Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२७. जगाच्या इतिहासाचें खरें रूप कसें असावें, तें वरील विवेचनावरून स्पष्ट झालें आहे. (१) वर्तमान क्षणापर्यंतचा सर्व भूतकाल हा त्याचा काल; (२) पृथ्वीवरील सर्व देश त्याचें स्थल; (३) आणि नष्ट व विद्यमान सर्व मानवसमाज त्याचे विषय समजले पाहिजेत. तसेंच, (४) स्वतःच्या किंवा समाजाच्या किंवा दिशेच्या किंवा स्वकीय कालाच्या अभिमानाला पडून, कोणत्याहि प्रकारच्या पूर्वग्रहांना थारा देतां उपयोगी नाहीं. शिवाय, नीति, धर्म वगैरे शास्त्रांतील चलग्रहांच्या अनुरोधानें शुभाशुभ किंवा इष्टनिष्ट मतांचें अधिष्ठान मनांत कल्पून हकीकतीवर अभिप्राय देण्याच्या किंवा हकीकत इष्टनिष्ट भासविण्याच्या खोट्या भरीस पडतां कामा नये. (५) निर्मत्सर, तटस्थ, निरहंकर व निर्लेप वृतीनें झाली असेल ती हकीकत प्रामाणिकपणानें दिली पाहिजे. असल्या हकीकतीला खरा व विश्वसनीय इतिहास म्हणतात. जगाचा असा इतिहास यूरोपीयन इतिहासकारांच्या हातून अद्याप लिहिला गेला नाहीं. चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी इंग्लंडांत राइट नांवाच्या मनुष्यानें Universa History म्हणून एक जगाचा इतिहास लिहिला. त्यांत Sacted, Prophane, Ancient, Modern वगैरे इतिहासाचे भेद सांगून, स्थलोस्थलीं पूर्वग्रहात्मक असतील नसतील तितके सर्व दोष केलेले आहेत. चाळीस वर्षांपूर्वी इंग्लंडांत इतिहासाची अशी रानटी स्थिति होती. तींतून सुटण्याचा कांहीं जर्मन इतिहासकार अलीकडे प्रयत्न करीत आहेत. अगर्दी अलीकडला असा जगाचा इतिहास हेल्मोल्ट नामक जर्मन गृहस्थाचा होय. याच्या इतिहासांत व राईटच्या इतिहासांत यद्यपि जमीनअस्मानाचें अंतर आहे, तत्रापि, तोहि पूर्वग्रहाच्या दोषांपासून अगदीं अलिप्त नाहीं. शिवाय, इतिहासलेखनप्रारंभीं त्याला व त्यांच्या साहाय्यकर्त्यांना टिळकांचा ध्रुवसिद्धान्त माहीत नसल्यामुळें त्याचाहि इतिहास सध्यांच जुनाट झाल्यासारखा आहे. टिळकांच्या ध्रुवासिद्धान्तानें इतिहासांत फारच मोठी क्रांति झालेली आहे. (१) मानवसमाजाचा ऐतिहासिक काल प्रलयाच्या मागें गेला. त्यामुळें रोम, ग्रीस, इजिप्त, बाबिलोन, असुरिया, सुमेर, इलम, वगैरे देशांचे इतिहास केवळ अर्वाचीन भासूं लागलें. (२) पूर्वप्रलयीनकालीं कांहीं मानवसमाज सुसंस्कृत होते, असें म्हणणें प्राप्त झालें. त्यामुळें, मनुष्यांची मूळची वन्यावस्था होती, वगैरे पूर्वग्रह -जे यूरोपीयन इतिहासकार सत्य मानीत-खोटे ठरले. (३) यूरोपांतील रशियन, दस्य, देन, नॉर्स, वगैरे समाज मूळ कोठून आले असावे, हा जो संशय होता तो फिटण्याच्या मार्गाला लागला. पूर्वप्रलयीनकालीं यूरोपांतील हे समाज आर्यांच्या मेरु पर्वताभोंवतालील प्रांतांत रहात असून, ह्याचें व आर्यांचें म्हणजे देवांचें वितुष्ट असे, असा सिद्धात करण्याकडे मनाची प्रवृति होते. (४) हिमप्रलयाच्या वेळीं आर्यांप्रमाणें ह्याहि अनार्य समाजांतील कांही लोक पश्चिमेकडे निसटून गेले. (५) पूर्वप्रलयीनकालीं भूमीची रचना सध्यांच्याहून निराळी असावी. कदाचित् पुराणांत वर्णील्याप्रमाणें भूमि सप्तद्वीपात्मक असावी. (६) अमेरिकन, इंडियन,फिजियन व ऑस्ट्रेलेशियन लोक प्रलयामुळें तुटून एकीकडे पडले. अशी नाना प्रकारची दुरुस्तीं इतिहासाच्या कल्पनांत ध्रुवसिद्धान्ताच्या प्रणयनानें अवश्य होणार आहे. इतर शास्त्रांत काय काय दुरुस्त्या कराव्या लागतील तें सांगण्याचें हें स्थल नसल्यामुळें, त्यांचा प्रपंच येथें करीत नाहीं.