Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(२) दोघा जीवश्च कंठश्च मित्रांमध्ये स्त्रीविनिमय होणे जसे नीतिबाह्य समजत नसत तसेच अनोळखी अतिथीला स्वस्त्री किंवा स्वदासी देण्यात एकेकाळी धर्म समजत असत.
शांतिपर्वाच्या १६८ व्या अध्यायात गौतम नावाच्या ब्राह्मणाला अतिथिसत्कार म्हणून इतर वस्तूंबरोबर कोण्या शबराने एक गतभर्तृका दासी दिल्याचा वृत्तान्त आहे. कोणी सन्मान्य अतिथी आला असता, त्याला दासी देण्याची चाल भारतवर्षात पुरातन काळी सर्वसामान्य होती, व अलीकडे पेशवाईतही ही चाल प्रचलित होती. पेशवाईतील कित्येक सरंजामदारांत अतिथिसत्काराची अशी चाल होती म्हणून सांगतात की अतिथीची चंची तांबुलादी द्रव्यांनी नित्य भरून ठेवावयाची व सेवा करण्याकरिता रात्रौ एखादी ठेंगणी ठुसकी दासी अतिथीकडे पाठवावयाची. कृष्ण, अर्जुन इत्यादी अतिथींना दासी दिल्याचे उल्लेख अनेक आहेत. आता केवळ दासी अतिथीकडे पाठविण्यात विशेष मातब्बरी दिसत नाही; कारण दासी म्हणजे बोलून चालून गुलाम. परंतु घरधन्याने किंवा गृहस्थाने आपल्या यज्ञपत्नीला अतिथीची ग्राम्यधर्माने सेवा करण्यास सांगितल्याचाही दाखला भारतात पाहावयास मिळतो. अनुशासन पर्वाच्या दुस-या अध्यायात सुदर्शनाची कथा आहे. सुदर्शन आपली भार्या ओघवती हिला सांगतो की, "गृहस्थाश्रमधर्माने माझी वागावयाची प्रतिज्ञा आहे, सबब अतिथीला प्रतिकूल असे कोणतेही वर्तन तू करू नयेस; इतकेच नव्हे तर प्रसंगी स्वतःचे शरीरही अतिथीला देण्यास मागेपुढे पाहू नकोस." नव-याची ही आज्ञा बायकोने शिरसावंदन केली. पुढे लवकरच परीक्षेची वेळ आली. सुदर्शनाच्या गैरहजेरीत एक ब्राह्मण अतिथी आश्रमात आला. अर्घ्वपाद्यादिपूजा यथाविधी घेतल्यावर अतिथीने सुदर्शनस्त्रीस संभोगेच्छा असल्याचे दर्शविले, तेव्हा अतिथीचा अवमान करावयाचा नाही या धर्माने ओघवतीने ब्राह्मणाची इच्छा पूर्ण केली. इतक्यात सुदर्शनऋषि घरी परत आले व त्यांना हा आतिथ्यप्रकार कळला. तेव्हा आपण आज धन्य झालो असे त्यांनी उद्गार काढिले व आपल्या बायकोची पातिव्रत्यधर्माबद्दल पाठ थोपटली. पितामह भीष्म धर्मराजाला सांगतात की ह्या सत्कृत्यामुळे सुदर्शनाची कीर्ती भुवनत्रयांत अक्षय्य पसरली व त्याला इंद्रलोक प्राप्त झाला. एके काली स्वस्त्रीही अतिथीला अर्पण करण्याची चाल भारतीय आर्यात होती, याला या कथेतून दुसरा आधार धुंडाळण्याची जरूर नाही. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॉलिनेशिया, मोंगोलिया आणि इतर बहुतेक सर्व देशांतील प्राचीन व अर्वाचीन रानटी व सुधारलेल्या समाजातील अतिथिपूजनाची ही चाल प्राचीन भारतीय आर्यात व अनार्यातही आढळावी हे काही एका संस्कृतीतील मनुष्यस्वभावास अनुरूपच आहे.