Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
त्या प्राचीन काळी ब्रह्मचर्याखेरीज इतर कोणत्याही आश्रमाने इतके परिपूर्ण स्वास्थ्य मिळण्यासारखे नव्हते. ते स्वास्थ्य प्रजापतींच्या जुलमाने आर्य समाजातील काही सत्त्वशील पुरुषांस मिळून ब्रह्मचर्यसंस्था उदयास आली. असली ही थोर संस्था तत्कालीन किंवा अर्वाचीन इतर रानटी समाजात कोठेही निघाल्याचे इतर कोणत्याही इतिहासात नमूद नाही. रानटी आर्य लोकांत व इतर रानटी लोकांत जो मोठा भेद प्रथमदर्शनी अवलोकनात येतो तो हाच होय. इतर रानटी लोकांत जुलमी प्रजापतीच्या जबरदस्तीला कंटाळून घराबाहेर व प्रजापती कुटुंबाबाहेर जे तरुण लोक पडतात ते फार तर शेजारी किंवा दूरदेशी स्वतंत्र व विभक्त प्रजापतिसंस्था स्थापतात; परंतु आजन्म अपत्नीक व ब्रह्मचारी राहून आत्मानंदात किंवा लोकोपकारात आयुष्य खर्च करीत असलेले आढळत नाहीत, निदान प्रवाशांनी व निरीक्षकांनी तसा दाखला कोठे टिपून ठेवलेला आढळात नाही. आर्य लोकांतील ह्या ब्रह्मचा-यांजवळ आर्य लोकच केवळ नव्हेत, तर देव म्हणून जे श्रेष्ठ लोक होते तेही भीत अशी शेकडो वर्णने भारतात आहेत. ब्रह्मचा-याजवळ अशी कोणती जादू होती की, जिच्यामुळे मानवच नव्हेत तर देवसुद्धा त्यांना वचकत ? ही जादू दुसरी तिसरी कोणतीही नसून सर्वांभूती समदृष्टी ही होय. समदृष्टित्वामुळे, ब्रह्मचा-यांना सर्व लोक रानातील अनार्य, व म्लेंछ लोक देखील, वश असत, व त्यांची आज्ञा शिरसामान्य करीत. असे हे हत्यार जवळ असल्याकारणाने, प्रजापति, अधिराजे व इंद्रादी देवदेवेश्वरही ब्रह्मचा-यांना वचकून असत आणि वचकासारखी वजनदारी पृथ्वीवर दुसरी कोणतीच नाही. ब्रह्मचा-यांच्या वचकाचा आदर प्रजापतिकालानंतर इतका वाढला की, संपूर्ण आर्य समाजाचे अध्यापकत्व ब्रह्मचा-याकडे आले, व ब्रह्मचा-याचे अनुकरण आर्यलोकांतील तरुण स्त्रीपुरुषांनी नियमाने केलेच पाहिजे, असा दंडक निर्माण झाला. प्रत्येक आर्य प्रथम ब्रह्मचर्याश्रमातून तावून सुलाखून पुनः जन्म घेई व द्विज या सन्मान्य पदवीस आपणास पात्र करून घेई.