Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

८७. बौद्धक्रांतिकालात आणीक तिसरे लोक दक्षिणारण्यात वसाहती करण्यास आले. त्यांचे नाव वैराष्ट्रिक. हे लोक विराट नामक राजांच्या देशांतले म्हणजे उत्तरकुरू व उत्तरमद्र या देशातले रहिवासी ऊर्फ जनपद होत. विराज हे ज्या राजांचे नाव त्याच्या राज्याला विराष्ट्र म्हणत व विराष्ट्रावर भक्ती करणारे जे लोक त्यांना वैराष्ट्रिक म्हणत.

८८. असे हे तीन प्रकारचे व तीन देशातले लोक महाराष्ट्रात बौद्धक्रांतीकाली वसाहती करण्यास उतरले. पैकी, माहाराष्ट्रिकांनी नर्मदेपासून भीमेपर्यंतचा सह्याद्रीकिनारा व देवगिरीपासून पैठणप्रांतापर्यंतचा देशभाग व्यापिला. महरट्टांचे उल्लेख नाशिक, जुन्नर, कान्हेरी इत्यादी प्रांतातील शिलालेखात सापडतात. वैराष्ट्रिक लोकांनी पुण्याच्या दक्षिणेस सध्या ज्याला वायदेश म्हणतात त्याच्या आसपासचा विस्तीर्ण मुलूख आक्रमण केला. वाईप्रांताला विराटदेश म्हणण्याची चाल माहात्म्यांतून व दंतकथांतून असलेली आढळते. खुद्द वाई शहराला विराटनगरी आणि जवळील किल्ल्याला विराटगड ऊर्फ वैराटगड ही नावे अद्यापही प्रचलित आहेत. पांडवांनी अज्ञातवासाची बारा वर्षे ज्या देशात काढली तो विराटदेश हाच होय, अशी लौकिक समजूत आहे. परंतु तीत विशेष तथ्य नाही, हे सांगावयाला नको. विराटगड ऊर्फ वैराटगड हा शब्द वैराष्ट्रिक गड ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. असे दिसते की, वैराष्ट्रिक लोकांनी ह्या गडावर वसाहतकाली ठाणे देऊन भोवतालील प्रांतांवर अंमल केला आणि गडाला आपले नाव दिले. कदाचित उत्तरकर्नाटकांतील बेरड हे लढवय्ये लोक वैराष्ट्रिकांचे (वैराष्ट्रिक = बेरट्ट = बेरड) वंशज असावे असा मला संशय येतो. राष्ट्रिक लोकांनी सध्या ज्याला दक्षिण महाराष्ट्र म्हणतात तो प्रांत व निजामच्या राज्यातील बीडपासून म्हैसूरजवळील सौंदत्ती वगैरे प्रांतापर्यंतचा सर्व मुलूख आटोपिला. रट्टांच्या ऊर्फ राष्ट्रिकांच्या नावावरून रट्टपाटी, रट्टगिरी, रट्टपल्ली, रट्टेहळ्ळी, रट्टज्जुन (राष्ट्रकार्जुनकं), रड्डी, रेडी इत्यादी किती तरी गावांची, प्रांतांची, व्यक्तींची व जातींची नावे महशूर आहेत. तात्पर्य, माहाराष्ट्रिक उत्तरेस, वैराष्ट्रिक मध्यभागी आणि राष्ट्रिक दक्षिणभागी दंडकारण्यात वसाहत करते झाले. कालांतराने उत्तरेकडील माहाराष्ट्रिकांचे प्राबल्य व प्राधान्य सर्वांहून अधिकतम होऊन ह्या सर्वांना माहाराष्ट्रिक ही एकच संज्ञा लागू झाली व तिघांचे तीन देश मिळून त्रिमहाराष्ट्रक असे त्रिकलिंग, त्रिगर्त, त्रिकूट, त्रिपुर ह्या नावाच्या धर्तीचे नाव पडले. ह्या त्रिमहाराष्ट्रक देशात शकाच्या सहाव्या शतकात नव्याण्णव हजार गावे होती म्हणून ताम्रपटात लिहिलेले आढळते ते अक्षरश: खरे आहे. खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार, रत्नागिरी, कुलाबा, ठाणे मिळून सुमारे चाळीस हजार गावे आहेत. ह्यांत औरंगाबाद, बीड, बेदर, नांदेड वगैरे निजामाच्या राज्याचा मराठवाडा मिळविला व म्हैसूरचा उत्तरभाग मिळविला म्हणजे नव्याण्णव हजारांची संख्या सहज होईल. त्यात एवढे मात्र लक्षात घेतले पाहिजे की सध्या सुमार चतुर्थांश गावठाणे ओसाड आहेत. सध्या पंचाहत्तर हजार ग्रामसंख्या भरली म्हणजे सहाव्या शतकातील नव्याण्णव हजार संख्या झाली असा अर्थ घेण्याला काही एक हरकत नाही.