Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
उपसंहर.
काल, स्थल, व्यक्ति व सामान्य सिद्धान्त ह्यासंबंधी बखरींची परीक्षा मागील पांच शंकास्थानात झाली. परीक्षेकरितां घेतलेल्या बखरींपैकी (१) सभासदी बखर, (२) सप्तप्रकरणात्मक चरित्र व (३) शिवदिग्विजय ह्या तीन बखरींना विशेष प्राधान्य दिलें होतें. यद्यपि सभासदी बखर समकालीन लेखकानें लिहिलेली आहे तत्रापि तींतील शके १५८१ पर्यंतची हकीकत धरसोडीची, त्रोटक, तुटक व कालविपर्यस्त अशी असून, पुढील हकीकत यद्यपि कोठेंकोंठे जास्त विस्तृत आहे तत्रापि रसभरित नसून प्रायः कोरडी अशी आहे. माफक व त्रोटक उत्तर देणा-या साक्षीदारापासून खटल्यांतील उपांगाची जशी माहिती होणें अशक्य असतें तद्वतच सभासदी बखरीची गोष्ट आहे. सप्तप्रकरणात्मकचरित्र व शिवदिग्विजय या दोन बखरींचा प्रकार सभासदी बखरीहून निराळा आहे. साक्ष देतांना अवांतरहि मागली पुढली माहिती वावदूकपणें सांगण्याची खोड ह्या दोन बखरकारांना कमजास्त प्रमाणानें आहे. शिवाय साक्ष देतांना, एखाद्या जुनाट गृहस्थाप्रमाणें, ह्या दोन्ही बखरींना जुने दाखले देण्याची हौस आहे. ही हौस सप्तप्रकरणात्मक चरित्राच्या कर्त्यापेक्षां शिवदिग्विजयाच्या कर्त्याला विशेष जडलेली आहे. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें (१) युगसंख्येची याद, (२) हस्तनापूरच्या राजांची याद, (३) हेमाडपंथी बखर, (४) विष्णुपुराण, (५) संगीत शास्त्र, (६) मुसलमानांच्या तवारिखा, (७) हंसगीता, (८) दासबोध, (९) रामदासाची बखर, (१०) शिवाजीचीं पत्रें, (११) सुभाषित श्लोक, (१२) वृद्धांच्या तोडची परंपरागत माहिती, (१३) कहाण्या, (१४) शिवाजीच्या वेळचीं जुनीं टिपणें, इतक्या निरनिराळ्या उगमांपासून आपली माहिती जुळविलेली आहे व ती प्रायः वाटेल तितकी, जशाच्या तशीच दिली आहे! ह्याच कारणाकरितां शिवदिग्विजयांतील मजूकर सर्वांत जुना आहे असें मागें मीं म्हटलें आहे. सप्तप्रकरणात्मकचरित्रांतहि शिवदिग्विजयांतल्याप्रमाणें जुन्या माहितीचा उपयोग केल्याचीं बरींच चिन्हें आहेत, परंतु विशेष प्रौढपणें लिहिण्याचा मल्हाररामरावाचा मनोदय असल्यामुळें, शिवदिग्विजयाच्या इतका वावदूकपणा त्याला करतां आला नाहीं. कृष्णाजी अनंत सभासद, मल्हाररामराव, शिवदिग्विजयाचा कर्ता हे तिन्ही गृहस्थ महाराष्ट्रांतील प्रख्यात अशा चांद्रसेनीय प्रभुज्ञातींतील आहेत. ह्या गृहस्थांच्या पूर्वजांनीं व स्वजातीयांनीं स्वराज्य स्थापण्याच्या कामीं शिवछत्रपतीची सेवा करून आपला क्षात्रधर्म जसा खरा करून दाखविला, त्याप्रमाणेंच ह्या तिन्हीं गृहस्थानीं व त्यांच्या इतर स्वजातीयांनीं शिवछत्रपतीची, त्यांच्या वंशजांची व त्यांच्या देशबांधवांचीं चरित्रें लिहून आपला कायस्थ धर्महि कायम ठेविला. लेखणी व तरवार ह्या तीक्ष्ण प्रकृतीच्या जोडीला सारख्याच सामर्थ्यानें वागविणा-या ह्या राजकार्यकुशल ज्ञातीचें महाराष्ट्र बरेच ऋणी आहे. ह्या प्रभूलेखकांनी शिवाजीचे इतिहास कसे कां असेनात, लिहून ठेविले नसते तर आज मित्तीला महाराष्ट्रराज्याच्या संस्थापकाची माहिती आपल्याजवळ फार कोती राहिली असती; ह्या तीन बखरकारांखेरीज गोविंद खंडेराव चिटणीस ह्यानेंहि एक शिवाजीची बखर लिहिलेली आहे व तिचा उल्लेख ह्या प्रस्तावनेच्या आरंभीं मी केला आहे. ही बखर साता-यांतील एका गृहस्थाकडून मला कांहीं वेळ वाचावयास मिळाली होती. परंतु पुढे काय कारण झालें असेल तें असो, सदर बखर हरवली असें तिच्या मालकाकडून मला उत्तर मिळालें वर दिलेल्या तिन्हीं बखरींपेक्षां ह्या बखरींतील मजकूर ब-याच ठिकाणीं जास्त व निराळा असून शिवदिग्विजयाहून ती मोठी आहे. प्रस्तावनेला प्रारंभ करतांना ही बखर मजजवळ होती व हिचीहि परीक्षा करावी ह्या हेतूनें प्रस्तुत प्रस्तावनेच्या प्रारंभीं मीं तिचा नामनिर्देश केला होता. परंतु पुढें ऐन प्रसंगीं ही बखर हातांतून गेल्यामुळें पहिल्या नामनिर्देशापलीकडे तिच्या संबंधीं मला कांही एक जास्तकमी लिहितां येईना. असो. सवाई माधवरावांकरितां लिहिलेल्या बखरीच्या अनुषंगानें शिवकालीन बखरींची परीक्षा करण्याचा प्रसंग आला व त्या परीक्षेंत बखरीच्या प्रामाण्याची इयत्ता ठरविण्याचा थोडाबहुत प्रयत्न केला. हा प्रयत्न जितक्या प्रमाणावर व्हावा, तितक्या प्रमाणावर विस्तारभयास्तव करतां आला नाहीं.