Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

ह्या उता-यावरून एवढें खास आहे कीं, शिवाजीनें मारिलेल्या सरदाराचें खरें नांव अफजलखान होतें. हा अफजलखान विजापूरच्या महमद आदिलशहाचा दासीपुत्र असावा, असें वरील उता-यांतील “महमदशाही” ह्या पदावरून वाटतें याची आई भटारीण असावी, असें अफजलखानाच्या पोवाड्याच्या २९ व्या कडव्यांतील “तूं तर भटारनीका छोरा” ह्या ओळीवरून व चित्रगुप्ताच्या “भटारीच्या पोरा परम कपटीया” ह्या ओळीवरून (चित्रगुप्त पृष्ठ २७) स्पष्ट दिसतें. मजजवळील अफजलखानाच्या ११ हुकुमनाम्यांपैकीं अगदीं अलीकडला हुकुमनामा मार्गशीर्ष शु॥ १५ शके १५८० चा आहे व अगदीं पलीकडला शके १५७१ तील वैशाख व॥ ३ चा आहे. मिळालेल्या लेखांवरून, व तेवढ्याच पुरतें, असें म्हणावें लागतें कीं, रणदुल्लाखान शके १५७१ च्या चैत्राच्या आधीं वारल्यावर वांईची सुभेदारी अफजलखानास मिळाली. ती सुभेदारी शके १५८० च्या मार्गशीर्षापर्यंत व, अर्थात् वध होईपर्यंत त्याजकडेसच होती. शके १५८० च्या मार्गशीर्षाच्या सुमारास शिवाजीनें रेटल्यामुळें अफजलखान विजापुरास तक्रार करण्यास गेला, तो सैन्य घेऊन शके १५८१ च्या आश्विनांत शिवाजीवर स्वारी करण्यास सिद्ध झाला. बखरींतून अफजलखानाला वजीर म्हटलें आहे तें अर्थात्, अविश्वसनीय दिसतें. वजिरी करण्यास शके १५७१ पासून शके १५८१ पर्यंत अफजलखान सतत विजापुरी कधींच नव्हता. विजापूर, तुळजापूर, माणकेश्वर, करकमभोसें, शंभू महादेव, रहितमतपूर, वांई, रडतोंडी, प्रतापगड अशा टप्प्यांनीं अफजलखान प्रतापगडापर्यंत गेला. वांईस आल्यावर वांईचा कुळकरणी कृष्णाजी भास्कर म्हणून होता त्याला त्यानें शिवाजीकडे पाठविले. सध्यांच्या वांईच्या कुळकर्ण्याचा कृष्णाजी भास्कर हा पूर्वज होय. अफजलखान वाईस सुभेदार असल्यामुळें कृष्णाजी भास्कर कुळकर्ण्याचा व अफजलखानाचा परिचय विशेष होता हें उघड आहे. कृष्णाजी भास्कर शिवाजीकडे गेल्यावर पंताजी गोपीनाथ यास शिवाजीनें अफजलखानाकडे पाठविलें. पंताजी गोपीनाथ हा शिवाजीच्या पदरचा कारकून होता. सातारा येथील बहिरोपंत पिंगळे यांच्या कुळकर्णाच्या दप्तरांत पंताजी गोपीनाथ सरसुभेदार हें नांव एका हुकुमनाम्यावर आहे. हा हुकुमनामा यद्यपि शके १५८१ नंतरचा आहे, तत्रापि पंताजी गोपीनाथ शिवाजीच्या पदरचा होता हें खास आहे. कृष्णाजी भास्कराच्या निरोपावरून व पंताजी गोपीनाथाच्या शिष्टाईवरून अफजल प्रतापगडास गेला व तेथें कृतकर्माचा झाडा देतां झाला. येणेंप्रमाणें अफझलखानी प्रकरणाचा खरा इतिहास आहे. सभासदी बखरींतील व मल्हाररामरावाच्या चरित्रांतील आशय मी म्हणतों असाच आहे. पवाड्यांतीलहि हकीकत बहुतेक माझ्या म्हणण्याला पोषकच आहे. अस्सल कागदपत्रांचा उपयोग करतां आला नसतां, तर हा खरा इतिहास देतां आला नसता. नुसत्या बखरींतील तपशिलावर इमारत रचण्याचा प्रयत्न करण्यास गेलें असतां रा. कार्कारियाप्रमाणें व्यर्थ जलताडन करीत बसण्याचें श्रेय मात्र पदरीं येतें. मी दिलेल्या वरील वृत्तांतावरून कोणत्या बखरींतील मजकूर खरा आहे, व कोणत्या बखरींतील खोटा आहे, हें सहज समजण्यासारखें आहे.

तपशिलाच्या विश्वसनीयत्वासंबंधानें मला जें कांहीं दाखवून द्यावयाचें होतें, तें वर स्पष्ट झालें आहे. अनुक्रमासंबंधानें विचार दुस-या शंकास्थानांत केलाच आहे. त्यावरून अस्सल कागदपत्रांच्या कसोटीखेरीज कोणत्याहि बखरींतील मजकूर खरा धरून चालूं नये असा सिद्धांत ठरतो. अस्सल पत्रांच्या साहाय्याखेरीज वादविवाद करणें अगदींच निरुपयोगी आहे असेंच केवळ माझें म्हणणें नाहीं; वादविवादानें तपशिलांतील शंकास्थानें कोणतीं व अस्सल पत्रें कोणत्या मुद्यावर हवींत, ह्याचा उलगडा होण्यासारखा असतो. तेव्हां तो तर हवाच आहे. परंतु मुख्य धोरण अस्सल पत्रें शोधून काढण्याकडे असलें पाहिजे. त्यावांचून इतिहासाची फोड यथास्थित व मनाजोगती कदापि होणें नाहीं. येणेंप्रमाणें बखरींतील मजकुराच्या कालानुक्रमासंबंधानें व तपशिलासंबंधानें शंका काय येतात त्यांचें निरुपण झालें. (१) सभासद बखर, (२) चित्रगुप्ताची बखर, (३) चिटणीसांची बखर, (४) शिवदिग्विजय, (५) शिवप्रताप, (६) रायरी येथील बखर व (७) दलपतरायाची बखर, अशा सात बखरी परीक्षणार्थ निवडल्या होत्या. पैकीं सभासदी बखर, चिटणीसांची बखर, व शिवदिग्विजय ह्मा बखरींनाच विशेष महत्त्व देणें भाग पडलें.