदुस्थान, तिबेट इत्यादी पृथ्वीभागात आर्य लोक अतिप्राचीन काळीं जे पसरले त्या प्रसाराचा हा इतिहास आहे. विदेशगमनाच्या तिस-या मार्गाचा हा असा पौराणिक तपशील आहे. पहिल्या व तिस-या मार्गाचा खुलासा झाल्यावर, दुसरा मार्ग अविवाहित राहून अरण्यवास पत्करणा-यांचा. त्याचा आता परामर्श घेऊ. युक्तीने प्रजापतीच्या कुटुंबातील चार स्त्रियांना भुलवून स्वदेशातल्या स्वदेशात स्वतंत्र व विभक्त निराळीं कुटुंबे स्थापण्याचे कौशल्य व करामत ज्यांच्या अंगी होती ते स्वदेशातच राहिले आणि ज्यांच्या अंगात विशेष धाडस व साहस होते त्यांनी परदेश पत्करला; परंतु भिडस्त व पापभिरू स्त्रियांशी विशेष लगट करण्याचा ज्यांना सौजन्यामुळे कंटाळा, प्रजापतीशी भांडण तंटा करण्याचा ज्यांचा मूळ स्वभाव नव्हे, असे जे थोडे सत्त्वशील पुरुष होते त्यांनी प्रजापतींच्या कुटुंबातून कोणालाही न दुखविता, देशातील निर्जन अरण्ये व गिरिकंदरे व नदीतटाके यात कुट्या व आश्रम करून राहण्याचा बिनबोभाट मार्ग स्वीकारला. हरिवंशाच्या पहिल्या अध्यायात ब्रह्मदेवाचे सनकसनंदनादि जे सात पुत्र सांगितले आहेत ते या सत्त्वशील वर्गापैकी अत्यंत पुरातन व इतिहासात दाखल झालेले पाहिले होते.