Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
३२. कौलिक, कालानुक्रमिक व दैशिक ह्या तिन्ही पद्धतींचा इतिहासलेखनांत कमजास्त उपयोग करून घ्यावा लागतो. ऐतिहासिक प्रसंग म्हटला म्हणजे काल, देश व कुल ह्यां त्रयीचा उद्धार केल्यावांचून गत्यंतर नसतें. किंबहुना, काल, देश व कुल किंवा कुलांतील व्यक्ती, हे तीन ऐतिहासिक प्रसंगाचे घटक होत. अर्थात् ह्यांच्या अनुरोधानें इतिहास लिहिणें केवळ स्वाभाविक होय. ज्या घटकाला कांहीं कारणानें प्राधान्य दिलें जातें, त्याची पद्धत तेवढ्यापुर्ती विशेष ग्राह्य व सोयस्कर समजतात एवढेंच. त्यांतल्यात्यांत एका घटकाला विशेष प्राधान्य देतात. इतिहास कोणाचा ! असा प्रश्न केला असतां, कालाचा किंवा देशाचा अथवा दिशेचा, म्हणून कोणी उत्तर देत नाहीं. तर मनुष्याचा किंवा मानवसमाजाचा किंवा मानवकुलांचा, असें उत्तर देतात. याचें तात्पर्य असें कीं, इतिहासांत मुख्य पात्र मनुष्य आहे आणि काल व दिशा ह्यांचें त्याला बेमालुम आवरण मात्र आहे. History of the Primitive times, History of the Middle Ages, History of the Modern Times, History of the Eaet आणि History of West ह्या प्रयोगांत मुख्य नायकाचा नामनिर्देश केलेला नाहीं खरा; परंतु, तो प्रामुख्यानें लक्षित आहे, हें सांगावयाला नकोच. लक्षणेचा व आलंकारिक भाषेचा युरोपीयन लोक किती उपयोग करतात, त्याचे हे मासले आहेत. शास्त्र्यांच्या भुपक्यापुढें शास्त्र बिचारें लोपून गेलें ! काल व दिशा ह्यांच्या धबडग्याखालीं माणूस चिरडून गेलें व प्राचीन काळाचा व पूर्व दिशेचा किंवा पौर्वात्य देशांचा इतिहास, असे प्रयोग प्रचारांत आले. विवक्षित मानवकुलाखेरीज काळाला व दिशेला इतिहासांत कांहीं किंमत नाहीं, हें कोणींच लक्षांत घेईना! नाहींतर कालानुरोधानें इतिहास लिहावा किंवा देशानुरोधानें लिहावा, हा वाद उपस्थितच झाला नासता.
३३. एवंच, दिक्कालांच्या आवरणाखालीं मानवकुलांच्या हालचालींची जी विश्वसनीय हकीकत ती इतिहास होय. सकल मानवकुलांच्या सामग्रयानें जो इतिहास, त्याला मानवेतिहास म्हणतात; व एकाच कुलाचा, उपकुलाचा, राष्ट्रांचा. लोकांचा. वर्गाचा किंवा व्यक्तीचा जो इतिहास, त्याला व्यक्तिचरित्र, वर्गेतिहास, लोकेतिहास, राष्ट्रेतिहास, उपकुलेतिहास किंवा कुलेतिहास व्युत्क्रमानें म्हणतात. व्यक्ति, वर्ग, लोक, राष्ट्र, उपकुल व कुल यांच्या हालचाली दोन प्रकारच्या असतात:---अंत:स्थ म्हणजे खासगी व बहिःस्थ म्हणजे बाहेरल्या. व्यक्तीची जी घरगुती हालचाल ती त्याच्या खासगी चरित्रांत मोडते व लौकिक बहिःस्थ चरित्रांत समावते. वर्गाची केवळ वर्गांतल्या वर्गातली जी चळवळ ती वर्गाच्या अंत:स्थ इतिहासांत समाविष्ट होते व इतर वर्गांशी जी घसट, ती बहिःस्थ इतिहासांत अंतर्भवते. महाजन, सामान्यजन, ब्राह्मण, शूद्र, जैन, क्याथोलिक, प्रोटेस्टट हे जे व्यक्तिसंघ त्यांना वर्ग किंवा जाति म्हणतात. त्यांचा आपापल्या वर्गांतला अंतस्थ जो व्यवहार त्याचा अंतर्भाव अंतस्थ इतिहासांत होतो; व इतर वर्गांशी व्यवहार बहिःस्थ इतिहासांत मोडतो. History of the Aristocracy in England or the Democracy in France, or the Oligarchy in Venice हीं वर्गेतिहासाचीं उदाहरणें आहेत. ज्या कोटींत मनुष्यांचे अनेक वर्ग आहेत परंतु राज्ययंत्राभावामुळें जे राष्ट्रत्वाप्रत पावलेले नाहींत, त्या कोटीला लोक म्हणतात. शंभर वर्षांपूर्वी मराठ्यांचें राष्ट्र होतें, सध्यां स्वराज्ययंत्राभावामुळें त्यांची गणना केवळ लोककोटींत करणें भाग आहे. ग्रीस व इताली ह्यांची सध्यां राष्ट्रांत गणना आहे: पन्नास पाऊणशें वर्षांपूर्वी त्यांनी नामना लोककोटींत होत असे. ह्या लोककोटीलाहि अंत:स्थ व बहि:स्थ इतिहास असतो. लोककोटीच्या पोटसमाजांची जी चळवळ ती अंत:स्थ व जुलमानें राज्य करणा-या परकी राष्ट्रांशीं जी हमरातुमरी, ती बहिःस्थ इतिहासांत पडते. राष्ट्र, उपकुल व कुल ह्यांच्याहि इतिहासाची अशीच द्विविध परंपरा आहे. उदाहरणार्थ, इंग्लंड हें राष्ट्र, इंग्लंड+वसाहती हें उपकुल, आणि सर्व ख्रिश्चन राष्ट्रें, हें कुल समजण्यास कांहीं फारशी हरकत नाहीं. इंग्लंडचा अंतस्थ इतिहास त्या बेटांतल्या चळवळीपुरता असतो: आणि इंग्लंडचा इतर राष्ट्रांशीं, लोकांशीं, वर्गांशी व इंग्रजेतर व्यक्तीशीं जो व्यवहार तो त्याच्या बहिःस्थ इतिहासांत गणला जातो. ख्रिस्ती राष्ट्रांतला आपापल्यांतला जो व्यवहार तो त्यांचा अंत:स्थ व्यवहार व ख्रिस्तेतर राष्ट्रांशी व लोकांशी जो व्यवहार तो त्यांचा बहि स्थ व्यवहार मोजला जातो. ख्रिस्ती राष्ट्रांचे आपापल्यांतले अन्योन्यव्यवहाराचे कायदे निराळे व ख्रिस्तेतर राष्ट्रांशी व लोकांशी वागण्याचे कायदे निराळे, अशी व्यवस्था प्रसिद्ध आहे. अर्थात् एक ख्रिस्तीराष्ट्रकुल मिनतवारीनें ईषद् व्यवस्थित रूपाप्रत येत आहे हें उघड आहे. दानव, असुर, मोगल, आर्य, आफ्रिकन, अमेरिकन, व पालिनेशियन अशीं सात प्रमुख कुलें सध्यां पृथ्वीवर आहेत. पैकीं कांही दुर्बल व कांही सबल आहेत. त्यांचे अंत:स्थ व अन्योन्य जे व्यवहार ते समग्रमानवेतिहासांत मोडतात. सजातीय अशी तदितर कोटी नसल्यामुळें, अखिल मानवेतिहासाला बहिःस्थ बाजू असूं शकत नाहीं.