Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
८५. हे मरहट्ट ऊर्फ माहाराष्ट्रिक लोक कोण, या बाबीचा प्रपंच 'महाराष्ट्राचा वसाहतकाल' या लेखात काही केला आहे. महाराजा** ह्या सूत्रात पाणिनी सांगतो की महाराज हा ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना माहाराजिक म्हणतात. महाराज म्हणजे कोण? महाराज ह्या शब्दाचे पाणिनिकाली दोन अर्थ होते. महाराज म्हणजे इंद्र व महाराज म्हणजे केवळ सामान्य राजाहून जो मोठा राजा तो. पैकी पहिला अर्थ घेतला तर माहाराजिक हे लोक इंद्राचे भक्त ठरतात आणि दुसरा अर्थ घेतला तर महाराजसंज्ञक किंवा महाराजपदवीधर भूपतीचे जे भक्त ते माहाराजिक ठरतात. माहाराजिक शब्दाचे दोन्ही अर्थ घेतले, तत्रापि माहाराजिक शब्दाचा माहाराष्ट्रिक शब्दाशी संबंध काय, हा प्रश्न रहातोच. हा प्रश्न असा सोडविता येतो. राजा ज्या भूमीवर राज्य करतो त्या भूमीला राष्ट्र म्हणत आणि राष्ट्र हे ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना राष्ट्रिक म्हणत. त्याप्रमाणेच महाराजा ज्या भूमीवर माहाराज्य करी त्या भूमीला महाराष्ट्र म्हणत आणि महाराष्ट्र हे ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना माहाराष्ट्रिक म्हणत. महाराजा हा ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना माहाराजिक म्हणत व महाराजाचे महाराष्ट्र ते ज्यांच्या भक्तीचा विषय त्यांना माहाराष्ट्रिक म्हणत. तात्पर्य, महाराज या व्यक्तीच्या अनुलक्षाने माहाराजिक हा शब्द व महाराष्ट्र या देशाच्या अनुलक्षाने महाराष्ट्रिक हा शब्द असे. हे दोन्ही शब्द वस्तुत: एकार्थक आहेत. एणेप्रमाणे माहाराजिक तेच माहाराष्ट्रिक, ही बाब निश्चित झाल्यावर आता दुसरा असा प्रश्न निघतो की दक्षिणारण्यात वसाहत करण्यास जेव्हा माहाराष्ट्रिक लोक निघाले तेव्हा उत्तरहिंदुस्थानात महाराजपदवी धारण करणारे कोण भूपती होते व महाराष्ट्र हे नाव ज्याला साजेल असा कोणता देश होता? सांगावयाला नकोच की असा देश म्हणजे त्याकाळी मगध होता. प्रद्योत, शैशुनाग, नंद व मौर्य ह्यांनी एका पाठीमागून एक जे माहाराज्य केले ते मगधात केले. माहाराज्य म्हणजे काय? त्याकाली एकछत्री सत्तेला माहाराज्य म्हणत. ऐतरेय ब्राह्मणांत (२८/२९ अध्याय) साम्राज्य, भौज्य, स्वाराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य, राज्य, माहाराज्य, आधिपत्य, स्वावश्य, आतिष्ठ्य व एकराज्य असे अकरा प्रकारचे नरपती ख्यापिले आहेत. मगधांतील भूपती एकछत्र ऊर्फ एकराट होते, म्हणजे राज्य, साम्राज्य, माहाराज्य इत्यादी दहा प्रकारच्या सत्ता भोगणा-यांहून श्रेष्ठ होते. तेव्हा ते महाराज होते हे सिद्धच आहे. ह्या मगधदेशाधिपती महाराजांचे जे भक्त ते माहाराष्ट्रिक म्हणून स्वत:ला म्हणत आणि दक्षिणारण्यात वसाहती जेव्हा ह्यांनी केल्या तेव्हा माहाराष्ट्रिक अशी ह्यांची प्रख्या सहजच झाली.