Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१७५७ त रघुनाथरावाची हिंदुस्थानांत स्वारी झाली. त्यावेळी काशींत अंमल बसविण्याचा विचार होता; परंतु, १७५८ च्या मेपर्यंत रघुनाथराव लाहोरास गुंतल्यामुळें त्याच्या हातून तें काम झालें नाहीं. बारा लाख रुपये घेऊन सुजाउद्दौल्याला रघुनाथरावानें व विठ्ठल शिवदेवानें सोडून दिलें. १७५९ त दत्ताजीला काशी, प्रयाग व बंगाला हे प्रांत जिंकण्याची कामगिरी नानासाहेबानें सागितलीं. त्याप्रमाणें दत्ताजी १७५९ च्या मेंत अंतर्वेदींत शिरला व नजीबखानाला तंबी देऊन सुजाउद्दौल्यावर जाणार तों सुजाउद्दौल्यानें नजीबखानाशीं स्नेह करून मराठ्यांवर चाल केली. इतक्यांत इकडे अबदालीचा शह आला. त्यामुळे नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांना तसेच ठेवून (लेखांक १५७) दत्ताजीनें अबदालीकडे तोंड वळविलें. आपल्यावरचें संकट गेलें असें पाहून सुजाउद्दौला अयोध्येस आला त्याच्याकडे अबदालीनें किंवा मराठ्यांनीं तीन महिने म्हणजे १७५९ च्या डिसेंबरापासून १७६० च्या मार्चपर्यंत दुंकून सुद्धां पाहिलें नाहीं परंतु, हिंदुस्थानांत येण्याचे जेव्हा सदाशिवरावभाऊचें ठरले तेव्हां त्यानें गोविंदपंताला सुजाउद्दौल्याशीं स्नेह करण्यास सांगितलें. आपला आमचा स्नेह वडिलोपार्जित आहे; सरदारांनीं व चिरंजीवांनीं आपले ठायीं ममतेंत अंतर केलें नाहीं; अबदालीची जड हिंदुस्थानचे पातशाहीत रुतों देणें अयोग्य आहे, वगैरे कानगोष्टी सांगोन सुजाउद्दौल्याला आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करावा; पातशहाजादा, अल्लीगोहर व पट्टण्याचा सुभेदार जाफर अल्लीखान, ह्यांना अनुकूल करून घ्यावें, हिंदुपत वगैरे बुंदेले व यमुनापारचे रजपूत संस्थानिक ह्यांना चाकरीस सिद्ध करावें; अबदालीकडील बारीक बातमी काढून पाठवावी व वीस पंचवीस लाख रुपये ताबडतोब हिंदुस्थानांत स्वारी आली म्हणजे पाठवून द्यावे; इतक्या कामगि-या हिंदुस्थानच्या रस्त्यावर असतांना सदाशिवरावभाऊनें गोविंदपंताला सांगितल्या. मुद्दाम गोविंदपंतालाच ह्या कामगि-या सांगण्याचें कारण असें कीं, शिदेंहोळकर ह्या वेळी अबदालीशी झगडण्यांत गुंतले होते व तें काम करून ते अगदी थकून गेले होते. शिदेंहोळकरांच्या खालोखाल म्हणण्यासारखा वजनदार माणूस हिंदुस्थानांत गोविंदपंतच होता. यद्यपि गोविंदपंताला सरंजामी सरदारी प्राप्त झाली नव्हती व तो कोणत्याहि प्रांताचा सुभेदार नव्हता, तत्रापि मातबर मामलतदार म्हणून त्याची अलीकडे दहा पांच वर्षे बरीच प्रसिद्धि झाली होती. त्याला सरकारांत रसद चौदा लाखांची भरावी लागत असून, त्याची वार्षिक मिळकत सामान्य नव्हती (लेखांक १३२). तो दहा हजार फौज बाळगीत असून तत्प्रीत्यर्थ पंचवीस लाख रुपये सरकारांतून खात असे (लेखांक २४३). इतकेंहि करून त्याची गणना मामलतदारातच होत असे (लेखांक २४२). सरदारांत आपली गणना व्हावी एतत्प्रीत्यर्थ त्याचे सर्व प्रयत्न चालले होते. मख्त्याच्या कमाविशी करून त्यानें सरकारचा फायदा करून दाखविला होता. फौज जवळ ठेवून एखाद्या सरदाराप्रमाणें त्यानें अंतर्वेदींत अंमल बसविला होता (लेखांक २४४).