Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

पित्याच्या घरात राहून विधियुक्त विवाह न होता कन्येला तुल्य जातीच्या पुरुषाकडून जो पुत्र होईल तो पुत्र त्या कन्येच्या बापाची म्हणजे मातामहाचा शास्त्र म्हणजे रूढा समजते. त्या पुत्राने पिंड द्यावे व धनाचा उपभोग घ्यावा. येथे समाजशास्त्रदृष्ट्या असा प्रश्न उद्भवतो की तुल्य जातीच्या परपुरुषाकडून लग्न न झालेल्या स्वकन्येच्या ठायी जो पुत्र उत्पादन केला तो पुत्र त्या कन्येच्या बापाची काय म्हणून शास्त्र किंवा रूढी ठरवी ? तो कानीन मुलगा ज्या परपुरुषाकडून झाला त्याचा वास्तविक ठरावा व आपल्या आज्याचा म्हणजे. आईच्या बापाचा नातू ठरावा. परंतु कानीन मुलगा परपुरुषाचाही न ठरता किंवा आज्याचा नातूही न ठरता, आज्याचा धर्मोत्पादित पुत्र ठरे व त्या पुत्राची प्रत्यक्ष आई त्याची बहीण ठरे. ह्या चमत्कारिक चालीचा अर्थ काय ? समाजात ही समजत व रूढी व हा धर्म काय म्हणून मान्य झाला? सध्याच्या आपल्या समाजात असा प्रकार निंद्य समजला जाईल. परंतु वसिष्ठसंहिताकाली तो अधर्म्य व निंद्य समजला जात नसे. ह्याचे कारण काय ? ह्याचे कारण एकच आहे आणि ते हे की वसिष्ठकालीन समाज अशा एका पुरातन समाजाचा वंशज होता की ज्या समाजात पिता आपल्या स्वतःच्या कन्येच्या ठायी संतती उत्पन्न करी. सर्वच समाजात ही चाल त्या पुरातनकाली प्रचलित असल्याकारणाने कोणी कोणाला नावे ठेवीत नसत. म्हणजे त्या चालीला अधर्म्य व निंद्य समजत नसत. वसिष्ठोत्तर मन्वादिसंहिताकाराना व मन्वादिसंहिताकालीन आर्यसमाजांना स्वकन्येच्या ठायी परपुरुषाकडून झालेल्या मुलाला कन्येच्या बापाने आपला मुलगा म्हणावा ही चाल अप्रशस्त व अस्वाभाविक वाटून त्या कानीन मुलाचे पितृत्व उत्पादक परपुरुषाकडे किंवा कन्येच्या भावी पतीकडे येणे प्रशस्त वाटलेले उत्तरकालीन स्मृतिग्रंथातून नमूद केलेले आहे. त्या नमूदीचा प्रपंच प्रस्तुत प्रकरणाचा विषय नसल्यामुळे, तत्संबंधाने जास्त लिहिण्याचे येथे प्रयोजन नाही. येणेप्रमाणे अतिप्राचीन आर्यसमाजात पितृदुहितृशरीरसंबंध एका काली प्रचलित होता हे विधान स्मृतिग्रंथातील वचनांनीही सिद्ध होत आहे. एकूण इतिहास, वेद व स्मृती, किंवा इतिहास, श्रुती व स्मृती या तिहीतील वचनांचा आधार या चालीच्या अस्तित्वाची सिद्धी करण्यास उपलब्ध आहेत. सबब, प्राचीन आर्यलोकात ही चाल प्रचलित होती या विधानाच्या पोषणार्थ जास्ते पुरावे गोळा करण्याची किंचिन्मात्रही आवश्यकता राहिली नाही.