Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
तात्पर्य, विराज् म्हणजे हिमालयाच्या पलीकडील उत्तरकुरु व उत्तरमद्र या देशातील राजांचे सामान्य अभिधान. उत्तरमद्रात व उत्तरकुरूत त्रैवर्णिक आल्यावर तेथे त्यांनी जी एक राज्यपद्धती स्थापिली तिचे नाव वैराज्य. वैराज्यं नाम वैशिष्ठ्येन राज्यं. सामान्य साध्या राज्याहून काही एका विशिष्ट प्रकाराने भिन्न अशी जी राज्यपद्धती ती वैराज्य. त्रैवर्णिकांची सामान्य साधी राज्यपद्धती त्याकाळीसर्वप्रसिद्धच होती. तिच्याहून निराळी अशी जी चातुर्वर्णिकांची अभिनव राज्यपद्धती तिला उत्तरकुरु व उत्तरमद्र देशातील लोकांनी वैराज्य हे नाव दिले आणि त्याचे गुणवर्णन करणारे जे राष्ट्रीय किंवा वैराष्ट्रीय गीत त्याचे नाव पुरुषसूक्त म्हणजे राष्ट्रीय संस्थेचे गोड गाणे असे ठेविले. ही नवीन राज्यसंस्था निर्माण केली त्यावेळी त्याचे किती घटक केले तेही सूक्तकार सांगतो. यत् पुरुषं व्यदधु: कतिधा व्यकल्पयन्? यदा विराट्संस्थां स्थापितवन्त: तदा तस्या: कति विभागान् चक्रु:? सूक्तकार म्हणतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशी चतुष्पाद राज्यसंस्था निर्माण केली. काबाडकष्टाची कामे क्षुद्र करू लागले, द्रव्योत्पादनाचे काम वैश्य संपादू लागले आणि राष्ट्रसंरक्षणाचे काम क्षत्रिय पाहू लागले, तेव्हा विराजाच्या कृपेने स्वास्थ्य मिळून ब्राह्मणांनी चार वेद निर्माण केले आणि त्या निर्मितीचे श्रेय विराट्संस्थारूपी यज्ञास दिले. तत्कालीन लोक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र या लोकांनाच तेवढे राज्याची अंगे समजून स्वस्थ बसत नसत; तर पशू, पक्षी, सूर्य, चंद्र, इंद्र, अग्नी, वायू, अंतरिक्ष, द्यावापृथिवी ही सर्व राज्याचीच अंगे समजत. असा हा वैराष्ट्ररूपी यज्ञ विराट्संस्थारूपी यज्ञाच्या सहाय्याने संपादन झाला आणि ह्या यज्ञसंपादणीने ते यज्ञकर्ते म्हणजे संस्थास्थापक साध्यदेवांच्या महनीय पंक्तीस जाऊन बसले म्हणजे अक्षय्य कीर्ति मिळविते झाले. असा ह्या सूक्ताचा उघडउघड अर्थ आहे. केवळ परमेश्वरपर किंवा केवळ अध्यात्मपर किंवा केवळ यज्ञपर अर्थ ओढाताण करून करिता येणार नाही असे नाही. परंतु, साधा, सरळ वाच्यार्थ हा असा वैराज्यसंस्थावर्णनात्मक आहे.