Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शंकास्थान पाचवें.
शिवाजीखेरीज इतर कोणत्याहि व्यक्तीचे स्वभाववर्णन बखरकारांनी केलेले आढळत नाहीं. व्यवस्थित विभाग व योग्य वर्गीकरण करून लिहिण्याचें वळण बखरकारांस नसल्यामुळें त्यांच्या ग्रंथांत असल्या स्वतंत्र सदराची अपेक्षा करणें अप्रस्तुत आहे. आतां यद्यपि शिवाजीच्या स्वभाववर्णनांचें स्वतंत्र सदर ह्या बखरकारांनीं दिलेलें नाहीं, तत्रापि त्यांच्या ग्रंथांतून शिवाजीच्या स्वभाव वर्णनाचे व कर्तृत्चवर्णनाचे चुटके वेळोवेळी आढळून येण्यासारखे आहेत. हे सर्व चुटके एकत्र केले असतां शिवाजीचा स्वभाव व त्याचें कर्तृत्व ह्यांची इयत्ता थोडीबहुत ठरवितां येण्याजोगी आहे. बखरकार, पोवाडे रचणारे शाहीर व इतर ग्रंथकार ह्या सर्वांचे लेख व उल्लेख लक्षांत घेतले तर ह्या महात्म्याच्या स्वभावाची व कर्तृत्वाचीं निरनिराळीं अंगें नानाप्रकारांनी दृष्टोत्पत्तीस येतात. (१) बालपण, (२) तारुण्य, (३) प्रौढपण, (४) अंतकाळ, (१) मित्रवात्सल्य, (६) मातृप्रेम, (७) पितृप्रेम, (८) बंधुप्रेम, (९) स्त्रीप्रेम, (१०) पुत्रप्रेम, (११) देशप्रीति, (१२) धर्मश्रद्धा, (१३) गुरुभक्ति, (१४) धर्मसंस्थापनार्थ उद्योग, (१५) महाराष्ट्रधर्मपालना, (१६) विद्याव्यासंग, (१७) कवित्वशक्ति, (१८) शूरसंभावना, (१९) विद्वत्संभावना, (२०) सभ्यता, (२१) वीरश्री, (२२) साहस, (२३) श्रमसहिष्णुता, (२४) कार्यबाहुल्य, (२५) शिष्टाई, (२६) राजकारणधुरंधरता, (२७) कानूनसाक्षी, (२८) नीति, (२९) औदार्य, (३०) गुणग्रहिता, (३१) समयसूचकता, (३२) नम्रता, (३३) औद्धत्य, (३४) ऐश्वर्य, (३५) सेनानीत्व, वगैरे शिवाजीच्या शेंकडों गुणांचे दाखले थोडेफार बखरींतून व इतरत्र सांपडतात. ह्या दाखल्यांवरून शिवाजीच्या आंगीं असलेल्या गुणगणांचा अंदाज अंशतः होण्यासारखा आहे. (१) रामदासासारख्यांशीं नम्रत्व, (२) अवरंगझेबासारख्यांशीं औद्धत्य, (३) तानाजी मालुस-यांसारख्यांशीं स्नेह, (४) श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या देवालयांत दाखविलेलें साहस, (५) वर्षोनवर्षें चारी ऋतूंत सारखें सुरू असलेलें उद्योगपरायणत्व, वगैरे गुणांचें सोदाहरण निरूपण करण्याचें हें स्थल नसल्यामुळें केवळ दिग्दर्शनावरच येथें समाधान मानून राहिलें पाहिजे. बैठ्या खेळांपैकीं सोंगट्यांचा गडबड्या, धांदल्या, व ठोकाठोकीचा खेळ शिवाजी कधीं कधीं खेळत असे. (तानाजी मालुस-याचा पोवाडा), पंताजी काका, तानाजी मालुसरे, वगैरे घरोब्यांतील मंडळींशीं थट्टामस्करी शिवाजी कधीं कधीं करीत असे (तानाजीचा पोवाडा); अफजलखानाला बत्तीस दातांचा बोकड, व अवरंगझेबाला सैतान व शिखानष्ट, अशीं उपपदें द्वेषजन्य थट्टेनें व तिरस्कारानें नवीन बनविण्याची कला शिवाजीला माहीत होती; राजाराम पालथा जन्मला असतां तो अपशकुन शुभशकुन आहे असें ठरविण्याची समयसूचकता शिवाजीच्या आंगीं होती, वगैरे नाजूक व मासलेवाईक चुटके बखरकारांनीं अधूनमधून दिले आहेत. ह्या सर्वांचा संग्रह भावी इतिहासकाराला बखरकारांच्या लेखांतून आयता तयार असलेला मिळणार आहे. आतां ह्या लहानसहान गोष्टी बखरकार मोठ्या महत्त्वाच्या मानीत नाहींत हें खरें व वाजवी आहे. बखरकारांचा मुख्य कटाक्ष शिवाजी शंकराचा अवतार होता; व धर्मसंस्थापना हें शिवाजीचें मुख्य कार्य होतें, वगैरे महत्त्वाचे मुद्दे सांगण्याकडे विशेष आहे व तो यथायोग्य आहे. शिवाजी ईश्वरांश होता ह्या मुद्यावर विशेष कटाक्ष असल्यामुळें, शिवाजीची तुलना बखरकार समकालीन किंवा दोनचारशें वर्षांअलीकडच्या सामान्य राजांशी करीत नाहींत. रघू, दिलीप, धर्म, शिबी, श्रियाळ, विक्रम, शालिवाहन, भोज, नैषध, कर्ण, अर्जुन वगैरे असामान्य पौराणिक राजांचीं नांवें शिवाजींच्या बरोबर घ्यावीं असा बखरकारांचा रोख आहे. हा किती वास्तव आहे, ह्याचें प्रत्यंतर आधुनिक लेखकांच्या लिहिण्यांत अत्युत्कृष्ट रीतीनें भासमान होतें. बखरकार ज्याप्रमाणें शिवाजीची तुलना लोकोत्तर अशा पौराणिक राजांशीं करतात, त्याप्रमाणेंच आधुनिक महाराष्ट्रलेखक त्याची तुलना युरोपांतील प्राचीन व अर्वाचीन अशा लोकोत्तर वीरांशीं करतात. अलेक्झांडर, सीझर, नोपोलियन, शार्लमान्य, क्रामवेल, वाशिंग्टन, इत्यादि पाश्चात्य महापुरुषांचीं नांवे शिवाजीच्या संबंधानें सुचविलेलीं वारंवार वाचण्यांत येतात. शिवाजींचें कर्तृत्व व महत्त्व लक्षांत घेतलें असतां ह्या पाश्चात्य पुरुषांना शिवाजीच्या बरोबरीने गणणें सामान्य धरसोडीच्या लेखांत अश्लाघ्य होईल असें नाहीं. परंतु परीक्षात्मक ऐतिहासिक लेखांत साधार अशा पायावरच तुलना झाली असतां खपली जाते. सबब प्रस्तुत प्रसंगाच्या संबंधानें ह्या विधानाची सत्यता सिद्ध करण्याकरितां, शिवाजीच्या स्वभावाचे व कर्तृत्वाचें मोजमाप घेणें जरूर आहे.