Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

एका जातीचीं शंभर वर्षे इराणच्या, तर पन्नास वर्षे स्पेनच्या व पाऊणशें वर्षे पंजाबच्या इतिहासांत द्यावीं लागतात, आणि सुसंगत हकीकतीचें सामग्र्य म्हणून ज्याला म्हणतात, तें नष्ट होतें. अमुक देश, अमुक लोकांचा, असें कायमचें ठरल्यावर दैशिक पद्धतीचा उपयोग चांगला होतो. परंतु, पंधरा हजार वर्षांचा मानवेतिहास लिहिण्याला ही पद्धति बरीच निरुपयोगी होते. कालानुक्रमिक व दैशिक ह्या दोन्ही पद्धति गोंधळाच्या व निरुपयोगी होतात, ह्याचें कारण उघड आहे. इतिहास निव्वळ कालाचाहि लिहावयाचा नसतो किंवा देशाचाहि लिहावयाचा नसतो. इतिहास लोकांचा म्हणजे मानवसमाजाचा लिहावयाचा असतो. आतां हें खरें आहे कीं, मानवसमाज देशकालावछिन्न असतो. तत्रापि, इतिहासाचा मुख्य कटाक्ष मनुष्यसमाजावर असतो, हें कांहीं विसरतां येत नाहीं. तेव्हां मनुष्यसमाजाच्या धोरणानेंच इतिहास लिहिला असतां, तो सुबोध, सुसंगत, व स्पष्ट होईल, हें उघड आहे. आतां, पूर्वप्रंलयीन कालापासून असें आढळून आलें आहे कीं, मनुष्यसमाजांत निरनिराळीं कुलें आहेत, व निरनिराळ्या कुलांच्या चाली, रीति, भाषा, धर्म, हेतु व नीति कमीजास्त मानानें भिन्न आहेत. हीं निरनिराळीं कुलें अंत: प्रवृत्तीनें किंवा कुलान्तरांच्या स्पर्शानें वाढली कशीं, सुसंस्कृत झालीं कशीं, मेलीं कशीं, जगलीं कशीं, स्तब्ध राहिलीं कशीं, आणि मिश्र किंवा शुद्ध बनलीं कशीं, हें पहावयाचें म्हणजे ह्या कुलांचा इतिहास अथपासून आतांपर्यंत दिला पाहिजे. ह्यालाच मराठींत कौलिक व यूरोपीयन भाषात Ethnographic पद्धति म्हणतात. यूरोपीयन भाषांत केवळ कौलिक पद्धतीवर लिहिलेला असा एकहि इतिहास नाहीं. कारण उघड आहे कुलशास्त्र व कौलिकपद्धति युरोपांत उद्भवून फार वर्षे झालीं नाहींत. तेव्हां कौलिक पद्धतीनें लिहिलेला इतिहास इतक्यांतच निर्माण होणार कोठून? कौलिक पद्धतीनें आपण मानवसमाजाचा इतिहास लिहीत आहों, असें हेल्मोल्ट आपल्या इतिहासाच्या दुस-या तिस-या खंडाच्या प्रस्तावनांत म्हणतो. परंतु त्याचा मूळसंकल्प दैशिक पद्धतीनें लिहिण्याचा होता, हें त्याच्या ग्रंथांतील व्यवस्थेवरूनच दिसत आहे. भारतवर्षांतील आर्यांचा इतिहास दुस-या खंडांत देऊन, तिस-या खंडांत इराणांतील आर्यांचा, व पांचव्या खंडांत यूरोपीयन आर्यांचा त्यानें समावेश केला आहे. म्हणजे आर्यकुळीचा कौलिक पद्धतीनें एके ठिकाणीं इतिहास देण्याचें सोडून, दैशिक पद्धतीनें निरनिराळ्या देशांचा इतिहास पूर्व दिशेनें प्रारंभ करून पश्चिम दिशेला समाप्ति करण्याच्या इराद्यानें, तो देतो हें उघड आहे. येणेंप्रमाणें कौलिकपद्धति तो घेत नाहींच; परंतु जी घेत आहे म्हणून म्हणतो, तीहि बरोबर आहे, असें म्हणतां येत नाहीं. कारण, ध्रुवसिद्धान्तानें मानवसमाजाची जी नवीन कुलव्यवस्था करणें अपरिहार्य होणार आहे, तींत सध्यां ज्यांना यूरोपीयन आर्य म्हणतात, त्यांपैकीं बरेच समाज अनार्य ठरण्याचा संभव आहे. Ethnographic म्हणजे कौलिकपद्धतीनें महाराष्ट्रांतील कोणा गृहस्थाला मानवेतिहास लिहिण्याची इच्छा झाली तर, आर्यकुल कोणतें व अनार्य कुलें कोणतीं, तें पाहून, मग त्यानें आपल्या कामाला लागावें, अशी सध्यां स्थिति आहे. मानवकुलांचें प्रस्तुतचें यूरोपीयन वर्गीकरण मागें पडण्याचा संभव फार दिसतो.