Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

उद्योगपर्वाच्या १०६ व्या अध्यायापासून १२३ व्या अध्यायापर्यंत माधवीचे आख्यान वर्णिले आहे. गालव नावाच्या ऋषीला ययातिराजाने आपली मुलगी माधवी गालवाला गुरुदक्षिणा देता यावी म्हणून दिली. ऋषीने तिला स्वतःची मुलगी म्हणून तीन राजांना एकेक पुत्र होईतोपर्यंत क्रमाक्रमाने भाड्याने दिली, आणि नंतर ती मुलगी गालवाने आपला गुरु जो विश्वामित्र त्याला भार्या म्हणून अर्पण केली. तिच्यापासून विश्वामित्राला एक पुत्र झाल्यावर, गालवाने तिला तिचा बाप जो ययाति त्याच्या स्वाधीन परत केली. ह्या कथेत तीन आर्ष चालींचा निर्देश झाला आहे. (१) बाप आपल्या मुलीला वित्त म्हणून वाटेल त्यास काही काल भाड्याने देऊ शके. (२) शरीरसंबंध काही विवक्षित काल करण्याच्या अटीवर मुली गहाण टाकता येत असत. (३) आणि पुत्ररूप जो शिष्य त्याची मुलगी म्हणजे आपली नात पितृरूप जो गुरु तो काही काल बायको करू शके. आर्षलोक मुली किंवा स्त्रिया विकत किंवा भाड्याने देत असत हा प्रस्तुतचा मुद्दा आहे आणि ह्या प्रकरणी इतर रानटी लोकांप्रमाणेच पुरातन आर्षलोकांचा आचार असे हे सांगण्याकडे कटाक्ष आहे. ह्या चालीचा स्मारक असा वर्तमानकाली अवशेष म्हटला म्हणजे मराठी भाड्या हा शब्द आहे. भाड्या या शब्दाचे संस्कृत रूप भाटिकः, स्वस्त्रीला भाड्याने देऊन त्यावर निर्वाह करणा-याला भाटिक म्हणून पूर्वी म्हणत असत व भाड्या म्हणून सध्या महाराष्ट्रात म्हणतात.