Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

१३. वास्तव व भ्रांत कलांचा विकास

ध्वनी, रेघा, हावभाव व आकृती यांना भाषा, अक्षर, अभिनय व भांडी यांचे रूप देऊन या चारी नैसर्गिक व अनुकारक शक्त्यांचा उपयोग रोजच्या व्यवहारातील विचारप्रदर्शनाच्या कामी मनुष्याने केला. साध्या, सरळ, पोटभरू व्यवहाराला ही भाषादी साधने साळसूदपणे पुरी पडतात, हे खरे आहे. परंतु विचारांचे किंवा विकारांचे जेव्हा काहूर उठते आणि सुखदुःखादींचा जेव्हा कल्होळ माजतो, तेव्हा साधी बोलणी आणि सुधी लिहिणी कुचकामाची ठरतात आणि तीव्रतर साधनांचा आश्रय केल्यावाचून वादळाची शांती होत नाही. विचारांचा व विकारांचा हा तीव्र आवेग दर्शविण्यास मनुष्याने अगदी अज्ञातपूर्व अशी नवीन साधने शोधून काढली असे नाही. पूर्वीचा पाया ज्याला बिलकूल नाही, असे नवीन काहीच शोधून काढणे शक्य नाही. पाया पूर्वीचाच, साधने तीच, फक्त भरदारीत फरक. साध्या बोलण्याला जो ध्वनी लागतो त्यालाच दीर्घ व भरदार करून कोणत्याही आवेगाचे प्रदर्शन तीव्रपणे करणे म्हणजेच गाणे. साध्या मूळाबरहुकूम चित्ररेखांना आवेगाचे तीव्र रूप भरदार, काल्पनिक व नाजूक रंगांनी देणे म्हणजेच चित्र काढणे. साध्या हावभावांचा अतिशय करणे म्हणजेच नाचणे. आणि साध्या नित्याच्या घन आकृतींना तीव्र आवेग दाखवावयास लावणे म्हणजे मूर्ती करणे. एणेप्रमाणे ध्वनी, रेखा, हावभाव व आकृती या प्रत्येकापासून मनुष्याने साधेपणा व अतिशायन ह्या ऐयत्तिक भेदांवर दोन दोन निरनिराळ्या कला उत्पन्न केल्या. त्यांचा नकाशा असा मांडता येईल :--

गुण               साधेपणा ऊर्फ व्यवहार             अतिशायन ऊर्फ तीव्रता
१ ध्वनी                   भाषा                                      गान
२ रेखा                  अक्षर                                     चित्रण
३ हावभाव            अभिनय                                    नृत्य
४ आकृती              भांडे                                   मूर्तिकरण