Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२२] श्री. २६ जून १७९५.
विज्ञापना ऐसीजे. नवाब बोलले कीं, तुह्मीं गेले तेवेळेस तुह्मांस सांगितलें होतें कीं सोडचिठ्या तालुक्याच्या आपलेबरोबर घेऊन याव्या, त्या अद्याप आणल्या नाहींत, मुलुखाची खराबी फार झाली, किस्तीचा तगादा करितां कित्येक बाबती आमचे सरकारच्या फडच्या होणें आहेत, त्याची काय वाट ? मामलतीचा ऐवज तुमचा किती होतो हें पाहणें आहे, जप्तींत ऐवज गेला आहे तो मजूरा देणें, याचा उलगडा कसा होतो आणि करिता ? सांगावयाचें उत्तर दिलें जे, सोडचिठ्या तयार झाल्या, आज उद्यां रवाना होतील, किंवा झाल्या असतील, रघोत्तमराव यांचीच खबर आली, पुसून घ्यावें, कामें कित्येक फडचे होणें त्यास वाजवी असतील तीं काढावीं, जाबसाल करून हिशेब पाहणें, त्यास करारांतच आहे, हिशेबीं जें जिकडे अधिक उणें निघेल तें द्यावें घ्यावें, मुजाका नाहीं, परंतु किस्तीस इतकी षर्त कशास पाहिजे, याजमुळें टाळाटाळ दिसते, याजकरितां कराराप्रमाणें अमलांत यावें, आजच असें आपण , ह्मणतात तेव्हां त्यांचे मनांत काय येईल, सोडचिठ्याविषयीं गुंता असला तर लिहून पाठवितों. तेव्हां बोलले कीं, लवकर चिठ्या आणवाव्या, किस्तीचे ऐवजास न्याय दाद झाली पाहिजे, लावणीचे दिवस, मामलेदारास सोडचिठ्या देऊन खातरजमा करावी, तेव्हां ऐवजास ठिकाणा होईल, मषीरुलमुलूक यानें करोड रुपये खर्च केला, शिल्लक पहावी तर कांहींच नाहीं, आसदअल्लीखान याजकडे लाखो रुपयांचा हिशेब येणें तो बगला उचलून दाखवितो, जें होतें तें शिपायास दिलें, मज पाशीं काय आहे? असें स्पष्ट बोलणें, यास कसें करावें, त्या चिठ्या लवकर आणवाव्या, ह्मणजे तजवीज करावयास येईल. लवकर आणवितों ह्मणून उत्तर दिलें. सारांश टाळाटाळीच्या गोष्टी! चिठ्या आल्या ह्मणजे लवकर ऐवजाची तरतूद करतील असें दिसत नाहीं. परंतु आपलेकडून बोलावयास नीट चिठ्या दिल्या. आतां कां हप्त्याचा ऐवज येत नाहीं. यास्तव चिठ्या पाठवावयासी आज्ञा व्हावी. र॥ छ ८ जिल्हेज. हे विज्ञापना.