Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(२) महाभारतांत व हरिवंशात प्रथम प्रजोत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असे वर्णन आहे. आदिपर्वाच्या ६६ व्या अध्यायांत ब्रह्मदेवापासून वंशावळ दिली आहे ती अशी :
ह्या वंशावळीत (१) पहिली लक्ष्यात घेण्यासारखी बाब म्हटली म्हणजे दक्ष व दक्षा ह्या सख्ख्या बहीणभावंडांचा शरीरसंबंध ही होय. ब्रह्मदेवाच्या उजव्या आंगठ्यापासून दक्ष झाला व डाव्या आंगठ्यापासून दक्षाची भार्या झाली. दक्षाच्या ह्या भार्येचे किंवा बहिणीचे नाव व्यासांनी दिलेले नाही. व्यासांची ही कदाचित् नजरचूक असेल किंवा त्यांच्यापर्यंत ही पुरातन कहाणी जेव्हा पोहोचली तेव्हा ह्या स्त्रीचे नाव लोककथेतून नष्ट झाल्यामुळे व्यासांनी ते सहजच दिले नसेल. कारण कोणतेही असो, दक्षाच्या बहिणीचे नाव व्यासांच्या महाभारतात नमूद नाही एवढे खरे. समजुतीच्या सौकर्यार्थ ह्या बाईचे नामकरण मी दक्षा म्हणून केलेले आहे. वंशावळीतील (२) दुसरी लक्ष्य बाब अशी की ब्रह्मदेवाचा नातू जो कश्यप त्याने आपल्या १३ चुलतबहिणींशी समागम केला आणि (३) तिसरी लक्ष्य बाब ही की ब्रह्मदेवाचा पुत्र जो धर्म त्याने आपल्या १० पुतण्यांशी संगनमत केले. तात्पर्य, सख्खी भावंडे, चुलतभावंडे व चुलता-पुतणी यांचे शरीरसंबंध प्राचीन आर्षकाळी होत असत असे इतिहासकार जे महर्षी व्यास ते लिहून ठेवतात. परंपरेने समाजात ज्या लोककथा चालत येतात त्यांचा स्वतंत्रपणे उल्लेख ज्या इतिहासपुराणांतून येतो तो इतिहास वर लिहिल्याप्रमाणे अतिप्राचीन आर्य समाजांत प्रचलित असलेल्या चालींचा निर्देश करतो. भारतहरिवंशादी इतिहासातून उल्लेखिलेल्या ह्या चालींचा निर्देश ऋग्वेदादी ग्रंथांतूनही आढळतो. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील दहावे यमयमी-संवादात्मक सर्वप्रसिद्ध सूक्त एतत्प्रकरणी विचारार्ह आहे. यम आणि यमी अशी दोन सोदर बहीणभावंडे ऋग्वेदाहूनही प्राचीन काळी आर्षसमाजात होऊन गेली. यम आणि यमी ही व्यक्तिनामे यमाजी व यमूबाई, यमाबाई या रूपाने अद्यापही आपल्या म्हणजे ऋषींचे वंशज जे आपण त्यांच्या समाजात सर्रहा प्रचारात आहेत. यमी आपल्या सोदर भावाला म्हणते की तू माझ्याशी पतिभावाने वाग व आपल्या बापाचा नातू माझ्या ठायी उत्पन्न कर.