Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रकरण २ रे
स्त्रियांचे वंशप्रवर्तकत्व व प्रजापतिसंस्था
१. अतिप्राचीन आर्ष समाजात म्हणजे यूथावस्थ आर्ष समाजात, म्हणजे पाशवावस्थेतून नुकत्याच बाहेर पडलेल्या आर्ष समाजात, स्त्री पुरुषसमागम अत्यंत अनियमित असे, अथवा त्याला कोणताच निर्बंध नसे; म्हणजे, आई, बाप, भाऊ, बहीण ही नात्यांची नावे ज्यांना कालांतराने पुढे पडली त्यांच्यात समागम सररहा होत असे हे महाभारतातील कित्येक पुराण इतिहासकथांवरून आपणांस ताडिता आले. ह्या प्राचीन इतिहासकथांचा मूळ व एकच एक उगम वेद आहेत असे जरी म्हणता येत नाही, तरी एवढे प्रमाणबद्ध विधान बिनधोक करता येते की महाभारतात ज्या पुराणकथा सांगितल्या आहेत, त्यातील ब-याच व्यक्तींचा उल्लेख वेदातून आलेला आढळतो. हे इंद्रा, तू अमक्या अमक्या प्राचीन किंवा नुकत्याच होऊन गेलेल्या ऋषीला किंवा राजाला जसे अमुक अमुक त-हेने तारिलेस व रक्षिलेस तसे मला किंवा माझ्या कुळाला तार, अशी प्रार्थना जेथे जेथे येते तेथे तेथे त्या ऋषीला किंवा राजाला कोणत्या संकटात इंद्राने किंवा अग्नीने किंवा ऋभूंनी तारिले त्याचा ओझरता, त्रोटक व फारच झाला तर संक्षिप्त उल्लेख केलेला बहुशः सापडतो. हे उल्लेख ज्या हकीकतीसंबंधाने केलेले आहेत त्या हकीकती ऋचा व सूक्ते ज्या ऋषींनी रचिली त्यांना तर संपूर्ण माहीत असतील यात जसा संशय नाही, तसाच त्या ऋचा व सूक्ते ऐकणाच्या समाजालाही तितक्याच संपूर्णतेने अवगत असल्यावाचून कवीचे व श्रोत्यांचे एकावधान शक्य नाही. तात्पर्य, ऋचा ज्या काली ऋषींनी रचिल्या त्या काली आर्ष समाजात ह्या पुरातन कथा प्रायः तोंडी दंतकथा भारतात त्या त्या स्थळी व्यासांनी भीष्मादिकांच्या तोंडून पुराण इतिहास म्हणून वदविल्या आहेत. मूळच्या वैदिक दंतकथा म्हणजे तोंडी हकीकती व्यासांनी जशा त्या मुळात घडल्या तशाच बहुतेक दिल्या आहेत. त्यास त्यांनी स्वतःच्या पदरांचा जोड जो दिलेला आहे तो एवढाच की स्वतःच्या कालच्या समजुतीच्या व नीतिमत्तेच्या दृष्ट्या त्या विगर्हणीय भासू नयेत म्हणून बहुतेक प्रत्येक हकीकतीला दैवी व अद्भुत कारणांची पुष्टी दिली आहे.