Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
ह्या सात दोषांचे शोधन करण्यास खालील तोडगे मीं सांगितले आहेतः-
(१) शक, सन, महिना, तीथ, वार, नक्षत्र, करण, इत्यादि जसजशी जास्त तपशिलवार माहिती दिली असेल तसतशी चिती विश्वसनीयता जास्त धरावीं. हा तोडगा कालापुर्ताच तेवढा प्रमाण आहे.
(२) स्थलांचा किंवा व्यक्तींचा लोप किवा विपर्यास झाला आहे, असा संशय आला असतां, व ह्या दोहोंसंबंधीं निरनिराळ्या बखरींत निरनिराळा मजकूर असल्यास, अमकाच अस्सल मानण्याच्या भरीस पडूं नये. अशा बाबतीत बहिःप्रमाणाचेंच साहाय्य पाहिजे.
(३) बखरी अस्सल प्रमाण नाहींत. परंतु त्यापैकीं काहीं भाग कोठें कोठें अस्सल प्रमाण असूं शकेल. तो तसा कोठें असूं शकेल हें बहिःप्रमाणांच्याच साहाय्यानें समजणार आहे.
(४) बखरींतील प्रत्येक वाक्याचें कोठें ना कोठें तरी योग्य स्थळ आहे. परंतु कोणत्या विशिष्ट वाक्याचें कोणतें विशिष्ट स्थल असावें हें बहिःप्रमाणांच्याच साहाय्यानें ठरणार आहे.
(५) कित्येक बखरींत सबंद प्रसंगाचा लोप झालेला आहे हें मुसलमानी तवारिखाशी ताडून पाहतां समजून येईल. मुसलमानी तवारिखांत जो प्रसंग जास्त दिला असेल त्याला मराठी किंवा मुसलमानी अस्सल पत्राचा आधार असल्याशिवाय तो खरा धरून चालू नये.
(६) परमार्थानें लिहिलेल्या अस्सल पत्रांतील सर्व मजकूर व महजरांतील बहुतेक सर्व मजकूर प्रमाण समजावा.
(७) ग्रांट डफचा इतिहास बहुत ठिकाणीं अप्रमाण आहे. त्याचीहि तोडजोड बखरींच्या प्रमाणेंच कमजास्त प्रमाणानें करावी. अस्सल पत्रांच्या आधारानें जेवढा मजकूर किंवा मजकुराचा भाग लिहिला असेल तेवढा खरा मनावा.
(८) समर्थांचा दासबोध व तुकारामाचें अभंग पूर्णपणें प्रमाण आहेत.
(९) पोवाडे बखरीपेक्षां जास्त प्रमाण आहेत.
(१०) रामदासस्वामींची बखर व इतर बखरींहून क्वचित् स्थळीं जास्त प्रमाण आहे.
(११) महाराष्ट्राचें भूज्ञान हें बहिःप्रमाणांचेंच एक अंग ओहे.
(१२) बखरीचें बहुमत किंवा एकमत प्रमाण नाहीं.
(१३) तोंडी पुरावा प्रमाण नाहीं.
(१४) सुरत येथील व्यापा-यांचे लेख प्रमाण नाहींत; त्यांना वळा बातमी मिळत नसे म्हणून व जी बातमी मिळत असे ती सदा खरींच असे, असें नसे म्हणून, तपशिलाचे संबंधी येथें विचार कर्तव्य आहे हें ध्यानात धरलें पाहिजे.
(१५) गोवें येथील पोर्तुगीज सरकारच्या दप्तरांतील लेख इंग्रज व्यापा-यांच्या लेखांपेक्षां जास्त विश्वसनीय समजावें. कारण, सुरतेंतील इंग्रजांपेक्षा गोवें येथील त्या वेळचे अधिकारी जास्त सुशिक्षित व व्यवस्थित होते.
(१६) भूषणकवीच्या काव्यांतील उल्लेख बहुतेक अस्सल प्रमाण समजावे.
(१७) संभाव्यतेचें प्रमाण इतिहासाचें शोधन करण्याच्या कामीं बहुतेक अगदीं निरुपयोगी आहे. ऐतिहासिक संभाव्यता दोन प्रकारची असूं शकेलः-
(१) एक ऐतिहासिक प्रसंगाची व (२) दुसरी ऐतिहासिक प्रसंगाच्या तपशिलाची. अमूक एक प्रसंग शिवाजीच्या हातून किंवा हयातीत किंवा आसपास होणें संभाव्य आहे किंवा नाहीं, ह्या प्रकारचा प्रश्न उद्भवला असतां संभाव्यतेच्या प्रमाणानें तो प्रसंग संभाव्य आहे किंवा नाहीं हें सांगता येईल. परंतु तो प्रसंग साक्षात् घडला किंवा नाहीं हें सांगता येणार नाहीं. प्रसंगाच्या तपशिलासंबंधीं प्रश्न उद्भवला असतां अमुक व्यक्ति, अमुक स्थळीं व अमक्या कालीं अमुक त-हेनें, वागल्या किंवा नाहीं हें सांगणे संभाव्यतेच्या प्रमाणानें होणार नाहीं. हा तपशील निश्चयानें सांगण्यास अस्सल पत्रांचेच प्रमाण पाहिजे.
(१८) पूर्वग्रहानें आविष्ट होऊन, किंवा मनोदेवतेचें प्राबल्य होऊन पूर्वीचे दोष झांकण्याकरितां, किंवा राष्ट्रीय अभिरुचीला पसंत पडावें ह्या इच्छेनें, किंवा परकीय लोकांच्या मताला मान देण्याच्या खोडीनें, ऐतिहासिक प्रामाण्याची कसोटी दूषित होण्याचा संभव असतो. ही कसोटी जितकी शुद्ध ठेवितां येईल तितका ऐतिहासिक सत्यतेचा उद्रम जास्त होईल.