Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१७६० च्या १५ मार्चाला सदाशिवरावभाऊने पडदुराहून हिंदुस्थानास जाण्यास कुच केले (टीप २५६ पहा). देशीं व कर्नाटकांत सलाबतजंग व हैदर ह्यांच्यावर दबाव राखण्याकरितां रघुनाथरावदादा, गोपाळराव पटवर्धन, विसाजी कृष्ण बिनीवाले वगैरे सरदार ठेवून, नाना पुरंदरे, बळवतंराव मेहेंदळे, महीपतराव चिटणीस या मंडळींसह भाऊ व विश्वासराव पन्नास हजार फौज घेऊन ४ एप्रिलास ब-हाणपुरास येऊन पोहोंचले; १० एप्रिलच्या सुमारास हांडियास आले व तेथून दरमजल मधील वाटेनें म्हणजे शिहूर, भोपाळ, सीरोंज, अरूण, मालन, पहारी, कलेधार, नरवर, ग्वालेर, ढवळपूर या मार्गानें आग्र्याकडे जाण्याचा त्यांचा विचार होता. समशेर बहाद्दर, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, मानाजी धायगुडे, दिल्लीच्या कामांतून काढून दत्ताजींने दक्षिणेत पाठविलेला अंताजी माणकेश्वर, माने, निंबाळकर वगैरे बारा तेरा हजार फौज, देशाची वीस हजार फौज व गाडदी आठ हजार ह्याप्रमाणें पडदुराहून निघतेवेळीं फौज भाऊसाहेबाबरोबर होतीं. दमाजी गायकवाड, इम्राईमखान गार्दी स्वतः, संताजी वाघ वगैरे मंडळी पुढें गेली होती ती रस्त्यानें येऊन मिळालीं. आपण दरमजल हिंदुस्थानांत येऊन पोहोंचतो असें गोविंदपंत बुंदेल्याला पडदुराहून १५ मार्चला लिहून सदशिवरावभाऊनें त्याला दोन चार गोष्टी अवश्य करण्याचें सुचविले (लेखांक १६७). सुजाउद्दौल्याला आपल्या बाजूला वळवून घ्यावें, हीं पहिली सूचना होती. १७५९ च्या डिसेंबरांत अबदाली शुक्रतालीं रोहिल्यास मिळाल्यावर सुजाउद्दौला रोहिल्यांना सोडून अयोध्येस गेला. कारण, सुजाउद्दौल्याचें व अबदालीचें पिढीजात वांकडें होतें. सुजाउद्दौल्याचा बाप जो सफदरजंग वजीर त्यानें १७५० त मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे ह्यांना अबदालीला तंबी देण्याकरिता बोलाविले होतें. ह्याच सफदरजंगानें १७४८ त अबदालीचा सरहिंदास पराजय केला होता. १७५१ त अहमदखान बंगषाचा कादरगंजास पराभव करून फत्तेच्या मसनदीवर ज्याला शिंदे, होळकरांनीं बसविलें तो सफदरजंग म्हणजे सुजाउद्दौल्याचा बापच होय (का. पत्रें, यादी १६२ व लेखांक १७३). त्यावेळीं सफदरजंगाने मराठ्यांचे हे उपकार स्मरून त्यांना काशी व प्रयाग ही दोन क्षेत्रें देण्याचें वचन दिले होतें. परंतु, १७५४ च्या जुलैंत बाबूराव महादेवाला श्रीक्षेत्र ताब्यांत घेण्याकरितां पेशव्यांनीं पाठविलें असतां त्याला सफदरजंग अडथळा करू लागला (लेखांक २९). तेव्हां त्याच्यावर नागोरचें काम झाल्यावर स्वारी करण्याचा जयाप्पाचा विचार होता (लेखांक ३७). पुढें सफदरजंग १७ ऑक्टोबर १७५४ स वारला (लेखांक ४१) व त्याचा मुलगा सुजाउद्दौला नबाब झाला. १७५५ च्या पुढें सुजाउद्दौल्यावर स्वारी करावयाची तों मध्येच जयाप्पा नागोरास आटोपला.