Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
८९. राष्ट्रिक, वैराष्ट्रिक व माहाराष्ट्रिक हे लोक मगध, कुरुपांचाल व उत्तरकुरू या नर्मदोत्तर देशांतून दक्षिणेत आले, या बाबीला प्रत्यंतर पुरावा भाषेचा देता येतो. माहाराष्ट्रिकांसंबंधाने एवढे लक्षात ठेवले पाहिजे की ते यद्यपि मगधदेशीय महाराजांचे म्हणजे अधिपतीचे अनुयायी होते. तत्रापी ते मुळचे मगध रहाणारे नव्हेत. ते मूळचे हिमालयापलीकडे देवांच्या अनुषंगाने रहाणारे जे देवयोनिव गणदेव त्यापैकी होते. त्यांची मूळभाषा वैदिक भाषेच्या समकालीन अशी एक उपभाषा होती व त्यांना माहाराजिक अशी संज्ञा होती. मगधात आल्यावर मगधदेशातील प्राकृत जनांच्या भाषेतील काही लकबा त्यांनी उचलल्या. वैराष्ट्रिक हेही मूळचे हिमालयापलीकडील लोक होते व ते पंजाबातील मत्स्यदेशात विराटराजांचे पुढे राष्ट्रिक बनले. राष्ट्रिक हे लोक कुरुपांचालांतील होते व ते आपली भाषा घेऊन दक्षिणेत उतरले. वैराष्ट्रिकांची भाषा जीस अपभ्रंश म्हणून म्हणत ती होती व राष्ट्रिकांची भाषा जीस पुढे सौरसेनी म्हणून नाव पडले ती होती. असे हे तीन लोक आपापल्या भाषा घेऊन दक्षिणेत उतरले. वसाहतकारांत वजनाने व कर्तबगारीने माहाराष्ट्रिक लोक सर्वांहून वरचढ असल्यामुळे त्यांच्या भाषेपुढे इतरांच्या भाषा फिक्या पडल्या; तत्रापि त्यांच्या भाषांतील काही लकबा माहाराष्ट्रिकांच्या भाषेला चिकटल्या शिवाय राहिल्या नाहीत. वैराष्ट्रिकांच्या, राष्ट्रिकांच्या व मगधांच्या भाषांच्या माहाराष्ट्रिकांच्या महाराष्ट्री भाषेवर परिणाम होऊन त्यापासून काय फल झाले ते उदाहरणार्थ कित्येक शब्द देऊन स्पष्ट करतो. संस्कृत रत्न या शब्दाचे महाराष्ट्रात रूप रअण होते. परंतु महाराष्ट्रीपासून निघालेल्या मराठीत लेणे असे रूप प्रचलित आहे. येथे असा प्रश्न येतो की, रत्न शब्दातला संस्कृत र चा र च ठेवणारी महाराष्ट्री मराठी होताना र चा ल काय म्हणून करत्ये? प्रश्नाला उत्तर असे, मागधीत संस्कृत र च्या स्थानी ल नियमाने होई, इतक्या नियमाने की र हा उच्चारच मुळी मागधीत नव्हता. सबब, संस्कृत रत्न शब्दातील र च्या स्थानी मागधी ल उच्चार करी. महाराष्ट्रीची मराठी होताना मगधांतील लोकांच्या संगतीने रअण हा उच्चार लअण = लयण = लइण = लेणे असा मराठीत लकारयुक्त झाला. लयन (रहाण्याची जागा) पासून निघालेला लेणे हा मराठी शब्द रत्न पासून निघालेल्या लेणे या शब्दाहून निराळा, हे लक्षात ठेवावे. संस्कृत ष चा महाराष्ट्रीत स किंवा ह होतो. विषय = विसअ. परंतु, मराठीत विषये ह्या सत्पम्यंत शब्दाच्या ऐवजी विशी असा उच्चार येतो. महाराष्ट्री स च्या ऐवजी मराठीत हा श कसा आला? तर, मागधीत स व प हे उच्चारच मुळी नाहीत. माहाराष्ट्रीतून मराठीत येताना विसअम्मि या रूपांतील स चा श मागधी भाषा बोलणा-यांच्या संगतीने झाला हे उघड आहे. सध्या मराठीत हंसी-हंशी, माउस्सिआ=माउशी, असा-अश्यास, ठसा-ठश्यास, पास-पाशीं, फास-फाशीं इत्यादी ठिकाणी जो शकार शिष्टांच्या बोलण्यात येतो तो आणि सामान्य लोकांच्या बोलण्यात ष च्या ऐवजी जो श ऐकू येतो तो हे दोन्ही ठिकाणचे श महाराष्ट्रीची मराठी होतांना मागधीची जी संगती लागली तिची चिन्हे आहेत. य मुळे श उच्चार होतो, वगैरे कारणे वरवरची केवळ साहचर्य दाखविणारी विधाने होत, उच्चाराच्या बदलाची खरी कारणे नव्हेत. महाराष्ट्री मराठीचे रूप घेत असता, मागधीचा तिच्यावर जो परिणाम झाला त्याची अशी आणीक शेकडो उदाहरणे देता येतील. त्यावरून महाराष्ट्रिक लोक एकेकाळी मगधदेशात वसती करून होते या विधानाला पोषक असे एक भाषिक कारण उपलब्ध होते. राष्ट्रिकांची जी सौरसेनी भाषा तिचाही महाराष्ट्री वर परिणाम झालेला आहे, हे मराठीवरून ताडिता येते. महाराष्ट्रीत सर्वस्माद् व्यंजनात् पर: पूर्वस्थ श्च रेफो लोप्यो भवति (चंड). परंतु सौरसेनीत तसा प्रकार होतोच असे नाही. उदाहरणार्थ, सौरसेनीत मूर्खचा अपभ्रंश विकल्पाने मुरुख्ख असा होतो, र चा लोप होत नाही. महाराष्ट्रीची मराठी बनताना मुरुख्ख या रूपाचा अपभ्रंश मुलूख असा होऊन, मुलूख असा शब्द निष्पन्न झाला व तो "तो सा-या मुलखाचा शहाणा आहे." ह्या मराठीत आढळतो. येथे मुलखाचा म्हणजे मूर्खाणाम् असा अर्थ आहे, मुलूख म्हणजे प्रांत असा अर्थ नाही. मुलूख म्हणजे प्रांत हा अरबी शब्द आहे. तो सा-या मुलुखाचा शहाणा आहे या वाक्याचे शब्दश: संस्कृत भाषांतर स सर्वेषां मूर्खाणां विचक्षण: अस्ति असे आहे. फारसी मुलूख शब्द या वाक्यात अभिप्रेत असता तर मुलखांतला असा प्रयोग शक्य होतो, मुलखाचा असा चान्त प्रयोग शक्य नव्हता. येथे सौरसेनी लकब महाराष्ट्रीने मराठी बनताना उचलली हे उघड आहे. महाराष्ट्रीत व सौरसेनीत विशेष व उत्कट अंतर नसल्यामुळे दक्षिणारण्यात त्या दोघींचा मिलाफ होण्यास फारशा यातना पडल्या नाहीत. महाराष्ट्री मराठी होत असताना अपभ्रंशाच्या ज्या कित्येक लकबा तिने उचलल्या त्यापैकी एकीचा येथे उल्लेख करितो. अपभ्रंशे अधो रेफस्य लोपो न भवति म्हणून चंड सांगतो. महाराष्ट्री अधो-रेफाचा लोप होतो. व्याघ्र: हा शब्द अपभ्रंशात, म्हणजे चंडकालीन अपभ्रंशात, वाघ्रो असा होत असे. मराठीत माहाराष्ट्रीतून आलेले वाघ असे रूप असून, शिवाय अपभ्रंशाच्या संगतीने अधोरेफयुक्त वाघ्रू असे रूप अशिष्ट व ग्राम्य जनात आढळते. तात्पर्य, महाराष्ट्रीय भाषा ही जरी मराठीची मुख्य जननी आहे तरी तिने अधूनमधून सौर सेनी, मागधी, अपभ्रंश व पैशाची या दायांचे दूध चाखिले आहे आणि ह्याचे विशेष आश्चर्य मानण्याचे कारण नाही. माहाराष्ट्रिक, राष्ट्रिक व वैराष्ट्रिक हे लोक मगध, कुरु, पांचाल, मत्स्य व उत्तरकुरु इत्यादी उत्तरेकडील देशांतून दक्षिणेत आले असल्यामुळे त्या त्या देशांतील भाषांच्या लकबा माहाराष्ट्री मराठी होत असताना तिच्या आंगवळणी पडाव्या हे साहाजिक आहे. शिष्ट मराठी खेरीज महाराष्ट्रात सध्या ज्या प्रांतिक व जातिक उपभाषा आहेत त्या उत्तरेकडून वसाहत करण्यास आलेल्या त्या त्या उत्तरप्रांतीय जातींच्या भाषांपासून निघालेल्या आहेत, हे त्या त्या प्रांतिक व जातिक उपभाषांच्या विशिष्ट लकबां वरून ओळखता येते.