Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
६१. समाजचरित्र व समाजशास्त्र यांचा विचार झाल्यानंतर, महाराष्ट्रांतील तत्कालीन सामाजिक ऊर्फ ऐतिहासिक तत्त्वज्ञानाकडे वळणें जरूर आहे. ज्ञानेश्वरापासून भाऊमहाराजापर्यंत जे शेकडों ग्रंथकार महाराष्ट्रांत झाले त्या सर्वांचे ग्रंथ अध्यात्म तत्त्वज्ञानानें ओतप्रोत भरलेले आहेत. ते इतके कीं, महाराष्ट्र सारस्वताचा शेकडा पंचाहत्तर भाग तत्त्वज्ञानात्मक आहे. भगवत्दीता, योगवासिष्ठ, पंचीकरण, उपनिषदें, द्वैत, अद्वैत, पंचमहाभूतें, वगैरे तात्त्विक विषयावर मराठींत अतोनात ग्रंथ झालेले आहेत. ह्याच ग्रंथांना कित्येक लोक धार्मिक अशी संज्ञा देतात. व कित्येक लोक भक्तिमार्गी म्हणतात. परंतु ह्या दोन्ही संज्ञा केवळ भ्रामक होत. हे ग्रंथ केवळ तत्त्वज्ञानाचे आहेत. विठोबा, राम, दत्त वगैरे देवतांची स्तुति अभंगांमधून आढळते, त्यावरून हे ग्रंथ भक्तिमार्गाचे असावे, असा वरवर पहाणाराचा समज होतो. परंतु, परमात्म्याच्या ऐवजी विठोबा, राम, दत्त वगैरे नांवे या ग्रंथकारांनीं योजिलेलीं आहेत, हें ह्या अभंगांतील मजकुराचें पृथक्करण केलें असतां दिसून येतें. शिवाय सामान्य जनांना निर्विकार व निर्लेप अशा परब्रह्माचें आकलन होत नाहीं, सबब नामरूपांकित देवतांची कल्पना करून, त्यांची वृति परब्रह्माकडे वळविण्याचा ज्ञानेश्वरादि तत्त्वज्ञांचा हेतु उघड दिसून येतो. ज्ञानदेव, नामदेव, दासोपंत, एकनाथ, तुकाराम, वग़ैरे साधु ग्रंथकारांनीं हा हेतु स्पष्ट शब्दांनीं बोलूनहि दाखविलेला आहे. धर्माचें मुख्य तत्त्व जो आचार त्याच्यासंबंधानें या साधु ग्रंथकारांच्या व तत्त्वज्ञांच्या ग्रंथांत फारसा नव्हे, मुळींच विचार केलेला नाहीं. आचारासंबंधानें विवेचन करण्याचें काम धर्मशास्त्री संस्कृतांतून करीत. तेव्हां ती आगंतुक कामगिरी तत्त्वज्ञांनीं आपल्या शिरावर घेतली नाहीं. हें रास्तच होतें गुरुचरित्रादि ग्रंथांत आचाराची तुरळक माहिती किचित् दिलेली आहे. परंतु, असले अपवादात्मक ग्रंथ फारच थोडे आहेत. साधू-ग्रंथकारांचा मुख्य कटाक्ष तत्त्वावर आहे. आणि असाच प्रकार होणें रास्त होतें. ऑगस्ट कोंटेनें म्हटल्याप्रमाणें मनुष्यसमाजाचे विचार तीन पाय-यांनीं उद्भूत होत असतात; प्रथम धार्मिक विचारांचा उदय होतो. तो झाल्यावर नंतर तात्त्विक विचारांचे साम्राज्य होतें; आणि शेवटीं शास्त्रीय ज्ञानाचें राज्य होतें. पैकीं ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत महाराष्ट्रांत तत्त्वज्ञानाचें म्हणजे तात्त्विक विचारांचे साम्राज्य होतें. धार्मिक, तात्त्विक, व शास्त्रीय ह्या संस्कृत शब्दांना ऑगस्ट कोंटे Religions, Metaphysical and positive स्वभाषेंत शब्द योजतो. मनुष्यसमाजाच्या ह्या तीन स्थिति एकापाठीमागून एक येतात व दुसरी आली म्हणजे पहिलीचा समूळ लोप होतो, असा अर्थ समजावयाचा नाहीं. तर, विवक्षित काळांत एकेका स्थितीचें विशेष प्राबल्य असतें, इतकाच अर्थ विवक्षित आहे. तात्त्विक विचारांचा राष्ट्रावर पगडा बसला, म्हणजे धार्मिक अगर शास्त्रीय विचारांचा अत्यंत लोप झालेला असतो असा भाग नाहीं; तर हे दोन विचार ह्या वेळेपुतें गौण समजले जातात, एवढेंच सांगण्याचा मुद्दा आहे. कोणत्याहि काळीं कोणत्याहि समाजांत ह्या तिन्ही स्थिति विद्यमान असतात.