Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
शिवाजी ही विभूति महाराष्ट्रांत कोणतें कार्य साधण्याकरितां अवतीर्ण झाली? लोकांच्या स्वातंत्र्याचा अपहार करून दिग्विजय करण्याकरितां शिवाजी उत्पन्न झाला? किंवा स्वराज्य व स्वधर्म ह्यांचे सरंक्षण करण्याकरितां त्याचा अवतार होता? स्वराज्य व स्वधर्म ह्यांचें सरंक्षण करण्याचा उच्च, उदात्त व पवित्र हेतु मनांत धरून शिवाजीचें प्रयत्न चालले होते हें सर्वत्र मान्य आहे. तेव्हां परकीय लोकांचें स्वातंत्र्य हरण करणा-या, अर्थात् एका नीच, दुष्ट व अपवित्र हेतूनें प्रोत्साहित झालेल्या अलेक्झांडर, सीझर किंवा नेपोलियन ह्या दिग्विजयी पुरुषांशी शिवाजीची तुलना करणें अयोग्य आहें. धैय, शौर्य, पराक्रम, कर्तृत्वशक्ति, इत्यादि गुणांसंबंधानें शिवाजीशीं ह्या पुरुषांची तुलना केली असतां चालेल. परंतु हेतूच्या पवित्रतेसंबंधीं जेथें विचार करावयाचा असेल, तेथें ह्या दिग्विजयी व दुष्ट पुरुषांची डाळ शिजणार कशी? अशा ठिकाणीं स्वातंत्र्यार्थ खटपट करणा-या पवित्र महापुरुषांचाच तेवढा प्रवेश होणें योग्य आहे. हालंडचा वुइल्यम दि सायलेंट किंवा युनायटेड स्टेटसचा वाशिंग्टन ह्या पुरुषांची तुलना शिवाजीशी केली तर एकवार चालण्यासारखें आहे. आतां पाश्चात्य महापुरुषांशी तुलना केल्यानेंच म्हणजे शिवाजीच्या महत्त्वाची इयत्ता ठरणार आहे असा प्रकार बिलकूल नाहीं. शिवाजीची योग्यता स्वयंसिद्ध आहे. अलेक्झांडरप्रमाणें शिवाजीनें आपल्या स्नेह्यासोबत्यांस ठार मारिलें नाहीं; सीझराप्रमाणें आपल्या बायकोस सोडून दिलेलें नाहीं; बोनापार्टनें डफ डांगियाचा जसा अन्यायानें वध केला तसा शिवाजीनें कोणाचा केला नाहीं; क्रामवेलनें ऐरिश लोकांस सरसहा ठार मारिले, त्याप्रमाणे शिवाजीनें कोण्या प्रांतांतील लोकांची कत्तल उडविली नाही; फ्रेडरिक दि ग्रेटप्रमाणें शिवाजीच्या आंगीं नीच दुर्गुण नव्हते. शिवाजीचें वर्तन न्यायाचें, नीतीचें, पराक्रमाचें, स्वधर्मपरायणतेचें व परधर्मसहिष्णुतेचें होते. दोन चारशें लढाया मारून त्यांत विजयी होणें; तीन चारशे किल्ले मैदानांत, डोंगरावर व समुद्रतीरावर बांधणे; नवीन सैन्य तयार करणें; नवीन आरमार निर्मिणें; नवे कायदे करणें; स्वभाषेला उत्तेजन देणें; स्वतः पद्यरचना करणें; कवींना आश्रय देणें; नवीं शहरें वसविणें; स्वधर्माचें सरंक्षण करणें; गोब्राह्मणांचा प्रतिपाल करणें, सारांश, स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे; ह्या लोकोत्तर कृत्यानीं जर कोण्या पुरुषानें ह्या भूमंडळाला अक्षय ऋणी करून ठेविलें असेल तर तें शिवाजीनेंच होय. शिवाजीची खाजगी वर्तणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते कीं, त्याच्याशीं तुलना करावयास जी जी म्हणून व्यक्ती घ्यावी ती ती, ह्या नाही त्या गुणानें शिवाजीहून कमतरच दिसेल. ह्या अवतारी पुरुषासंबंधीं लिहिता लिहितां समर्थ म्हणतात “तयाचे गुणमहत्त्वासी तुलना कैची? यशवंत, कीर्तिवंत, व सामर्थ्यवंत, नीतिवंत, जाणता, आचारशील, विचारशील, दानशील, कर्मशील, सर्वज्ञ, सुशील, धर्ममूर्ति, निश्चयाचा महामेरु, अखंड निर्धीरी, राजयोगी,” नानापरीचीं विशेषणें शिवाजीला रामदासांनीं लाविलीं आहेत. निस्पृही व स्पष्टवक्त्या अशा समकालीन ग्रंथकारानें हे गुणवर्णन केलेलें आहे हें लक्षात घेतलें असतां शिवाजीच्या अंगी असलेल्या जाज्वल्य गुणांच्या इयत्तेचा अंदाज सहजासहजीं करतां येतो व कित्येक इंग्रज व मुसलमान बखरकारांनीं ह्या महापुरुषाची निंदा केलेली पाहून त्यांच्या परगुणासहिष्णुतेबद्दल तिरस्कार उत्पन्न होतो व त्यांच्या हृदयांतील कुत्सितपणाचा ठाव घेण्यास संधी मिळते. कुत्ता, मूसक, सैतान, गनीम वगैरे अपशब्द योजिणा-या मुसलमान तवारिखकारांचे लेख प्रस्तुत कोणी फारसे वाचीत नाहीं, तेव्हां त्यांच्याबद्दल येथें कांहीं लिहिलें नाहीं तरी चालण्यासारखें आहे. इंग्रज लेखकांसंबंधीं मात्र इतकें औदासीन्य दाखवितां येत नाहीं. शिवाजी अक्षरशून्य होता येथपासून सुरुवात करून, (२) त्यानें दरोडे, (३) लुटारूपणा, (४) खून वगैरे अनुचित पापें केलीं असे सांगण्याचा इंग्रज लेखकांचा मुख्य रोख आहे. पैकीं पहिला आरोप निराधार आहे हे मागें दाखवून दिलें आहे. बाकीचे तीन आरोपहि अज्ञानानें व कुत्सित बुद्धींनें केलेले आहेत हेंहि साधार सिद्ध करतां येतें. शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत कोकणांत कांहीं ठिकाणीं यवनांच्या विरुद्ध लहानसान बंडें झालीं व यवनांच्या बाजूच्या लोकांचीं घरेदारें लुटली गेलीं. ह्या लहानसान बंडांना मुसलमान तवारिखदार दरोडे म्हणून संज्ञा देतात. दरोडे हा शब्द मूळ कोणत्या अर्थी योजिलेला आहे, हे इंग्रज लेखकांना न कळल्यामुळें, या शब्दाचा वाच्यार्थ खरा धरून हे लोक समाधान मानितात. ग्रांट डफनें आपल्या पुस्तकाच्या अकराव्या भागांत कृष्णराव खटावकरांचें एक पत्र टिपेंत दिलें आहे. त्यांत दहा हजार स्वारांच्या सेनापतींना चोर, लुटारू, दरोडेखोर, वगैरे अपशब्द लाविले आहेत. ते ज्याप्रमाणें अज्ञानमूलक आहेत त्याप्रमाणेंच शिवाजीला दरोडेखोर हा अपशब्द लाविणें अज्ञानव्यंजक होय.