Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
ओचित् सखायं सख्या ववृत्यां, पितु र्नपातं आदधीत, यमीचे हे म्हणणे यमाला रुचले नाही. तत्रापि यमी यमाला आग्रहाने म्हणते की,
जायेत पत्ये तन्वं रिरिच्याम् विचिद गृहेव रथ्येव चक्रा.
इतकेच बोलून यमी गप्प बसली नाही. ती यमाला आणीक असे म्हणाली की, भाऊ असतांना बहीण अनाथ राहिली व दुःख भोगीत पडली, तो भ्राता कसला ?
किं भ्राताऽसद्यदानाथं भवाति ।।
किमु स्वसा यन्निर्ऋति र्नि गच्छात् ।।
येथे भ्राता लक्ष्य आहे. भ्रातृ वे भर्तृ हे दोन्ही शब्द भृ भरणे, पालन करणे या धातूपासून निघालेले असून दोन्ही शब्दांचा अर्थ पालन करणारा, रक्षण करणारा, भरण करणारा असा आहे. पैकी भ्रातृ हे रूप भर्तुं या रूपाहून जुनाट आहे. बहिणीचे म्हणजे भगिनीचे पतिभावाने भाऊ भरण करीत, सबब भावांना भ्रार्तृ हे नाव अतिप्राचीन आर्षकाली पडलेले आहे. स्वसृ हा शब्दही हाच इतिहास सांगतो, स्वान् सरति अनुगच्छति इति स्वसा. स्वतःच्या कुळातील भावांना जी अनुसरते ती स्वसृ. भ्रातृशीं शरीरसंबंध ठेवी, व त्या संबंधामुळे ती सनाथ म्हणजे सुसंरक्षित होई हा मूळ इतिहास. तात्पर्य, सोदर बहीणभावांचा शरीरसंबंध अत्यंत प्राचीन आर्षकाली होत असे, या भारतीय ऐतिहासिक विधानाला ऋग्वेदांतील वचनांचा दुजोरा मिळतो. ह्या अतिप्राचीन आर्ष चालीसंबंधाने येथे एक इशारत देऊन ठेवणे युक्त आहे. सख्खे, सोदर, चुलत, चुलतापुतणी, हे शब्द व शरीरसंबंध इतिहासकार जे व्यास व ऋग्वेदकार जे मंत्रकर्ते ऋषी त्यांच्या काळचे आहेत, मूळ ब्रह्मदेव व दक्षप्रजापती यांच्या अतिप्राचीन काळचे नाहीत. ब्रम्ह व दक्ष यांच्या काली भाऊ, बहीण, चुलता, पुतणी संबंध समाजात उद्भवले नव्हते व अर्थात् माहीत नव्हते, फक्त स्त्री आणि पुरुष, दोन संबंध तेवढे समाजाच्या लक्षात आलेले होते. तथापि असाही एक प्राचीन काल होता की ज्या काली हा भेद भिन्नलिंगदर्शक शब्दांनी दर्शविण्याची क्लृप्ती आर्यांना सुचली नव्हती. उदाहरणार्थ, ऋषिः हा शब्द मंत्रद्रष्टया स्त्रीपुरुषांना सूक्तांच्या मथळ्यावर लावलेला आढळतो. ऋषिः हे रूप वैय्याकरणदृष्टीने पुल्लिंगी आहे, पण " अस्य सूक्तस्य वाग ऋषिः " या वाक्यात ऋषि हा शब्द स्त्रीलिंगी वाग् या शब्दाला जोडलेला आहे. तात्पर्य, स्त्रियांचा व पुरुषांचा दर्जा एका अतिप्राचीन रानटी काली समान मानण्याची रीत प्रचलित होती, हे ह्या स्त्रीलिंगी व पुल्लिंगी ऋषिः रूपावरून अनुमानता येते. या अनुमानाशी प्रस्तुत आपणास विशेष कर्तव्य नाही. सध्या आपण एवढेच शोधण्याचा व साधार सांगण्याचा यत्न करीत आहोत की प्राचीन आर्यकाली बहीणभावांचा पतिपत्नीभावाने व्यवहार चालत असे. हा व्यवहार प्राचीन आर्य लोकांतल्याप्रमाणेच तत्समकालीन इतर प्राचीन समाजात असलेला आढळतो. पांच सात हजार वर्षांपूर्वीच प्राचीन मिसर समाजांत बहीण भावंडांच्या लग्नाची चाल जारीने प्रचलित होती व ती क्लियोपट्रेच्या कालापर्यंत टिकली होती हे इतिहासात नमूद आहे.