Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रकरण १ ले
स्त्रीपुरुषसमागमसंबंधक कित्येक अतिप्राचीन आर्ष चाली
(१) मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातनकालापासून पाणिनीच्या कालापर्यंत भारतीयांत होती. सध्याच्या आपल्या नीतीप्रमाणे पाहता, ही चाल आपणास नीतिबाह्य व चमत्कारिक वाटते; परंतु या उत्क्रमिष्णु जगतात सर्वच वस्तूंना जंगमत्व असल्यामुळे, नीती ही वस्तुदेखील उत्क्रमिष्णु आहे, स्वयंभू, स्थाणु किंवा स्थिर नाही. त्या त्या काळी ती ती चाल नीतिमत्तेची समजली जाते व वाटत्ये इतकेच. तो काळ पालटला व समाजात अंतर्घर्षणाने किंवा बाह्य प्रेरणेने बदल झाले म्हणजे ती जुनी व वहिवाटेतून गेलेली किंवा जात असलेली चाल नीतिबाह्य व चमत्कारिक भासून तिची गणना गर्ह्य वस्तूंत होते. गर्ह्य म्हणजे समाजाला अमान्य एवढाच अर्थ मुळात असतो हे विसरता कामा नये. अशा गर्ह्य म्हणजे सध्याच्या समाजाला अमान्य व विलक्षण भासणाच्या अशा स्वस्त्रीसमर्पणाव्यतिरिक्त इतर कित्येक चाली पुरातन आर्य समाजात, पृथ्वीच्या पाठीवरील इतर प्राचीन व अर्वाचीन कमजास्त रानटी समाजातल्याप्रमाणे प्रचलित होत्या. पैकी काहींचा निर्देश पुढे करतो.