Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

कारण, कीं बाळाजी विश्वनाथ दिल्लीहून जे फर्मान घेऊन आला त्यांची अंमलबजावणी करण्यास तो जगला नाहीं. तेव्हां बाजीरावाला पेशवाई देतांना साधावयाच्या राहिलेल्या मतलबांची याद जशीच्या तशीच शाहूनें त्याच्या स्वाधीन केली. बाजीरावाच्या कारकीर्दीतील पहिलीं दहा अकरा वर्षें ह्या यादींतील मतलब साधण्यांत गेलीं. १७३१ साच्या सुमाराला बाजीरावानें वरील यादींतील कलमें सर्व साधिलीं. येथपर्यंत म्हणजे १७३१ पर्यंत स्वराज्यसाधनार्थ मराठ्यांच्या सर्व खटपटी झाल्या. ह्या पुढें आतां मराठ्यांच्या राजनीतीनें दुसरें स्वरूप धारण केलें. तें स्वरूप म्हणजे हिंदुपदबादशाहीची स्थापना करणें हें होय. हिंदुपदबादशाहीची स्थापना करण्याची प्रस्तावना बाजीरावानें शाहुपुढें केलेली सर्वश्रुत आहेच. १७३१ पासून १७४० पर्यंत बाजीरावाची सर्व खटपट ह्याच स्थापनेच्या प्रीत्यर्थ झाली. दक्षिणेस तुंगभद्रा, उत्तरेस यमुना, पश्चिमेस समुद्र व पूर्वेस निजामुल्मुल्काचा प्रांत व पूर्वसमुद्र ह्या वाढत्या हिंदुपदबादशाहीच्या सीमा झाल्या. हें एवढें काम करून बाजीराव बल्लाळानें आपला अवतार संपविला. बाजीरावाच्या पश्चात् राज्याची धुरा बाळाजी बाजीरावानें उचलली. १७४० पासून १७५० पर्यंत बाजीरावानें जिंकलेल्या प्रदेशांची व्यवस्था करण्यांत बाळाजीचा काळ गेला व अधून मधून काशी, प्रयाग, कटक, गढेमंडळ, बहादुरभेंडा इत्यादि प्रदेशांकडे त्यानें आपली दृष्टि फेंकिली. परंतु ही दृष्टि रघोजी भोंसल्याचा पाडाव करण्यापुरती व दक्षिणेंत पूर्वापार चालत आलेले हक प्रस्थापित करण्यापुरती होती. १७५० पर्यंत मराठ्यांचें आधिपत्य सातारच्या छत्रपतींकडे होतें. त्यांच्या नांवानें हिंदुपदबादशाहीचा प्रसार व स्थापना करण्याची मेहनत बाजीराव बल्लाळानें व बाळाजी बाजीरावानें केली. शाहूराजापेक्षां मुत्सद्देगिरीनें व पराक्रमानें बाजीराव बल्लाळ अतिच श्रेष्ठ होता. परंतु शाहूचें आधिपत्य कमी करण्याकडे त्याचा बिलकुल कल नव्हता. बाळाजी बाजीरावाला पेशवाई मिळाल्यापासून मात्र शाहूचे व त्याच्यानंतर येणा-या छत्रपतींचें माहात्म्य कमी करण्याचा प्रयत्न झाला. शाहू असे तोंपर्यंत बाह्यात्कारें छत्रपतीची सेवा अनन्यभावें करण्याचा बाळाजीनें बहाणा केला व ती वारल्यानंतर रामराजा गादीवर आला असतां त्याची पायमल्ली बाळाजीनें मनःपूत परंतु, मोठ्या युक्तीनें केली. बाळाजीच्या ख-या पराक्रमाला व त्याच्या मनांत घोळत असलेल्या अवाढव्य हेतूंना स्वरूप शाहूच्या मरणानंतर म्हणजे १७५० पासून येऊं लागलें. ह्या वर्षापासून बाळाजी मराठ्यांचा खरा पुढारी झाला व सातारच्या छत्रपतीचें आधिपत्य अस्तास गेलें. ह्या १७५० सालापासून तों १७६१ सालापर्यंत सर्व भरतखंड महाराष्ट्रमय करून टाकण्याचा बाळाजीनें उद्योग केला. सारांश, ह्या १७५० सालापासून ब्राह्मणपदबादशाहीचा प्रारंभ झाला व हिंदुपदबादशाही हा शब्द मागें पडला. पुढील दोन विवेचनांत बाळाजीनें १७५० पासून १७६१ पर्यंत बहुतेक सर्व हिंदुस्थानभर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित कशी केली व खुद्द महाराष्ट्रांत सातारच्या छत्रपतीचें व त्यांच्या राजमंडळाचें महत्त्व कमी करून आपलें महत्त्व कसें स्थापिलें ह्याचा विचार केला आहे.