Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(१०) असल्या ह्या सरमिसळ व्यवाय करणा-या अतिप्राचीन आर्षसमाजात आपल्या ह्या वर्तमानकालीन समाजातील आई, भाऊ, बाप, चुलता, मामा, आत्या इत्यादी बहुविध नाती व भेद असण्याचा संभवच नाही. तत्रापि बहुविध नाती व भेद यद्यपी नसले तरी काही थोडे भेद व नाती ह्या रानटी समाजांत उद्भवल्याशिवाय राहिली नाहीत . जमावातील किंवा यूथातील सर्व बाया सर्व मुलांच्या आया पडल्याकारणाने, त्या काली स्त्रीसामान्याला जनि ही संज्ञा असे. जनि म्हणजे जन्म देणारी जन्+इ. इ. म्हणजे ती व जन् म्हणजे जन्म देणे, जनि म्हणजे ती जन्म देते. जमावातील सर्व स्त्रिया जशा जनि या शब्दाने निर्देशिल्या जात त्याचप्रमाणे ह्या जन्मापासून झालेल्या सर्व व्यक्तींना जन ही संज्ञा असे. जन या शब्दात स्त्री-पुरुष, लहानमोठे असे जमावातील सर्व माणूस सामान्यत: येई व विशेषतः जन्यांपासून झालेली पुल्लिंगी प्रजा येई. सर्व पुरुष सर्व स्त्रियांशी सरमिसळ व्यवाय करीत असल्यामुळे, सर्व जन सर्व जन्यांचे नवरे व सर्व जन्या सर्व जनांच्या नव-या असत. म्हणजे स्त्री आणि पुरुष असे दोनच भेद यूथावस्थेतील अतिप्राचीन आर्षसमाजात असते. त्या काली स्त्री व पुरुष हे शब्दही बहुशः घडण्यात आले नव्हते. इतकेच काय तर ऋषी हा शब्दसुद्धा घडण्यात आला नसावा. अर्थात् त्या अतिप्राचीन सरमिसळ व्यवाय करणा-या यूथावस्थ समाजाला आर्षसमाज म्हणणेही ऐतिहासिक म्हणजे पौर्वापर्य दृष्टीने अयुक्त होय तथापि ऋषीचे ते पूर्वज होते एवढ्याचकरिता त्या यूथाला आर्ष ही संज्ञा लाविली आहे. त्या काली फक्त जन व जनि, जन्म दिलेले व जन्म देणा-या हे शब्द निर्माण झाले होते. स्त्री, पुरुष, बंधु, भगिनी, पिता, पुत्र, माता, दुहिता, स्वसृ, यातृ इत्यादी शब्द, भेद व नाती कशी व केव्हा निर्माण झाली व उदयास आली या बोधप्रद विषयाचा ऊहापोह पुढे यथाप्रसंग करावयाचा आहे.