Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

७८. विराट् राज्यपद्धतीतील ह्या चातुर्वर्ण्यसंस्थेचा क्षुद्रांच्या सामाजिक स्थितीवर चांगला परिणाम घडला. त्रैवर्णिकांच्या समाजात एव्हापर्यंत क्षुद्राला आपले स्वत:चे असे हक्काचे स्थान नसे. ते हक्काचे स्थान चातुर्वर्ण्यसंस्थेच्या निर्मितीने क्षुद्रास कायमचे मिळाले. आजपर्यंत क्षुद्राला त्रिवर्णबाह्य, अस्पृश्य व ओंगळ समजत. एथून पुढे तो चातुर्वर्ण्यान्तर्गत, स्पृह्य व सोंगळ समजला जाऊ लागला. चातुर्वर्ण्यात घेतल्यामुळे चातुर्वण्याचे सामान्य धर्म पाळण्याची त्याच्यावर जबाबदारीही आली. उंदीर, कुत्री, सर्प इत्यादी गलिच्छ व निषिद्ध मांसे क्षुद्रास चातुर्वर्ण्यांत आल्यापासून सोडावी लागली; यथाशक्ति स्वच्छ राहून शौचधर्म पाळण्याची आवश्यकता भासू लागली; चो-यामा-या करून परस्वापहरणापासून पराङ्मुख व्हावे लागले आणि इंद्रियांची स्वैरगती नियमित करावी लागली. तात्पर्य, चातुर्वर्ण्यांत आल्याने क्षुद्राची रानटी स्थितीतून ग्रामस्थितीत बढती झाली. क्षुद्राच्या ह्या बढतीपासून त्रैवर्णिकांचेही हित झाले. ज्या ज्या प्रांतात आर्य वसाहत करण्यास जात त्या त्या प्रांतातील कमजास्त रानटी अनार्यांचे करावे काय, ही विवंचना आजपर्यंत आर्यांना सदोदित पीडा करीत असे. अनार्य चो-या करीत, आश्रम लुटीत, गाई मारीत, ख-याखोट्याचा विधिनिषेध बाळगीत नसत, व्यर्थ हिंसा करीत आणि आर्यस्त्रियांशी असभ्यतेने वागत. अशा स्वैरवृत्तीच्या रानटी लोकांचे नियमन कोणत्या सुयुक्त त-हेने करावे, ते आर्यांना बहुत कालपर्यंत यथायुक्त कळले नव्हते. स्वा-या, पाठलाग, शिकार करून अनार्यांचा समूळ विध्वंस होत नाही, हे अनुभवांती आर्यांस मोठ्या कष्टाने कबूल करावे लागे. शिवाय, अपराधी अनार्यांबरोबर निरपराधी अनार्यांचीही हिंसा करणे आर्यांच्या भूतदयेला काळिमा आणी. कित्येक अनार्य आर्यांच्या वारंवार उपयोगीही पडत व आर्यधर्माने चालण्याची आपली लायकीही दर्शवीत. अशा स्थितीत सुधारणाक्षम अनार्यांचा वर्णसंस्थेत समावेश करून घेण्याची क्लृप्ति काही कल्पक आर्यांस सुचली आणि ती क्लृप्ति त्यांनी प्रथम उत्तरकुरुदेशात अंमलात आणिली. उत्तरकुरूत ह्या क्लृप्तीला अंदाजाबाहेर यश आले. चो-या बंद झाल्या, आर्य स्त्रियांशी असभ्य वर्तन दिसत नासे झाले, अशास्त्र हिंसा लुप्त होऊन गेली, इतकेच नव्हे तर क्षुद्रांनी सर्व दासकर्म आटोपल्यामुळे, स्वास्थ्य व फुरसत मुबलक मिळून वैश्यांना व्यापारधंद्याकडे, क्षत्रियांना देशरक्षणाकडे व ब्राह्मणांना विद्यावृद्धीकडे लक्ष देण्यास सापडून राष्ट्राची चोहो बाजूने भरभराट झाली. आफ्रिकन गुलाम मिळाल्यामुळे युरोपियन व अमेरिकन राष्ट्रांची गेल्या चारशे वर्षांत जशी अभूतपूर्व भरभराट व प्रगती झाली, तशीच प्रगती उत्तरकुरूतील आर्यांची क्षुद्रप्राप्तीने झाली. पुरुषसूक्त मोठ्या दिमाखाने व फुशारकीने सांगतो की, विराट्संस्था स्थापन होऊन, चातुर्वर्ण्याची समाजपद्धत सुरू झाल्यापासून घोडे, गाई, शेळ्यामेंढ्या इत्यादी संपत्ती वाढून ऋक्, यजु:, साम व अथर्व ह्या चार वेदांचे उफ्बृंहण झाले आणि वैराज्य भोवतालील सर्व भूमी आक्रमून बसले. स (विराट्) जात: अत्यरिच्यत पश्चाद् भूमि अथो पुर:। चातुर्वर्ण्यसंस्था राष्ट्रोन्नतीला अत्यंत उपकारक होते, असा उत्तरकुरूत अनुभव आल्यावर तिचा प्रसार व अनुकार त्रैवर्णिकांच्या भरतखंडातील सर्व वसाहतीत झाला. मत्स्य, कुरू, पांचाल, कोसल, विदेह, मगध, सूरसेन, चेदि, निषध, मालव, सुराष्ट्र इत्यादी वसाहतीत माणसाळण्यासारखे जे जे म्हणून आर्य त्रैवर्णिकांना आढळले त्यांना वर्णव्यवस्थेत नियत असे दासस्थान मुकरर करून आर्यांनी चातुर्वर्ण्याची स्थापना व प्रसृति सर्व भारतखंडभर केली. ती चातुर्वर्ण्यपद्धती पाणिनीकालापर्यंत बहुतेक अभंग चालली.