Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

३०. कालाच्या विशिष्ट भागांत समानकालीन समाजांच्या पृथ्वीच्या पाठीवर काय उलाढाली चालल्या आहेत, तें पहाण्यास कालानुक्रमिक पद्धतीचा चांगला उपयोग होतो. पृथ्वीच्या विशिष्ट भागांत एक किंवा अनेक समाजांचे एकदम किंवा अनुक्रमानें काय उद्योग चालले आहेत, तें दैशिक पद्धतीनें कळतें. आणि सर्व पृथ्वीभर सर्व गतकालीं मानवसमाजाच्या सर्व कुळींनीं काय काय कृत्यें केलीं, तें समजणें कौलिक पद्धतीनें सुलभ होतें. अर्थात् अखिल मानवसमाजाचा इतिहास लिहिण्यास ही कौलिक पद्धतीच उत्तम ठरते. ह्या पद्धतीनें इतिहास लिहावयाचा म्हणजे मानवसमाजाच्या मुख्य कुलांच्या व उपकुलांच्या उलाढालींची अथपासून आतांपर्यंत विश्वसनीय हकीकत द्यावयाची. मानवसमाजाचीं बहुतेक सर्व उपकुलें ऐतिहासिक ऊर्फ पश्चात्प्रलयीन कालांत उद्भवलीं असून, स्थलोस्थलीं कांहीं काल स्थिर होऊन बरेंच सामर्थ्य आल्यावर, पृथ्वीवरील इतर भागांत पसरत आहेत. अमुक देश अमक्या उपकुलाचा आहे, असें विधान हजार पांचशें वर्षापुरतेंच तेवढें खरें असतें. पुढें पहावें, तर दुसरेंच उपकुल त्या देशांत वास्तव्य करून नांदत आहे, असें आढळून येतें. ही हालचाल अद्याप चाललीच आहे; व पृथ्वीवरील ज्या देशांत इंग्लिश, फ्रेंच, वगैरे लोक सध्यां नांदतांना आपण पहात आहों, त्यांत हजार पांचशें वर्षांनंतर दुसरींच कोणी उपकुलें नांदतांना दृष्टीस पडल्यास तत्कालीन इतिहासकारांस आश्चर्य वाटण्याचे फारसें कारण नाहीं. ह्या नियमाला अपवादक असें एक मात्र कुल आज आठ दहा हजार वर्षे एकाच स्थलाला चिकटून राहिलेलें दिसत आहे. तें भारतवर्षांतील आर्यकुल होय; हें कुल इतर उपकुलांप्रमाणें पश्चात्प्रलयीन नसून, पूर्वप्रलयीन कालापासून संस्कृत झालेलें आढळतें. ह्या थोर कुलानें मानवसमाजांतील इतर सर्व उपकुलांची बाल्यावस्थेपासूनचीं सर्व स्थित्यंतरें पाहिली आहेत; त्यांची प्रत्येकाची अनुक्रमानें दाट ओळख करून घेतली आहे; त्यांपैकीं अनेकांना दुर्बल किंवा नष्ट झालेलें देखिलें आहे; आणि इतकेंहि करून, म्लेच्छसंकर होऊं न देतां, शुद्ध वंशाचें बरेंच रक्षण केलें आहे. आर्यकुलाचें हें अलौकिक चरित्र अनार्यांच्या जसें मत्सरास तसेंच कौतुकासहि कारण झालेलें आहे.

३१. कौलिक पद्धतीचें ग्रहण केल्याविना अखिलमानवसमाजाच्या शाखांच्या व उपशाखांच्या जाळ्याची गुंतागुंत यथास्थित उलगडत नाहीं, ही तळहातींच्या आवळ्याप्रमाणें स्पष्ट गोष्ट आहे. अखिल मानवसमाज सोडून एकेकट्या उपशाखांचा किंवा उपकुलांचा इतिहाच तर जात्याच कौलिक असतो. इंग्रजांचा इतिहास म्हणजे इंग्रज उपकुलाचा इतिहास व मराठ्यांचा इतिहास म्हणजे मराठा उपकुलाचा इतिहास मुळांतच कौलिक असल्यामुळें, एकेकट्या कुलाचा इतिहास लिहितांना कौलिक पद्धति घ्यावी किंवा न घ्यावी हा वादच रहात नाहीं. कुलाची शहानिशा झालेलीच असते व झाली नसल्यास, झाली आहे असें समजून चालावें लागतें. इंग्रज आर्य असोत वा अनार्य असोत, त्यांचे राष्ट्रीय चरित्र त्यांच्यापुरतें सदा खरेंच असतें. राष्ट्रीय चरित्र गातांना आपण कोणत्या कुलाचा पवाडा रचित आहो अशी विवक्षा आली, अर्थात् मानवसमाजाच्या कोणत्या कुलाचा उत्कर्ष होत आहे असा प्रश्र आला, म्हणजे दृष्टींत फरक होऊं लागतो व आर्यानार्यत्वानें मानवेतिहासाचें सत्यासत्यत्व भासमान होऊं लागतें. अशा प्रसंगी केवळ राष्ट्रीय इतिहास सोडून सार्वकौलिक इतिहासाच्या प्रांतांत आपण प्रवेश करीत आहों, हें उघड आहे. तेव्हां एकेकट्या कुलाचा व तें कूल ज्या देशाला ज्या काळीं आपला म्हणत असतें त्या तत्कालविशिष्ट देशाचा इतिहास रचतांना कौलिक पद्धतीचा स्वीकार झालेलाच असतो, अर्थात् तिच्या ग्राह्याग्राह्यत्वाची फारशी आवश्यकता रहात नाहीं. बिलकुल आवश्यकता रहात नाहीं असें मात्र समजण्यांत हांशील नाहीं. कारण एकेकटें उपकुल जरी झालें तरी त्याला इतर उपकुलांचा स्पर्श अगदी होत नाहीं, असें आजपर्यत झालें नाहीं. सध्यांच्या इंग्लिश उपकुलाचा इतिहास घ्या. पूर्वप्रलयीनकुल, केल्टकुल, ब्रिटिशकुल, डानिशकुल, साक्सनकुल, व नार्मन फ्रेंचकुल, या सर्वांच्या झगड्यानें सध्यांचे इंग्लिश उपकुल बनलें आहे व तें वेल्श, स्कॉच व आयरिश उपकुलांना खाऊन व जिरवून टाकण्याचा हल्लीं प्रयत्न करीत आहे. ह्याचा अर्थ असा कीं, इंग्लिश उपकुलाचा अथवा प्राधान्यानें इंग्लंडचा इतिहास देतांना उपरिनिर्दिष्ट कुलांचाहि इतिहास देणें भाग पडतें. फार काय सांगावें, ब्रिटिश बेटांचा अंतस्थ इतिहास म्हणजे ब-याच अंशानें ह्या सर्व उपकुलांच्या भांडाभांडीचा इतिहास आहे. पृथ्वीवरील इतर राष्ट्रांशी इंग्लंड्चा जो संबंध येतो तेवढ्यापुरतें मात्र ह्या परस्पर भांडणा-या उपकुलसंघाला इंग्लंड अथवा इंग्लिश उपकुल अशी संज्ञा सोईखातर देतात. सारांश, एकेकटें राष्ट्र म्हणून ज्याला आपण नांव देतों, त्याचा इतिहास लिहितांनाहि कौलिक पद्धतीला सोडून देतां येत नाहीं. जोंपर्यंत पृथ्वीतलावर कुलभेद आहे, तोपर्यंत कौलिक पद्धतीनें इतिहास लिहिणें अपरिहार्य आहे.