Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
बलिष्ठ प्रजापतींच्या अरेरावी व आपलपोट्या जुलमाने अपत्नीक रहाण्याचा दुर्धर प्रसंग ज्याच्यावर ओढवतो अशा लोकात धट्ट्याकट्ट्या परंतु बिनवजन तरुणाखेरीज पंगू व दुबळ्या लोकांचा समावेश होतो. पैकी पंगू व दुबळे दैवगतीने अनन्यगतिक असल्यामुळे त्यांच्या हातून रानावनात व गिरिगव्हरात जाऊन राहण्याचा खडतर मार्ग अवलंबिला जाणे संभाव्य सुद्धा नाही. सबब, उत्साही परंतु सत्त्वशील व पराक्रमी परंतु इंद्रियनिग्रही असे जे थोडे तरुण लोक ऋषिलोकांच्या प्राजापतिक समाजात असत त्यांनी हा ब्रह्मचर्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. भारतेतिहासकार जे व्यास त्यांनी सनकननंदनादी सातांचाच जरी ग्रंथारंभी प्रामुख्याने उल्लेख केला आहे व तोही प्रजापतिसंस्थेच्या अनुषंगाने केला आहे, तत्रापि ह्या सनकसनन्दनाच्याही फार पूर्वीच्या प्राचीन काळापासून अपत्नीक अशा ब्रह्मचा-यांची परंपरा चालत आलेली आहे. इतकेच की, जुलमी प्रजापतीच्या काळी ही संस्था विशेष उठावाने लोकांच्या नजरेत भरू लागली. शिवाय सनकसनंदनादी योगसंपन्न पुरुष प्रजापतिकाली उत्पन्न जे झाले ते एकाएकी आकाशातून ज्ञान घेऊन पृथ्वीवर उतरले अशीही विपरीत समजूत करून घेण्यात समंजसपणा नाही. ज्ञानाची व योगाचा कित्येक पिढ्यांची काहीतरी पूर्वपरंपरा असल्याबिगर, सनकसनंदनासारखे योगी व ज्ञानी निपजत नसतात. तात्पर्य, ब्रह्मचर्यसंस्था प्रजापतिसंस्थेच्या समकालीनच नव्हे तर तीहून बरीच जुनी आहे. ब्रह्मचारी या शब्दाचा मूलार्थ ब्रह्मात चालणारा असा आहे. ब्रह्मात चालणारा म्हणजे घरदार सोडून मोठ्या व विस्तीर्ण जगात एकाकी भ्रमण करणारा. ब्रह्मन म्हणजे मोठे, ब्रह्मन म्हणजे समाजाच्या राहण्याच्या स्थलाहून मोठे असे जे अफाट पृथ्वीफलक ते ब्रह्मन. म्हणजे विस्तीर्ण व अमर्याद जग, त्यात संचार करणारा तो ब्रह्मचारी. जबरदस्त प्रजापतीच्या जुलमाने वैतागून जाऊन अफाट जगाचा ज्याने रस्ता सुधारला तो ब्रह्मचारी, घर सोडून अनिकेतन जो बनला म्हणजे प्राजापतिक कुटुंबाबाहेर जो पडला तो ब्रह्मचारी. ब्रह्मचारी अरण्यात व गिरिगव्हरात एकान्तात राहू लागल्याकारणाने, इतर जमावांशी मारामा-या, घरघुती तंटेबखेडे, स्त्रीसंबंधक मात्सर्यादी दोष, अन्नार्थ वन्य व ग्राम्य पश्वादींची हिंसा, पोराबाळांच्या पोटापाण्याची तरतूद करण्याची जबाबदारी इत्यादी काळज्यांतून मुक्त होऊन, त्यांना समाजाचे, लोकांचे व जगताचे चिंतन करण्याला मनमुराद अवधी व स्वास्थ्य मिळाले, आणि ह्या स्वास्थ्याचा आत्मानंदार्थ व लोकोपकारार्थ त्यांनी त्या त्या कालाला व परिस्थितीला अनुरूप असा चांगला उपयोग केला. ऋषिसमाजात ज्या ज्या म्हणून सुधारणा, जी जी म्हणून शास्त्रे व व जे जे म्हणून धर्म उदयास आले, त्यांचे त्यांचे आद्यप्रवर्तक हे ब्रह्मचारी तपस्वी लोक होते.