Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(६) मित्राला अगर अतिथीला ऊर्फ पाहुण्याला दासी किंवा स्वस्त्री आदराने समर्पण करण्याची चाल सुदर्शनाच्या कालापासून तो पाणिनीच्या कालापर्यंत एका प्राचीनतम चालीचा अवशेष म्हणून राहिलेली आहे. प्राचीनतम रानटी टोळ्यांत स्त्री हा अर्थ इतर गाई, बैल, घर इत्यादी जिनगीप्रमाणे मालकाच्या म्हणजे पुरुषाच्या मालकीचा समजत असत. स्त्री ह्या वस्तूचा जिनगीत समावेश होत असे. अगदी अलीकडील जो कालिदास तो “ कन्या हि अर्थों परकीय एव" असे म्हणताना स्त्रियांना पर्यायाने अर्थात म्हणजे जिनगीत गोवितो. जिनगीचा म्हणजे मालकीच्या वस्तूचा मालक वाटेल तो विनियोग करू शकतो. म्हणजे विकणे, मारणे, ठार करणे, दान देणे, घालवून देणे, इत्यादी चाहेल तो विनियोग स्त्री या अर्थाचा रानटी माणूस करू शके. स्त्री हा जिन्नस मालकीचा समजला गेल्यावर तिला मित्रास किंवा आदरणीय पाहुण्यांस संभोगार्थ देऊन टाकण्याचा अधिकार सहजच उत्पन्न होतो.

(७) स्त्रियांवर पुरुषाची मालकी केव्हा उत्पन्न झाली ? मनुष्य हा पशुकोटीतील प्राणी आहे व त्याचे अगदी जवळचे सगेसोयरे पशू म्हटले म्हणजे वानर होत. वानरांतील हुप्या इतर लहानमोठ्या वानरांना मारून किंवा हाकलून कळपातील सर्व माद्यांवर प्रजापतित्वाचा हक्क बजावतो. म्हणजे हुप्या बहुपत्नीक असतो. पाशवदशेत माणूसही बहुपत्नीक असावा असे उपमानप्रमाणाने म्हणावे लागते. पुढे कालांतराने लढाया, मारामा-या, मित्रत्व इत्यादी कारणांनी पाशव दशेतील बहुपत्नीक माणसांच्या स्वसंरक्षणार्थ जूट, जमाव किंवा टोळ्या झाल्या. या टोळ्यांत सर्व नर सर्व माद्यांचे म्हणजे सर्व पुरुष सर्व स्त्रियांचे मालक बनले. टोळीतील सर्व स्त्रिया सर्व पुरुषांना सारख्याच उपभोग्य झाल्या. समजा की टोळींतील एखादा पुरुष किंवा काही पुरुष कोणत्याही कारणाने दूरदेशात परागंदा झाले, आणि कालांतराने पुनः स्वतःच्या टोळीची व त्यांची गाठ पडली, तर ह्या पाहुण्यांना टोळींतील स्त्रियांशी शरीरव्यवहार करण्यास कोणतीच अडचण टोळीतील स्त्रीपुरुष समाजाकडून पडणार नाही; कारण पाहुणे आपल्याच टोळीपैकी आहेत, अशी भावना असते. मुळात पाशव माणूस बहुपत्नीक होता. तो टोळ्या करून राहू लागल्यावर बहुपत्नीकत्व व बहुपतित्व टोळ्यांत उत्पन्न झाले. अशा समाजात पुढे आवडनिवड उत्पन्न होऊन मिथुनधर्माने राहण्याची चाल आस्ते आस्ते मागे पडली, परंतु नैसर्गिक पुराणप्रियतेमुळे पूर्वीची बहुपत्नीत्व ही चाल एकाएकी मोडवेना. सबब, जुना मित्र किंवा परागंदा झालेला दूरदेशस्थ पाहुणा आल्यास त्याला स्वतःची नवीन मिथुनधर्मस्थ स्त्री जुन्या यूथधर्मातील सामान्य पतित्वाच्या चालीला मान देऊन आदराने समर्पण करण्यात लोक भूषण व संभावितपणा मानू लागले. ही चाल पाणिनीपर्यंत व पेशवाईपर्यंत थोडीफार अवशिष्ट राहिली. समाजशास्त्रांतील एक नियमच आहे की, चाली मरता मरत नाहीत, मोठ्या पराकाष्ठेच्या चिवट असतात.