Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शिवाजीनें खून केला ही गोष्ट कबूल करून तिचें मुख्य कारण मराठ्यांची त्या वेळची नीतिमत्ता होय असा राष्ट्रापमानकारक व व्यतिगुणापकर्षक पुरावा रा. चिपळोणकर यांनी दिला आहे व ग्रांट डफनें केलेली शिवाजीची व भूत व वर्तमान मराठ्यांची निंदा कांहीं कारण नसतां, कबूल केली आहे; परंतु असला अयोग्य प्रकार करण्याचें कांहीएक कारण नव्हतें. अफजलखानाला मारण्यापेक्षां अफजलखानास कैद करणें शिवाजीच्या जास्त हिताचें होतें ही गोष्ट लक्षांत घेतली असतां, वध करण्यास अफजलखानानें शिवाजीला भाग पाडलें हीच हकीकत विश्वसनीय दिसतें. त्या काळच्या चालीप्रमाणें दोघेहि हत्यारबंद होते. अफजलखानानें प्रथम शस्त्र चालविल्यावर शिवाजीनें गप्प कां बसावें तें सांगणे कठीण आहे. कुत्ता ह्या शब्दाचीहि फोड रामदासांनी मोठी नामी केली आहे. “धर्मद्वष्टे तेवढे कुत्ते” म्हणून ते दासबोधांत लिहितात. असो. बखरकारांचा व तवारिखकारांचा आशय नीट समजून न घेतल्यामुळें इग्रंज ग्रंथकारांच्या हातून ज्या अनेक चुका व जे अनेक गैरसमज झाले आहेत त्यांपैकीं कांहींचें दिग्दर्शन वर केलें आहे. शिवाजीचें स्वभाववर्णन बखरकारांनीं व रामदासांनीं कसें केलें आहे तें दाखवून देतांना हा उपवाद मध्येंच उपस्थित झाला. मराठा वीरपुरुषांवर परकीय लेखकांनी लादलेले दोष अलीकडील दहावीस वर्षांत महाराष्ट्रांत कोणी खरें मानतो म्हणून हा वाद उपस्थित केला अशांतला भाग नव्हे. ज्या अर्थी परकीय लेखकांनीं मराठ्यांवर नसते दोष लादण्याचे श्रम घेतले आहेत त्या अर्थी त्यांचें निरसन करण्याची मेहनत कोणी तरी करणें अवश्यच झालें होतें म्हणुन ही लहानशी झटापट सहजासहजीं आटपून घेतली आहे. शिवाजीचें गुणवर्णन करण्यांत कालस्थलादि निर्बंधांनीं बखरकार विशेष बांधले गेले नसल्यामुळे, त्यांच्या हातून हें काम बरेंच चांगलें साधलें गेलें आहे. आंता तें त्यांच्या हातून सशास्त्र साधलें गेलें नाहीं हें तर उघडच आहे. परंतु शिवाजीच्या आयुष्यांतील प्रसंगांच्या वर्णनापेक्षां त्यांच्या गुणांचें वर्णन ह्या बखरकारांनीं जास्त विस्तृत केलें आहे, त्यामुळें इतिहासजिज्ञासूंचें समाधान सापेक्ष दृष्टीनें अर्थात् जास्त होतें. बाकी हाहि भाग शंकांनीं बहुत ठिकाणीं ग्रस्त झालेला आहे. शिवाजींच्या शीलासंबंधी, दानतेसंबंधी, स्वभावासंबंधीं व कर्तृत्वासंबंधीं जी कांहीं थोडीफार माहिती ह्या बखरकारांनीं दिली आहे त्यापेक्षां आणखी माहिती मिळाल्याशिवाय इतिहासजिज्ञासूंची भूक तृप्त होणार नाहीं. ही माहिती ह्यापुढें बखरींतून मिळणें अशक्य आहे. शिवकालीन पत्रव्यवहार मुबलक सांपडल्याखेरीज माहितीची उपलब्धि व्हावी तशी, किंवा थोडी देखील, होणें असंभाव्य आहे. ह्या कालांतील पत्रव्यवहार जो थोडा मला मिळाला आहे त्यावरून असें अनुमान करतां येतें कीं, कालांतरानें व प्रयत्नानें शिवाजी महाराजांचा इतिहास मुद्देसूद, तारीखवार व सविस्तर जुळवितां येईल. मात्र अठराव्या शतकांतील पत्रव्यवहार मिळण्यास जितकें सोपें जात आहे तितकेंच सतराव्या शतकांतील पत्रव्यवहार मिळण्यास कठीण जाणार आहे.