Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
८६. मगधांतील माहाराष्ट्रिक लोक बौद्धक्रांतीला कंटाळून ज्याप्रमाणे दक्षिणारण्यात शिरले त्याचप्रमाणे राष्ट्रिक ह्या नावाचेही दुसरे लोक त्याकाली दक्षिणेत उतरले. हे राष्ट्रिक लोक म्हणजे अशोक आपल्या शिलालेखात ज्यांना रास्टिक म्हणतो ते. राष्ट्रिक लोक मगधांतले नव्हेत. ह्या लोकांचा देश ज्याला कुरुपांचाल म्हणत तो. तात्पर्य, राष्ट्रिक निराळे व माहाराष्ट्रिक निराळे. ऐतरेयब्राह्मणाच्या अडतिसाव्या अध्यायात खालील वाक्य आले आहे.
"एतामेव देवानां विहितिं अन्वथैनं अस्यां
ध्रुवायां मध्यमायां प्रतिष्ठायां दिशि
साध्या श्चाप्या श्च देवा पड्भि श्चैव
पंचविंशै रहोभि: अभ्यषिंचन् एतेन
च तृचेन एतेन च यजुषा एताभि श्च
व्याहृतिभी राज्याय, तस्माद् अस्यां
ध्रुवायां मध्यमायां प्रतिष्ठायां दिशि ये
के च कुरुपांचालानां राजान: सवशोशीनराणां!
राज्याय एव ते अभिषिंच्यन्ते राजेत्येनान्
अभिषिक्तान् आचक्षते"
भारतवर्षाच्या पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर ह्या दिशांच्यामध्ये असणा-या कुरुपांचालांतील नरपतींना राजा हा किताब असतो असा वरील वाक्याचा मुख्य अभिप्राय आहे. अर्थात् ह्या कुरुपांचालांतील राजांच्या राज्याला राष्ट्र ही विशिष्ट संज्ञा असे व त्या राष्ट्राचे जे भक्त त्यांना राष्ट्रिक हे विशिष्ट अभिधान असे. अशोक माहाराष्ट्रिकांचे नाव काढीत नाही, राष्ट्रिकांचे काढतो. त्यावरून दिसते की राष्ट्रिक हे त्याच्या अंमलाखाली होते आणि माहाराष्ट्रिक नव्हते. तात्पर्य, राष्ट्रिक हे महाराष्ट्रिकांहून निराळे लोक होते.