Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
७७. पुरुषसूक्तात प्रथम वर्णन ब्रह्मांडरचनेचे ऊर्फ भुवनसंस्थेचे ऊर्फ आदिपुरुषाचे केले असून, त्या भुवनसंस्थेत विराटपुरुषाची उत्पत्ती कशी झाली ते सांगितले आहे आणि नंतर त्या विराटपुरुषाच्या मुखादि अवयवांवर चातुर्वर्ण्याची उत्प्रेक्षा केली आहे. पुरुष व विराट् हे दोन शब्द ह्या सूक्तात प्रस्तुत विवेचनदृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुरुष: पुरिषाद: पुरिशय: पूरयते र्वा, अशी निरुक्ती यास्क करतो. म्हणजे पुरुष शब्द सद्, शी किंवा पृ ह्या तिन्हींपैकी वाटेल त्या धातूपासून व्युत्पादावा, असे यास्क म्हणतो. पुरुबद्दल पुरि असाही फरक यास्क सुचवितो. पुरि म्हणजे संसारे असा अर्थ शंकराचार्य देतात व पुरू हा पुरि शब्दाचा अपरपर्याय आहे असा आशय दाखवितात. पुरु म्हणजे पुरिकाय म्हणून समजावयाचे ते कोणीच साधार सांगत नाही. वस्तुत: पुरु शब्दाचा अनेक, पुष्कळ असा अर्थ आहे आणि तो घेऊन निरुक्ती उत्तम होते. सद्, शी किंवा पृ हे तीन धातूही पुरुष शब्दाच्या निरुक्तीत नीट काम देत नाहीत. सद्चा द् काय म्हणून गळाला, शचा ष काय म्हणून झाला व पृला इष् कोठून काय अर्थाने चिकटला, इत्यादी शंका या तिन्ही धातूसंबंधाने घेता येतात. वस्तुत: पुरुष हा शब्द पूर्ववैदिककालीन असून तो पुरु व अस् या दोन शब्दांपासून झाला आहे. पुरु म्हणजे अनेक, सर्व आणि अस् म्हणजे असणे. अस् पासून पूर्ववैदिक नाम, अलोप होऊन स: होई. पुरु+स:= पुरुष:। पुरुष: म्हणजे सर्वत्र असणारा, अनेक असणारा, सर्व व्यापून असणारा. तदुपकारक किंवा तदंशभूत सर्व अवयवांना व्यापून असणारी जी वस्तु ती पुरुष या शब्दाने सूक्तकाराने उल्लेखिली आहे. अशा सर्वावयवव्यापक वस्तूला सध्या आपण संस्था म्हणतो. तात्पर्य, पुरुष म्हणजे संस्था असा सूक्तकाराचा आशय आहे. संस्था हा शब्द स्त्रीलिंगी आहे व पुरुष हा शब्द त्याच अर्थाचा पुल्लिंगी आहे, एवढाच फरक. ब्रह्मांडरूप आदिभुवनसंस्था निर्माण झाल्यावर, नंतर विराट्संस्था ऊर्फ विराट्पुरुष उत्पन्न झाला, असे सूक्तकार सांगतो. आता विराट् या शब्दाचा अर्थ हुडकूं. विराट म्हणजे ब्रह्मांडदेह असा सायणाचार्य अर्थ घेतात व सबंध ऋचा जीवात्मपरमात्मपर आहे असे प्रतिपादितात. वास्तविक अर्थ अगदी निराळा आहे. विराज्, विराट् हे उत्तरकुरूंतील व उत्तरमद्रदेशातील ऋग्वेदकालीन राजांचे सामान्य नाव आहे. ऐतरेयब्राह्मणाच्या आठव्या पंचिकेच्या चौदाव्या खंडात व इतरत्र हा विराज् शब्द येतो. तेथे ब्राह्मणकाराने ह्या शब्दाच्या अर्थाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
एतस्यां उदीच्यां दिशि ये के च परेण हिमवन्तं
जनपदा उत्तरकुरव उत्तरमद्रा इति वैराज्यायैव
ते अभिषिच्यन्ते विराळिति एनान् अभिषिक्तान्
आचक्षते।