Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

विवेचन तिसरें.

ह्या १७५० सालापासून हिंदुपदबादशाहीच्या ऐवजीं ब्राह्मणपदबादशाहीचें नाव नव्यानेंच ऐकूं येऊं लागलें. सातारच्या महाराजांचें प्रस्थ ह्या सालापासून अगदींच मावळलें व पेशवे मराठेमंडळाचे मुख्य झाले. ही क्रांति कशी घडून आली तें ह्या विवेचनांत स्पष्ट करितों.

शाहूराजाच्या मृत्यूनंतर १७५० च्या जानेवारीपासून पुढें सर्व हिंदुस्थान व सर्व दक्षिण, महाराष्ट्रमय करण्याचा प्रयत्न बाळाजीनें केला व सदाशिव चिमणाजी तर खुद्द रूमशामची सरदेशमुखी पटकविण्याच्या गोष्टी बोलूं लागला. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या ११ वर्षांतील बाळाजी बाजीरावाच्या धोरणाचें खालीं लिहिल्याप्रमाणें पृथक्करण करितां येतें. (अ) हिंदुस्थानात पश्चिमोत्तर दिशेनें उत्तर रजपुताना, अंतर्वेद, रोहिलखंड, मुलतान, लाहोर, ठठ्ठा व भकर ह्या प्रांतांत अंमल बसवावयाचा (लेखांक १). (ब) हिंदुस्थानांत पूर्वेकडे काशी, प्रयाग, अयोध्या, बंगाली इत्यादि प्रदेशांवर मोहीम करावयाची (काव्येतिहाससंग्रह, पत्रें व यादी ३६२, ३७३, ३८७, ३८८. प्रस्तुत ग्रंथांतील लेखांक ३१, ३७, ३९ इत्यादि). (क) दक्षिणेंत पूर्वेकडे सलाबतजंगाचा प्रदेश घ्यावयाचा; ऐन कर्नाटकांत श्रीरंगपट्टणाला हिंदुराजांच्या ताब्यांत तें होतें तोंपर्यंत अंकित करून टाकावयाचें व पुढें मुसुलमानांच्या ताब्यांत गेल्यावर जिंकून घ्यावयाचें. (ड) कोंकणांत सुरत, जंजिरा वगैरे ठिकाणें खालसा करावयाचीं. (ई) खुद्द महाराष्ट्रांत सातारची व कोल्हापुरची गादी एक करावयाची. (फ) आणि सरदारांची व्यवस्था लावावयाची. येणेंप्रमाणें बाळाजी बाजीरावाच्या राजनीतीचें धोरण सहा प्रकारचें होतें. पैकीं (अ), (ब), (क), (ड) आणि (फ) ह्या प्रकारांची माहिती ह्या पुस्तकांत, काव्येतिहाससंग्रहांत व ऐतिहासिकलेखसंग्रहांत छापलेल्या पत्रांतून बरीच आली आहे. त्यावरून त्यावेळच्या महाराष्ट्रमुत्सद्यांच्या मनांत कांहीं विशिष्ट हेतु होते व तत्सिद्ध्यर्थ त्यांचे व्यवस्थित प्रयत्न चालले होते हें स्पष्ट दिसून येईल. पश्चिमोत्तर दिशेकडील प्रदेश दिल्लीच्या पातशहानें १७५० त मराठ्यांना बहाल करून टाकिले. तेव्हां १७६१ पर्यंत त्यांत अंमल बसविण्याचा उद्योग करणें त्यांना अवश्यच झालें होतें. लेखांक १ त अबदालीला तंबी देण्याचें वचन मराठ्यांनीं १७५० त पातशहाला दिलें होतें. तेव्हांपासूनच अबदालीचा व मराठ्यांचा सामना होणार हें ठरून गेल्यासारिखें होतें. रघुनाथरावानें १७५८त लाहोर घेतलें, त्यामुळें अबदाली चवताळला व मराठ्यांच्या अंगावर पानिपतचा घोर प्रसंग आला असें ग्रांट डफ् म्हणतो, तें फारसें विश्वसनीय नाहीं. हें १७५० तच अबदालीला तंबी देण्याचा मराठ्यांनीं पत्कर घेतला होता ही गोष्ट ध्यानांत धरिली म्हणजे कळून येईल व रघुनाथरावाला विनाकारण दोष देण्यांत अर्थ नाहीं अशी खात्री होईल. पूर्वेकडील काशी व बंगाल हे प्रदेश घेण्याचा बाळाजीचा १७४२ पासूनच प्रयत्न चालला होता.