Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

सतराव्या शतकांत मुसलमान लोक मराठ्यांना चोर, दरोडेखोर हे अपशब्द द्वेषानें चरफडून लावीत असत. हा असला पोरकट व भागूबाईपणाचा प्रकार युरोपांतील इतिहासांतहि कित्येक ठिकाणीं झालेला दृष्टीस येतो. स्पेनच्या दुस-या फिलिपाच्या विरुद्ध डच लोकांनी बंड केलें व त्यांत ते विजयी झाले. बंड होत असतांना डच लोकांना स्पॅनिश लोकांनीं thieves, robbers, चोर, दरोडेखोर हे अपशब्द लाविले. तोच प्रकार महाराष्ट्रांत झाला. डच robbers नीं स्पॅनिश लोकांची जशी खोड मोडली त्याप्रमाणेंच महाराष्ट्रांतील दराडेखोरांनीं मुसलमानांचीं नाकें कापून त्यांच्या हातांत दिलीं. ह्या अपमानानें चिरडीस जाऊन मुसलमान लोक मराठ्यांना व शिवाजीला दरोडेखोर म्हणत तें योग्यच होतें. परंतु इंग्रज लोकांनीं मुसलमान लोकांच्या लिहिण्याचा वाच्यार्थच तेवढा घेऊन कां मानावें तें समजत नाहीं. सदर लेखकांनी समर्थांचा दासबोध पाहिला असतां तर खरें दरोडेखोर व बंडवाले कोण होते तें त्यांना कळून चुकलें असतें. शिवाजीराजाला नीतीचा उपदेश करतांना समर्थ म्हणतात “प्रस्तुत यवनांचें बंड” झालेलें आहे. तसेंच यवनांच्या शिव-या स्वभावाला अनुलक्षून समर्थ लिहितात, “दुष्ट भाषणें करिती नाना परी जाचती, रघुपतीसी नावडती, म्हणूनी (तुमची) योजना केली.” असो. दरोडेखोर या शब्दाची ही अशी मीमांसा आहे. लूट व वध या शब्दांचीहि मीमांसा याहून निराळी नाहीं. “मोठ्या प्रमाणावर मालमत्ता फरारी करणें” असा, लुटणें ह्या शब्दाचा अर्थ ग्रांट डफादि मंडळी करतात. परंतु सतराव्या व आठराव्या शतकांतील बखरकारांच्या ग्रंथांत, लुटणें ह्या शब्दाचा अर्थ फारच निराळा आहे “लढाई देऊन शत्रूची मालमत्ता राजरोस रीतीनें व हक्कानें नेणें,” असा लुटणें ह्या शब्दाचा अर्थ बखरकार समजतात. प्रस्तुत ग्रंथांत छापलेल्या “पेशवाईच्या अखेरच्या अखबारींत” लुटणें हा शब्द इंग्रजांच्या संबंधानें वारंवार योजिलेला आहे. तेथें जो लुटणें ह्या शब्दाचा अर्थ करणें जरूर आहे तोच अर्थ शिवाजीच्या बखरींतील लुटणें ह्या शब्दाचा केला पाहिजे. दुसरा अर्थ करणें अशास्त्र आहे. शिवाजीनें सुरत लुटली म्हणजे शिवाजीनें शत्रूच्या प्रांतांवर स्वारी करून त्याची मालमत्ता लढाईच्या हक्कानें नेली, असा अर्थ करावा लागतो. शिवाजीनें सुरत लुटली म्हणजे शिवाजीनें सुरतेवर दरवडा घातला असा अर्थ मराठी भाषा ज्यांस समजत नाहीं त्यांखेरीज इतर कोणी करणार नाहीं. लूट ह्या शब्दाप्रमाणेंच वध या शब्दाचाहि अर्थ ह्या लेखकांस नीट समजला नाहीं. आपल्या इतिहासाच्या नवव्या भागाच्या शेवटीं शिवाजीच्या कृत्यांची व स्वभावाची मीमांसा करतांना Afzool Khan was murdered असा वाक्यांश लिहून ग्रांट डफनें शिवाजीवर खुनाचा चोरून प्रहार केला आहे. लक्ष्मणराव चिपळोणकर ह्यांनीं आपल्या इतिहासांत ग्रांट डफच्या इतर आक्षेपांना मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अफजलखानाची प्रकरणाची मुख्य हकीकत देण्यांत डफप्रमाणें चिपळोणकरहि चुकले असल्यामुळें त्यांच्या उत्तरांत जितका जोर यावा तितका आला नाहीं. तशांत त्यांच्या लक्षांतून वर नमूद केलेला वाक्यांशा चुकून राहिल्यामुळें ग्रांट डफ त्यांच्या कैचींतून अजिबात सुटून गेला आहे. “अफजलखान शिवाजीला मोकळ्या मनानें शिष्टाचाराप्रमाणें जों भेट देतो तों शिवाजीनें त्याच्या पोटांत वाघनख खुपसलें” असें वर्णन डफनें आपल्या इतिहासाच्या चवथ्या भागांत केलें आहे. “इतुकया उपरि अबदुल मनीं खवळला पुरा । कव मारिली अबदुल्यानें । सरजा गवसून धरला सारा । चालविली कट्यार” ही हकीकत अगीनदासानें पोंवाड्यांत दिली आहे. अफजलखानाचा पोवाडा बहुतेक पूर्णपणें विश्वसनीय असल्यामुळें त्यांत दिलेली हकीकत खरी मानणें प्राप्त आहे. अफजलखानानें प्रथम कट्यार चालविली, तेव्हां शिवाजीनें स्वसंरक्षणार्थ खानाच्या पोटात बिचवा खुपसला, अशी खरी कार्यपरंपरा आहे ह्या स्वसंरक्षणाच्या कृत्याला बखरकार वध ही संज्ञा देतात. ग्रांट डफनें योजिलेला murder हा शब्द वध ह्या शब्दाहून अर्थानें निराळा आहे. वध म्हणजे righteous killing व murder म्हणजे unrighteous killing. अफजलखान प्रकरणाची खरी हकीकत माहीत नसल्यामुळें, बखरकारांनीं अफजलखानाच्या वधासंबंधानें शिवाजीची जी तारीफ केली आहे तिचाहि ग्रांट डफनें विपरीतच अर्थ केला आहे. “राजकीय कारणाकरितां खून करणें न्याय्य आहे असे मराठे लोक समजतात.” म्हणून डफने मराठ्यांची विनाकारण निंदा केलेली आहे. ती किती अवास्तव व कोत्या बुद्धीची किंवा कुबुद्धीची दर्शक आहे हें वरील उदघाटन वाचून सहज ध्यानांत येण्यासारखें आहे.