Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

उदाहरणार्थ, दम ऋषीने मृगीशी संग केला ही मूळची आर्षकालीन हकीकत. ही कथा स्वकालीन समाजाला निंद्य, गर्ह्य, लाजिरवाणी व अधर्म्य वाटेल व प्राचीन पूर्वजांची निंदा केल्याचे पातक माथ्यावर पडेल या भीतीने व्यासांनी एवढीच मखलाशी केली की दम ऋषीला व त्याच्या स्त्रीला वाटेल त्या प्राण्याचे रूप धारण करण्याचे तपोबलाने सामर्थ्य असल्यामुळे, ती दोघे मृगाचे रूप घेऊन क्रीडा करीत होती, सबब हा समागम नीतीला व धर्माला सोडून नव्हता. दुसरे उदाहरण अत्यंत प्रसिद्ध असे कुंतीचे घेऊ. कुतीने तीन परपुरुषांपासून म्हणजे स्वपतीव्यतिरिक्त अन्य पुरुषांपासून संतती करून घेतली ही मूळ हकीकत. ही उघडीनागडी हकीकत व्यासकालीन- म्हणजे शकपूर्व चार-पाचशे वर्षांपलीकडे झालेल्या महाभारतकालीन-नीतीला व धर्माला किंचित् गौण व कमीपणा आणणारी भासल्यामुळे व्यासांनी एवढीच दैवी व अद्भुत मखलाशी केली की, कुंतीशी ज्या परपुरुषांनी समागम केला ते पुरुष भिकार व पापी मानव नव्हेत तर इंद्र, यम, वरुण इत्यादी सारखे मोठे मोठे देव होते. ही मखलाशी पहिल्या प्रथम महाभारतकार व्यासांनीच निर्माण केली असेल असेही म्हणवत नाही. पिढ्यानपिढ्या दंतकथा सांगणारांनी देखील उघड्यानागड्या अश्लीलत्वावर झाकण घालण्याच्या सद्बुद्धीने ही मखलाशी केली असण्याचा पूर्ण संभव आहे. कारण, पितरांची व त्याबरोबरच आपलीही निंदा करण्याची खंती मनुष्यमात्राच्या प्रगतिप्रवण नीतिमत्तेला वाटलेली सर्वत्र आढळून येते. यांचे अत्यंत ठळक असे सेमेटिक उदाहरण म्हटले म्हणजे ख्रिस्ती धर्मोत्पादक ख्रिस्ताचे. ह्याची आई जी मेरी तिला साक्षात् होली घोस्टकरवी गर्भदान झाले, अशी दंतकथा आहे. मर्त्य पुरुषाच्या समागमाव्यतिरिक्त मर्त्य स्त्रीला प्रजा होणे असंभाव्य आहे या दृष्टीने पाहता कुमारी मेरी हिला कोण्यातरी पुरुषापासून ख्रिस्त झाला असला पाहिजे. परंतु असले बिगरलग्न प्रजोत्पादन त्या काली यहुदी लोकांत नीतिबाह्य दिसत असल्यामुळे दैवी गर्भाधानाची मखलाशी नवीन निर्माण करणे अवश्य झालेले उघड उघड दिसत आहे. पुरुषाशिवाय गर्भधारणेवर (Immaculate conception ) कितीत री पांडित्य ख्रिस्ती पंडितांनी केलेले जे आढळते त्यातील बीज इतकेच की, साधुवर्य ख्रिस्ताचा जन्म अधर्म्य व नीतिबाह्य नाही हे कसेतरी श्रोत्यांना पटवुन द्यावे. युरोपियन पुरुषाशिवाय गर्भधारणावाल्यांची जी दुर्दशा तीच महाभारतकार व्यासांचीही दुर्दशा आहे. तात्पर्य, महाभारतातील विस्तृत प्राचीन इतिहासकथांना वैदिक त्रोटक उल्लेखांचा आधार आहे. असो. प्राचीन आर्य समाजात सरमिसळ स्त्री-पुरुषसमागम एका काळी प्रचलित होता, एतत्संबंधाने सध्या आपण विवेचन करीत आहोत व ते विवेचन मुख्यत: महाभारताच्या आधाराने करीत आलो आहोत. आता वैदिक वाङ्मयात व विशेषतः ऋग्वेदात सरमिसळ स्त्री-पुरुषसमागमासंबंधाने बरेच उल्लेख स्थळोस्थळी आढळतात. त्यापैकी दोन तीन मासल्याकरिता येथे देतो. यम आणि यमी या बहीण-भावंडासंबंधाने विशेष उल्लेख करावयाला नकोच, कारण ही वैदिक कथा बहुतेक आबालवृद्धांच्या कानावरून गेलेली आढळते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात व अथर्ववेदाच्या अठराव्या कांडात यम आणि यमी यांचा संवाद दिला आहे. यमी आपला सोदर भाऊ जो यम त्यापाशी संभोगाची याचना करू लागली. ती याचना यमाने फेटाळली. तो म्हणाला, वरुणाचे दूत आपले कृत्य पाहतील व दोष देतील.