Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
(४) “पेशवाईच्या अखेरची अखबार” हें ह्या खंडातील तिसरें प्रकरण आहे. पुणें येथील रामाजी नाईक भिडे यांच्या दप्तरांतील हे प्रकरण आहे. ह्यांतील विषय त्याच्या नांवावरूनच कळून येण्यासारखा आहे. बाहेरगांवच्या सरदारांना, दरखदारांना व सावकारांना पुण्यास जें जें कांहीं होईल त्याची बातमी देणारे अखबरनवीस असत; त्यांपैको एकाने ही अखबार सजविली आहे. अखबारी बखरीचें पूर्वरूपच होत. ही अखबार पूर्णपणें विश्वसनीय आहे.
(५) “रमास्वयंवर” हें ह्या खंडांतील चवथें प्रकरण होय. ह्याचा कर्ता कोण तें सांगतां येत नाहीं. कदाचित् बाळ सदाशिव वाळिंबे हा ह्या त्रोटकाचा कर्ता असावा असें उपसंहारावरून वाटतें. ह्यांत सवाईमाधवरावाच्या लग्राचें लहानसें प्रास्तविक वर्णन आहे. हें काव्य पुणें येथील श्रीमंत तुळशीबागवाले ह्यांच्या दप्तरांतील आहे. काव्य जसें लिहिलें होतें तसेंच छापले आहे. शुद्धाशुद्ध पहाण्यास दुसरी प्रत मिळणें बहुशः अशक्य असल्यामुळें हा मार्ग स्वीकारला आहे.
(६) “शके १७३८” सालांतील हकीकत” हें ह्या ग्रंथांतील पांचवें प्रकरण आहे. ह्याचा कर्ता कोण तें समजत नाहीं.
(७) “पेशव्यांची वंशावळ” हें ह्या ग्रंथांतील सहावें व शेवटलें प्रकरण आहे. ह्याचा कर्ता कोण तें माहीत नाहीं.
ह्या खंडांत छापिलेल्या सहा प्रकरणांपैकी पहिलें व चवथें खंड वगळलें असतां, बाकी जी चार प्रकरणें राहतात तीं बखर ह्या सदराखालीं मोडण्यास हरकत नाहीं. ह्या बखरी अस्सल पत्राप्रमाणें पूर्णपणें विश्वसनीय आहेत व म्हणूनच त्या मीं येथें छापिल्या आहेत. (१) पेशवाईचा इतिहास जातीनें माहीत असणा-या अशा थोर व बहुश्रुत लोकांपुढें ती बखर जावयाची असल्यामुळें व ती सवाई माधवरावाकरितां लिहिलेली असल्यामुळें तींत विश्वसनीय अशीच माहिती दिलेली आहे. (२) “शके १७३८ सालांतील हकीकत” दफात्यावरून उतरून घेतली असल्यामुळें ती विश्वसनीय आहे. (३) ‘पेशवाईच्या अखेरची अखबार’ समकालीन लेखकानें आपल्यासमोर होत असलेल्या रोजच्या प्रसंगाची हकीकत म्हणून लिहिली असल्यामुळें विश्वसनीय आहे. (४) “पेशव्यांची वंशावळ” मोठ्या काळजीनें दफात्यांतून जुळविली असल्यामुळें पूर्णपणें विश्वसनीय उतरली आहे. विश्वसनीय बखरी कशा निर्माण होतात ह्याचे ह्या चार बखरी मासलेच आहेत. समकालीन तज्ज्ञ लोकांपुढे समकालीन योग्य लेखकानें समकालींन गोष्टीचें वर्णन स्वदृष्टीनें पाहून केलें असल्यास विश्वसनीय ठरतें, किंवा योग्य लेखकानें योग्य आधारावरून अफरातफर न करता मजकूर जुळविला असल्यास तो विश्वसनीय उतरतो. ही कसोटी शिवकालीन बखरींना लाविली असतां त्या विश्वसनीय कां नाहींत, हें समजून येणार आहे. शिवकालीन बखरींत विश्वसनीय अशी मानिली जाणारी बखर म्हटली म्हणजे सभासदी बखर होय. तिच्यांत मुख्य गोम ही आहे कीं ती केवळ स्मृतीवर हवाला देऊन लिहिलेली आहे. शिवाजीची जेवढी कारकीर्द सभासदानें प्रत्यक्ष पाहिली होती तिचें वर्णन त्यानें जरासें विस्तृत केलें आहे, व जी दारकीर्द त्याला समजूं लागल्याच्या अगोदर संपली तिचें वर्णन त्यानें अत्यंत त्रोटक केलें आहे. केवळ स्मृतीवर हवाला ठेवल्यामुळें विस्तृत वर्णंनाचा भाग व त्रोटक वर्णनाचा भाग, दोन्हीहि अविश्वसनीय व संशयित उतरलेले आहेत. केवळ स्मृतीवर हवाला ठेवून मुद्देसूद व क्रमवार हकीकत लिहिली जाणें बहुतेक अशक्य असतें. मानवी स्मृतींत सामान्य गोष्टींचीं टिपणें टांचलीं जातात. क्रमवार, तपशीलवार, मुद्देसूद व तारीखवार हकीकतीचा बोजा सहन करण्याचा व वर्षोनवर्षे वहाण्याचा जोम मानवी स्मृतींत नाहीं. सभासदी बखर बहुत स्थलीं अविश्वसनीय आहे त्याचें कारण हेंच आहे. इतर शिवकालीन बखरकार विषम कालीन असल्यामुळें, जुन्या टिपणांचा उपयोग करून घेण्याचें सामर्थ्य त्यांच्यांत नसल्यामुळें, दफतीं व पत्रें जितकीं मूबलक मिळावीं तितकीं त्यांना मिळालीं नसल्यामुळें व कोणत्याहि प्रकारच्या शास्त्रीय शिक्षणानें त्यांची बुद्धि कसली गेली नसल्यामुळें, त्यांच्या हातून हे असले अर्धवट लेख उतरले गेले आहेत. केवळ जुन्या टिपणांचे उतारे देऊन हे बखरकार स्वस्थ बसले असते तर तें बरेच विश्वसनीय ठरतें. परंतु, जुन्या टिपणांच्या उता-यांत आपली वेडीबागडी मखलाशी करण्याची आवश्यकता बखरकार ह्या नात्यानें त्यांना अपरिहार्य झाल्यामुळें अद्भूत प्रसंगांनीं तुडुंब भरलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्राचें रूप आधुनिक वाचकांना ह्या कुलेखकांनीं कोरडें ठणठणीत असें करून दाखविलें आहे.