Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(७) पाशव अवस्थेतून परिणत होत होत मनुष्य जमाव करून राहू लागला. या यूथावस्थेत नाना प्रकारचे संकीर्ण व्यवाय स्त्रीपुरुषांत होत. वडील धाकुटपणाचे नाते अस्तित्वातच नसल्यामुळे, वयात आलेल्या कोणत्याही स्त्रीशी पुरुष सरमिसळ व्यवहार करीत. ह्याच्याही पलीकडे जाऊन, यूथावस्थ समाजात वयात न आलेल्या कन्यांशीही व्यवहार झाल्याची उदाहरणे भारतात व हरिवंशात आढळतात. आदिपर्वाच्या ११२ व्या अध्यायात कुंतीचे व पंडूचे संभाषण दिले आहे. त्यात प्राचीनकालीन म्हणजे आपल्याहून फार प्राचीनकालीन स्त्रीधर्माचे निरूपण करताना पंडु म्हणतो, अतिप्राचीन काळी कन्या कौमारावस्थेपासून पतिमर्यादेचा अतिक्रम करीत व तो अतिक्रम अधर्म समजला जात नसे, म्हणजे तत्कालीन समाजाला संमत असे. कुंतीला कोणत्याही प्रकारची शंका राहू नये म्हणून पंडु पुढे असे ठासून सांगतो की, हे धर्मतत्त्व सनातन असून स्त्रियांस सुखप्रद असल्यामुळे उत्तर करू देशात हा व्यवहार सांप्रत चालू आहे. उत्तरकरू ही पांडवांची मूळभूमी असल्यामुळे तिच्यावर त्यांचे विशेष प्रेम असे व तीतील आचार ते शिष्ट मानीत असत, हे येथे लक्षात बाळगिले पाहिजे. हाच प्राचीन सनातन धर्म बालपणी कुंतीला सूर्यनारायणाने सांगितला होता. वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य म्हणतो, हे कुंती ! कन्या शब्दाची उत्पत्ती कम्। धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे, स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत, यास्तव तू माझ्याशी समागम कर, समागम केल्यावरही तू पुनरपि कुमारीच म्हणजे अक्षतयोनीच राहशील. कुंतीला हा काळपर्यंत रजोदर्शन झाले नव्हते, म्हणजे ती केवळ बाला होती. अरजस्क स्त्रीशी समागम केल्याचा दोष भगवान सूर्यनारायणाला लागेल या भीतीने कवीने म्हणजे व्यासांनी येथे वर्णन करण्यात अशी शिताफी केली आहे की कुंतीला ह्याच वेळी पहिले विटासपण आले म्हणून आगाऊच त्यांनी मेख मारून ठेवली. कवीची ही कारुणिक बुद्धि एकीकडे ठेवून पाहता असे दिसते की कुंती या वेळी अक्षतयोनि व अरजस्क मुलगी होती, कदाचित् तिचा उमेदवार होण्याचा समय जवळ आलेला असावा. कुंतीच्याप्रमाणेच पराशर ऋषीने उपभोगिलेली मत्स्यगंधा कुमारीच होती व उपभोगानंतर कुमारीच राहिली म्हणून कवी सांगतो.