Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
चंद्ररावाचाचें पुत्र बाजीराव व कृष्णराव ह्यांस पुण्यांत दक्षिणेकडील निमजग्यांत आणून ठेविलें म्हणून हे दोघे बखरकार सांगतात. ही तपशीलवार माहिती मुख्य हकीकतीला विशेष पोषक नसून जातां जातां सहजासहजीं लिहून ठेविलेली आहे. तेव्हां ती ह्या बखरकारांनीं कोणत्या तरी एका जुन्या बाडांतून घेतली असावी असा अंदाज होतो. ह्या दोघां बखरकारांनीं बाकीची जी ह्या प्रसंगाची हकीकत दिली आहे ती परस्परविरोधी व विसंगत आहे. इतरहि बखरकारांचें एकाचें म्हणणें एकाला जुळत नाहीं. तेव्हां आतां प्रश्न असा उद्भवतो कीं, ह्या प्रसंगाची खरी हकीकत काय असावी व ग्रांट डफनें जी हकीकत दिली आहे ती कोणत्या आधारावर दिली असावी? ह्या प्रश्नाला, माझ्या मतें उत्तर असें पडतें कीं, ह्या प्रसंगाची खरी हकीकत उपलब्ध बखरींतून निश्चयात्मक अमकीच असेल असें सांगणे कठीण आहे व ग्रांट डफनें जी दिली आहे ती निराधार असून बखरींच्या इतकीच विश्वसनीय आहे. अस्सल पत्रें व हकीकती पुढें आल्यावांचून अमक्या बखरींतील मजकूर खरा व अमकींतील खोटा, असें निश्चयानें कांहींच सांगता येत नाही तात्पर्य, ह्या प्रसंगाची खरी हकीकत सजविण्यास निवळ बखरींचा व तवारिखांचा कांही उपयोग होईल असें वाटत नाहीं. शके १५७७ त केव्हां तरी शिवाजीनें मो-यांस जिंकिलें, चंद्रराव कोणत्या तरी कारणाने मेला, त्याचे पुत्र पुण्यांत निमजग्यांत कैदेंत होते, राघो बल्लाळ व संभाजी कावजी ह्या मोहिमेंत प्रमुख होते, हें मो-यांचे प्रकरण निदान चार महिने तरी चाललें होतें, व तें शके १५७७ च्या पावसाळ्याखेरीज कोणत्या तरी ऋतूंत घडून आलें, ह्या पलीकडे जास्त गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा नाहीं. सारांश, अस्सल आधार कांहीं तरी असल्याशिवाय ह्या बखरींतील तपशिलावर विशेष विश्वास ठेवून चालणें उपयोगाचें नाही.
(३) तपशिलासंबंधानें तिसरे प्रकरण अफजलखानाच्या पराभवाचें आहे. अफजलखानाच्या पराभवाचा वृत्तांत सर्व बखरींतून दिलेला आहे. शिवाय आक्वर्थ व शाळिग्राम ह्यांनीं छापिलेल्या पोवाड्यांतहि ह्या प्रसंगाचें वर्णन आहे. खानमजकुराच्या पराभवाचा इतिहास त्या वेळीं व पुढेंहि सर्व पृथ्वींत महशूर झाल्यामुळे व तो प्रसंगहि अघटित असल्यामुळें त्याचे वर्णन सर्व बखरींतून व पोवाड्यांतून विशेष खुलाशानें दिलेलें असतें, व तें इतर वृत्तांतापेक्षां जास्त विश्वसनीय दिसतें. अफजलखानाचा वध शके १५८१ विकारीनाम संवत्सरी मार्गशीर्ष शुद्ध ५ भृगुवारीं झाला असें मल्हार रामराव सांगतो. “शुद्ध १३ स अफदुलखानाचा सरंजाम आणिला” म्हणून शिवदिग्विजयकार लिहितो, त्यावरून मल्हाररामरावाची अफजलखानाच्या वधाची मित्ती खरी ठरते. आतां शंका अशी येते कीं, ज्या मुसलमान सरदारास शिवाजीनें शके १५८१ च्या मार्गशीर्षांत मारिलें त्याचें नांव अफजलखान कीं अफजुलखान कीं अबदुलाखान, कीं अबदुलखान? पोवाड्यांत व शिवदिग्विजयांत ह्या सरदाराला अबदुलखान म्हणून म्हटलें आहे, मल्हार रामराव त्याला अफजलखान म्हणून म्हणतो; व ग्रांट डफ अफझुलखान असें लिहितो. खरें नांव काय असावें तें ठरविण्यास त्या वेळच्या अस्सल पत्रांखेरीज सोय नाहीं. वांई येथील चित्राव यांच्या दप्तरांतील अफलजखानाचे ११ हुकुमनामे मजजवळ आहेत. त्यांत त्याचें नांव अफलजखान असें लिहिलेलें आहे. पैकीं एका हुकुमनाम्याचा शिरोभाग येथें देतों :-
अज् रफ्तखाने खोदायवंद खाने अलीशान खाने अफजलखान
महमदशाही खुलीदयाम दौलतहू बजाने व कारकुनानी हालवा
इस्तकबल वा देशमुखने प।। वाई बिदानंद. सु।। सन खमसैन
अलफ. दरींविले.............................
तेरीख १८ जमादिलाखर.