Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१८२] श्री. २४ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. गुंटुराकडील इंग्रजी दोन पलटणें सरदारसुद्धां रुकसत बेदराकडे जाण्याची होऊन रवाना झालीं. मीरअलम यानींही पलटणासमागमें जावें हा सिद्धांत ठरून रुखसत होणार हें समजल्या वरून नबाबास विचारिलें कीं, मीरअलम बहादूर रुखसत होतात ऐसें ऐकिलें. नबाबानीं सांगितलें कीं, इंग्रजी पलटणसमागमें यांचें असणें जरूर जाणून छ १० रोज गुरुवारीं यांचे रुखसतीचा नेम आहे. ह्मणोज बोलण्यांत आलें. त्यास मीरअलम यांचे जाण्याचें कारण इंग्रजी पलटणाची रवानगी, तेव्हां त्यानीं समागमें असण्यांत उपयोग. दुसरें इसामिया आले. त्यानीं कित्यक सरदार कामकाजाविषयीं दिलदेही करीत नाहींत, इत्यादि समजावण्याचे प्रकार समजाविले. मीरअलम गेले असतां कोणाचें ध्यान कसें हें समजेल. तिसरा प्रकार कदाचित् अलीज्याह निघोन जातील याजकरितां दुरुखा फौज असावी. इंग्रजी पलटणें दोन, याशिवाय फौज घेऊन बेदराचे तळघाटाकडे मीरअलम यांनीं असावें. वरतें मुसारेमू वगैरे यानीं रहावें; व मीरअलम यांच सलाहानें सा-यांनीं चालावें. याप्रमाणें ठरून यांची रुखसत ठरली. छ १० तेरखेस आज रुखसत होऊन जातील. र।। छ १० रा।वल. हे विज्ञापना.