Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
खरें म्हटलें असतां शिवकालीन बखरींतील एकोनएक वाक्यांचे पृथक्करण, वर्गीकरण व एकीकरण करून ह्या त्रिविध करणीनें ऐतिहासिक सत्याची कशी निष्पति होते, काय सिद्धांत उत्पन्न होतात, काय शंका निघतात, हें बारीक तपशीलवार असें दाखवून देणें जरूर आहे. परंतु शिवकालीन अस्सल ऐतिहासिक लेख मिळण्याची थोडीबहुत आशा जोंपर्यंत कायम आहे तोंपर्यंत हा प्रयत्न करणें अप्रस्तुत, कदाचित् अनावश्यक, आहे असें वाटल्यावरून प्रस्तुत स्थलीं बखरींतील व ग्रांट डफच्या इतिहासांतील कांहीं शंकाग्रस्त स्थानें काढून दाखविण्यावरच समाधान मानून रहाणें भाग पडलें. अस्सल पत्रे मिळण्याची आशा जर निष्फळ झाली अथवा थोडीफार पत्रें मिळून तेवढ्यानें जर यथास्थित काम भागलें नाहीं, तर पुढेंमागें वरील प्रयत्न साद्यन्त करणें जरूर होईल. बखरीतील शंकाग्रस्त स्थानांची यथास्थित निवृत्ति करावयाला अस्सल पत्रांचाच तोडगा पाहिजे आहे. तो जर मिळाला नाहीं, तर कितीहि वर्गीकरण, कितीहि पृथक्करण व कितीहि एकीकरण केलें, तरी मनाचें समाधान होणार नाहीं. फारच मजल मारिली, तर आद्यतन ग्रीक किंवा रोमन इतिहासापेक्षां शिवकालीन मराठ्यांचा इतिहास जास्त विश्वसनीय होईल, इतकेंच. ह्यापलीकडे ह्या त्रिविध करणीपासून जास्त फलप्राप्ती होणार नाहीं, उल्लेख, वगैरे गौण आधारांच्या साहाय्यानें रचिलेला आहे. साक्षात् तीच गती नाहीं, तरी बहुतेक त्याच्या सारखीच गती बखरकारांच्या लिहिण्याचा मेळ घालण्याच्या कृतीनें आपल्या इकडे होणार आहे. बखरकारांच्या लिहिण्याचा मेळ घालण्याचा खटाटोप करणें म्हणजे अप्रमाण साक्षीदारांच्या कैफियतींची संगती लावण्याच्या निष्फळ उद्योगाप्रमाणेंच अल्पफलप्रद आहे. बखरकार एकेक दोन दोन वेळाच तेवढें चुकलेले असते तर त्यांच्या प्रामाण्याची इयत्ता बरीच चढली असती. परंतु दुर्दैवानें प्रत्येक बखरकार शेकडों वेळां शेंकड़ों ठिकाणीं चुकला असल्याकारणानें त्या प्रत्येकाच्या प्रामाण्याची इयत्ता शून्यलब्धीपर्यंत खोल गेलेली आहे. अनेक प्रसंगांची एका ठिकाणी गफलत करणें, वर्णनाचा एकच मासला अनेक प्रसंगांत आणणें, कालाचा व स्थलांचा बरोबर किंवा मुळींच निर्देश न करणें, व्यक्तींच्या नांवांचा अजिबात लोप करणें, अस्पष्ट व पुसटतीं विधानें करणें, कालाचा व स्थलाचा विपर्यास करणें, असें बहुतेक सर्व प्रकारचे दोष ह्या बखरींतून झालेले आहेत. ह्यामुळें बखरकारांनीं लिहिलेल्या ख-या गोष्टीहि, इतर बहिःप्रमाणांच्या अभावीं, ख-या धरून चालणें धोक्याचें काम आहे अशी मनाची प्रवृत्ति होते. ह्या प्रवृत्तीचा परिणाम असा होतो कीं बखरींतींल ख-या गोष्टींपासून खोट्या गोष्टी निवडून काढितां येत नाहींत व बखरींतील अमुक मजकूर निश्चयानें खरा असें म्हणण्याचें धाडस सहसा करवत नाहीं. ग्रांट डफची जी मोठी चूक झाली आहे ती हीच होय कीं, बखरींतील जो तपशीलवार मजकूर निश्चयानें खरा आहे असें म्हणवत नाहीं, तो, तो खरा धरून चालण्याचें धाडस करतो. शिवाजींने तोरणा किल्ला शके १५६८ त घेतला, शहाजी शके १५७१ त अटकेत पडला, चंद्रराव मो-याच्या पराभवाचा अमकाच वृत्तांत खरा, अफजलखानी प्रकरणाचें आपण देतों तेंच वृत्त विश्वसनीय, शिवाजीला चार बायका होत्या, शहाजी शके १५८६ त वारला, वगैरे जो मजकूर डफनें लिहिला आहे तो अविश्वसनीय आहे, ह्याचें कारण ग्रांट डफचें उपरिनिर्दिष्ट धाडसच होय. मिळाल्या होत्या त्या बखरींतील अमुक एक प्रकरणासंबंधी अमुक एक मजकूर संभाव्य असला म्हणजे खरा धरून चालावें असला धोपट व अंधळा मार्ग ग्रांट डफनें स्वीकारलेला आहे. पद्धतवार प्रमाणें लावून आपला मजकूर त्यानें पारखून व निवडून घेतलेला नाहीं. अर्थात् ग्रांट डफच्या बखरीवर बिनधोक विश्वरस ठेवण्यांत तात्पर्य नाहीं. बखरी व ग्रांट डफ विश्वसनीय आहेत असा पक्का ग्रह घेऊन एका मराठा ग्रंथकारानें अन्योन्याश्रयत्वाचा आपल्यावर दोष आणून घेतला आहे. (१) ग्रांट डफ विश्वसनीय आहे, (२) मराठी बखरी बहुतेक विश्वसनीय आहेत, (३) बखरींतील मजकूर डफच्या बखरींतल्यासारखाच आहे, (४) तेव्हां डफ विश्वसनीय आहे, व बखरीहि बहुतेक विश्वसनीय आहेत, व (५) ग्रांट डफनें नवीन कांहीं करावयाचें ठेविलें नाही, असा कोटिक्रम ह्या ग्रंथकाराचा आहे (लक्ष्मणराव चिपळोणकरकृत मराठ्यांचा इतिहास, प्रस्तावना). मराठी बखरींतून उतारे घेऊन, विशेष पूसतपास न करतां ग्रांट डफनें आपला ग्रंथ बनविला, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली म्हणजे वरील कोटिक्रमांतील पांच वाक्यें एकाच वाक्याचीं निरनिराळीं रूपें आहेत हें स्पष्ट होईल. लक्ष्मणराव चिपळोणकरांची मोठी चूक हीच आहे कीं, ते बखरी व डफ विश्वसनीय समजतात. वास्तविक पाहातां, दोन्ही विश्वसनीय नाहीत. दोन्ही पदोपदीं संशयांनीं ग्रस्त झालेलीं आहेत. येणेंप्रमाणें बखरकारांच्या व ग्रांट डफच्या ग्रंथांच्या प्रामाण्याची इयत्ता आहे.
परीक्षा करतांना, बखरींचें प्रामाण्य व ह्या प्रामाण्याची इयत्ता ह्यासंबंधीं मीं जी विधानें केलीं आहेत ती संकलित येथें देतों.
(१) बखरकारानीं कालविपर्याचा दोष केला आहे.
(२) त्यांनीं स्थलविपर्यासाचा दोष केला आहे.
(३) त्यांनीं व्यक्तिविपर्यासाचा दोष केला आहे.
(४) त्यांनी ह्या तिहींचा प्रत्येकीं व सामग्राने लोप करण्याचा दोष केला आहे.
(५) त्यांना कोणत्याच प्रकारचें शास्त्रीय शिक्षण नव्हतें.
(६) त्यांना आपले विचार नीट प्रगट करितां येत नाहींत.
(७) व त्यांना सामान्य सिद्धांत स्पष्टपणें सांगण्याची ऐपत नाहीं.