Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(८) यूथावस्थेत आर्षसमाज असताना, स्त्रीपुरुषसमागम अत्यंत अनियमित असे, म्हणजे नातेगोते काहीएक बघत नसत; कारण नातेगोते उत्पन्नच झालेले नव्हते. कुमारींशी समागम करीत, उघड्यात पशूंप्रमाणे समागम करीत इत्यादी स्वैरपणा यद्यपि होता, तत्रापि तशाही स्थितीत स्त्रियांना पुरुष आपली मालमत्ता समजत ही बाब सदैव लक्षांत ठेविली पाहिजे. पाणिनीय समाहारद्वंद्वाची जी उदाहरणे दिली आहेत त्यात दारगवम् हे एक उदाहरण दिलेले सर्व प्रसिद्ध आहे. दाराः च गावः च दारगवम्. दाराः म्हणजे स्त्रिया. यांची गणना गाईच्याबरोबर केलेली आहे. ही स्थिती पाणिनीच्या वेळची. प्राचीन आर्षाच्या काळी तर ही स्थिती ह्याहून प्रखर होती. स्मृतिकार व सूत्रकार जे आठ विवाह सांगतात, त्यांत आर्षविवाहाचे वर्णन येते. या विवाहात वर किंवा वराचा बाप वधूच्या बापाला गोमिथुन म्हणजे एक गाय व एक बैल देऊन कन्या घेतो म्हणजे अर्थात् विकत घेतो. ह्या विवाहाला आर्षविवाह ही संज्ञा आहे. ह्यावरून उघड होते की, आर्षलोकांत मुलीची किंमत एक गाय व एक बैल इतकी समजत असत. अर्थात् नित्याच्या बोलण्यात आपल्या मालमत्तेचे वर्णन करावयाचे असल्यास ते दारगवम् या सामासिक शब्दाने आर्षलोक करीत. असुर साक्षात् धन घेऊन कन्याविक्रय करीत. आर्षलोक गोमिथुन घेऊन कन्याविक्रय करीत, कारण इतर सुवर्णादि धन अत्यंत प्राचीन काळीं आर्षलोकांना मुळीं माहीतच नव्हते. आर्षलोक जसा कन्याविक्रय करीत तसाच ते आपल्या इतर स्त्रियांचाही विक्रय करीत. हरिवंशात ७९ व्या अध्यायात पुण्यक व्रताची कहाणी सांगितली आहे. तीत असे वर्णन आहे की, पुण्यकव्रत करणा-या पतिव्रता स्त्रीने ब्राह्मणांकडून त्यांच्या स्त्रिया विकत घ्याव्या व त्या आचार्यास उदकपूर्वक दान द्याव्या. In Polynesia, the husbands trafficked in their wives without scruple. [पॉलेनीशियात नवरे स्वस्त्रियांची विक्री करीत आणि त्याचे त्यांना काही वाटत नसे]. हीच चाल प्राचीन आर्षलोकांतही होती. जेथे स्व-स्त्रिया व कन्या विकीत असत, तेथे त्या भाड्यानेही दिल्या जात असल्यास त्यात काही नवल नाही.