Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

साधेपणाने नित्याचा अनेकविध अनंत व्यवहार होत असतो. अतिशायनाने तीव्र अनुभवांचे प्रदर्शन होते. वारंवार असे प्रसंग येतात की रोजच्या साधेपणाचा वीट येतो व आकस्मिक तीव्र अतिशायन सर्वांनाच सदा साध्य नसते. सबब साधेपणा व अतिशायन यांचे कमजास्त मिश्रण करून कल्पक मनुष्याने आणीक चार कला निर्माण केल्या. भाषेतील निवडक शब्द व गाण्यातील ठेकेदारपणा यांच्या मिश्रणाने मनोहर काव्य ज्याला म्हणतात ते जन्मास आले. अक्षरे व चित्रण यांच्यापासून सुबोध चित्रमय ऊर्फ सचित्र ग्रंथ उदय पावले. अभिनय व नृत्य या दंपत्यापासून नाटक हे दिवटे पोर निपजले. आणि भांडे व मूर्तिकरण या जोडप्याने स्थापत्य हे बडे प्रकरण जन्मविले. सगळ्यांनाच तानसेन होता येत नाही, पण स्त्रग्धरा किंवा मालिनी बहुतेक सर्वांना कंठारूढ करता येते. अजंठा फार थोड्यांच्या आटोक्यात असतो. पण चित्रमयजगत् इच्छा असल्यास घरोघर पाहता येते. तांडव एकट्या शंकरालाच शक्य आहे, पण लळिते आणि तमाशे गांवढ्यांचे मन रिझवितात. भिवा सुताराला घरोघर मजुरीला आणता येत नाही, पण एखादी जाळीदार मेहरप किंवा सुंदर वृंदावन थोड्या खर्चात कोणालाही साध्य आहे. साध्यासाध्यतेच्या व शक्याशक्यतेच्या दृष्टीने या ज्या चार कला निर्माण झाल्या त्यांचा नकाशा असा :-

१ ध्वनी भाषा x गान = काव्य
२ रेखा अक्षर x चित्रण = चित्रमय ग्रंथ
३ हावभाव अभिनय x नृत्य = नाटक
४ आकृती भांडे x मूर्तिकरण = स्थापत्य