Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(३) सुदर्शनकालीन अतिथीला स्वस्त्रीसमर्पण करण्याच्या ह्या चालीला पुढे आस्ते आस्ते आळा पडल्याचाही दाखला भारतात नमूद आहे. शांतिपर्वाच्या २६६ व्या अध्यायात चिरकारीची कथा भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलेली पाहावी. चिरकारीचा पिता गौतम अन्यत्र गुंतला असता इंद्र गौतमाश्रमात अतिथी म्हणून आला आणि चिरकारीच्या मातेशी संभोग करून चालता झाला. हे वृत्त गौतमास कळल्यावर गौतमाने चिरकारीस आपल्या मातेचा वध करण्यास पहिल्या झटक्यासरशी सांगितले व आपण रागे रागे अरण्याचा रस्ता धरिला. इकडे मातेचा वध न करिता, चिरकारी तसाच राहिला, अरण्यांत राग शांत झाल्यावर गौतमाला स्वस्त्रीचा पुत्राने वध केला असेल या निश्चितीने फार वाईट वाटले. तो म्हणाला, अतिथिसमागमांच्या असल्या अस्पष्ट अपराधाकरिता स्त्रीचा वध करणे अधर्म्य होय. नंतर पश्चात्ताप होऊन घरी आल्यानंतर, पुत्राने स्त्रीस ठार मारिले नाही असे पाहून, त्या ऋषीने चिरकारीची प्रशंसा केली. ह्या गौतमाच्या कथेत व मागील सुदर्शनाच्या कथेत अंतर आहे. सुदर्शन व गौतम दोघेही अतिथीला स्वस्त्रीसमर्पण करणे हा धर्म समजतात; परंतु ह्या धर्माने सुदर्शनाला कृतकृत्यता वाटते, तर गौतमाला पहिल्या झटक्याला क्रोध येतो. विचारांती स्वस्त्रीने अतिथिधर्म पाळण्यात जे केले ते धर्म्यच केले असे गौतमाला वाटले. याचा अर्थ इतकाच की ही अतिथिपूजनाची चाल समाजांत किंचित् गर्ह्य समजली जाऊ लागली होती, परंतु ह्या चालीचा पगडा अद्याप व्हावा तितका शिथिल झाला नव्हता.