Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

सध्याचा पंजाब म्हणजे प्राचीन मत्स्यदेशाचा काही भाग. त्यातील सर्व सारस्वत ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी व माध्यंदिनशाखी आहेत. त्यांची काही आडनावे येणेप्रमाणे :

१) नवले २) रबडे ३) पंडित ४) तिखे ५) बागे ६) मालिये ७) काळिये ८) कपूरिये ९) पाठक १०) भारद्वाजी ११) जोशी १२) दत्त १३) वैद्य १४) श्यामे १५) कटपळे १६) घोटके १७) पराशर १८) कपाल १९) नागे २०) वसिष्ठ २१) भारथे २२) ऋषि २३) ब्रह्मी २४) भिंडे २५) भूत २६) ओझे २७) पाध्ये २८) तोटे २९) मढरे ३०) भटारे ३१) व्यास ३२) मैत्र ३३) लट्टू ३४) अग्निहोत्री ३५) कोटपाल ३६) सुंदर ३७) पांडे ३८) गांडे ३९) तगाले ४०) दीक्षित ४१) आचारिये ४२) डोकरे ४३) केसर ४४) लाट ४५) प्रोहित ४६) वलिये ४७) सुखे ४८) भुरे ४९) सांगड ५०) मुंडे ५१) उपाध्ये ५२) घोडे ५३) गुहलिये ५४) सिरखेडिये ५५) किरले ५६) गोसाई ५७) गोकुलिये ५८) कवडे ५९) रोड ६०) जड

वरील यादीतील पंजाबी सारस्वत ब्राह्मणांच्या नावाशी तत्सदृश माहाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या नावाची समांतर याद वाचकांना सहज सुचण्यासारखी असल्यामुळे ती येथे देत नाही. सिंधप्रांतातील ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी व माध्यंदिनशाखी आहेत. कान्यकुब्जांतील मिश्रब्राह्मणांपैकी बहुतेक शुक्लयजुर्वेदी व काण्वशाखी आहेत आणि थोडे ऋग्वेदी आहेत. त्यांच्यात गर्ग, अवस्थी, बाला, गौतमी, तारा, करयव इत्यादी आडनावे आहेत. कान्यकुब्जातील डुबे ब्राह्मण बहुतेक शुक्लयजुर्वेदी, काण्वशाखी व गोभिलसूत्री असून, काही थोडे सामवेदी आहेत. त्याच देशांतील पाठक ब्राह्मण यजुर्वेदी आहेत. तसेच तेथील चोबे व दीक्षित ब्राह्मण यजुर्वेदी माध्यदिन आहेत. रजपुतान्यांतील पोखर सेवग ब्राह्मण, जयपुरातील पारिख ब्राह्मण, मारवाडातील दायिम ब्राह्मण, सर्व यजुर्वेदी माध्यंदिन आहेत. मैथिल ब्राह्मणांपैकी ओझे किंवा झा ब्राह्मण माध्यंदिन आहेत व मिश्र ब्राह्मण यजुर्वेदी व सामवेदी असे दोन वेदांचे आहेत. नेपाळातील ब्राह्मण यजुर्वेदी असून त्यांच्यात भट्ट, आचार्य, पर्वत्य, अधिकारी, पंडित इत्यादी आडनावे आहेत. गुजर ब्राह्मण ऋग्यजु:साम असे तीनवेदी आहेत. वंग ब्राह्मणात सामवेदी फार. कलिंग ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी काण्व असून, ओड्र देशांतील नंद ब्राह्मणही शुक्ल्यजुर्वेदी आहेत. हे नंदब्राह्मण शातवाहनांच्या वेळी पैठणास आले. ह्या नंदब्राह्मणांची नंदभाषाही त्याज बरोबर माहाराष्ट्रात आली. हे नंदब्राह्मण प्रतिष्ठानी सराफी करून असत. ह्या यादीवरून स्पष्टच झाले की काश्मीरपासून मगधपर्यंतचा सर्व मुलूख शुक्ल्यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मणांनी भरलेला असून, त्यात ऋग्वेदी व सामवेदी ब्राह्मणांची तुरळक वसती आहे व काण्वांचीही थोडी बहुत संख्या आहे. हे माध्यंदिन, काण्व व ऋग्वेदी ब्राह्मण माहाराष्ट्रिक, राष्ट्रिक व वैराष्ट्रिक क्षत्रियांबरोबर दक्षिणेत आले. पैकी विदर्भात यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण बाहुल्याने आहेत. ह्यांचा उल्लेख त्रिविक्रमभट्टाने शतपथिन: म्हणून नलदमयंतीचंपूत केला आहे. नागपूरप्रांती झाडे ब्राह्मण माध्यंदिनशाखी व काण्वशाखी असे दोन्ही शाखांचे आहेत. खानदेश, नाशिक, पंढरपूर, इकडेही माध्यंदिन ब्राह्मण सडकून आहेत. तात्पर्य, माहाराष्ट्रात शुक्ल्यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मणांची संख्या सर्वांहून जास्त आहे. ऋग्वेदी, काण्व व आपस्तंब ह्यांच्या अल्प संख्येची तुलना माध्यंदिनांच्या प्रचंड संख्येशी केली म्हणजे माहाराष्ट्र हा देश भूरित्वाने माध्यंदिनांचा आहे, असे म्हणणे भाग पडते. माध्यंदिनांत काण्वांची भर टाकली म्हणजे ही शुक्ल्यजुर्वेद्यांची संख्या त्याहूनही मोठी होत्ये. शुक्ल्यजुर्वेद्यांच्या वाजसनेयी संहितेचा मूळ उत्पादक याज्ञवल्क्य असल्यामुळे, तत्प्रणीत धर्मादिसूत्रे त्यांनी महाराष्ट्रात वसाहतकाळी आणिली. दक्षिणेत याज्ञवल्क्यस्मृती प्रमाण धरतात त्याचे मुख्य कारण, महाराष्ट्रातील शुक्ल्यजुर्वेदी ब्राह्मणांची बहुतम संख्या व ह्या ब्राह्मणांचे अनुयायी जे माहाराष्ट्रिकादि क्षत्रिय त्यांची संख्या वाजसनेय शाखेची अनुयायी आहे, हे आहे. येणेप्रमाणे भाषेच्या प्रमाणावरून व वेदशाखांच्या प्रमाणांवरून निश्चित झाले की माहाराष्ट्रिकादी लोक व त्यांचे वाजसनेयादि पुरोहित काश्मीरपासून मगधपर्यंतच्या उत्तरहिंदुस्थानातील देशातून बौद्धक्रांतिकालात दक्षिणेत उतरले.