Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

८४ चातुर्वर्णिकांनी आपल्या घराचा यद्यपी हा असा कडेकोट बंदोबस्त केला तथापि जैनबौद्धांच्या करामतीने व सनातनधर्मी व पाखंडी यांच्यामधील यादवीने धार्मिक व राजकीय व सामाजिक असा भयंकर उत्पात सुरू होऊन, देशात अस्वास्थ्य माजले. ब्राह्मणांचे पुढारपण सावित्रीपतित व्रात्य कबूल करीतनासे झाले व शुद्ध क्षत्रियांचा हुकूम धर्मलंड क्षुद्र मानीनातसे झाले. आर्यस्त्रिया क्षुद्रस्त्रियांच्या पंगतीस जाऊन बसल्या आणि बिडालवृत्तींनी संन्याशांचे सोंग घेतले. दुष्ट ब्राह्मण अयाज्यन्ययाजन करू लागले आणि निषादस्थपतींच्या इष्ट्या करण्यात ऋत्विजांना भूषण वाटू लागले. त्यात महापद्मनंद हा क्षुद्र सम्राट सत्क्षत्रियांचा केवळ संहार करण्यास उद्युक्त झाला (विष्णुपुराण). अशा अराजक, अधार्मिक व असत्य राज्यात व राष्ट्रात रहाण्यात शोभा नाही हे उत्कटत्वाने ज्यांच्या प्रत्ययास आले अशा नर्मदोत्तरप्रदेशातील अनेक चातुर्वर्णिकांनी दक्षिणारण्यात वसाहती करण्याच्या निमित्ताने देशांतर केले. त्या देशांतर करणा-या लोकांचा तपशील 'महाराष्ट्राचा वसाहत काल' या लेखात बारकाईने दिला आहे. पैकी प्रस्तुत प्रकरणाला उपयोगी म्हणून महरट्ट ऊर्फ माहाराष्ट्रिक लोकांसंबंधाने येथे किंचित जास्त तपशील देतो. 'महाराष्ट्राचा वसाहतकाल' या लेखात वसाहत करण्यास महरट्टांना कोणती कारणे प्रोत्साहक झाली असावी याबाबी संबंधाने तर्क करताना अनेक संभाव्य कारणाचे परिसंख्यान करून शेवटी असा निर्णय दिला होता की नर्मदोत्तरप्रदेशातील राजकर्तृक वगैरे जुलमाला कंटाळून माहाराष्ट्रिकांनी देशांतर केले असावे. तो निर्णय प्रस्तुत विवेचनाने समर्थित होतो. महरट्ट लोक महापद्मादि दुष्ट क्षुद्र राजांच्या, जैनबौद्धादी पाखंडांच्या व व्रात्यक्षुद्रादी उत्पथांच्या जुलमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्ववृत्ती यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथमज्वानीत म्हणजे शकपूर्वी सहाशेंच्या सुमारास वसाहती करण्यात शिरले.