Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

तेव्हां मुसलमानी तवारिखांच्या प्रत्यंतर पुराव्यानें बखरींतील अमुक मजकूर खरा आहे असें विधान करणेंहि धोक्याचेंच आहे. तात्पर्य, व्यक्तिशः समुच्चयानें, बहुमतानें किंवा तवारिखांच्या पुराव्यानें देखील बखरींतील मजकुरांचें प्रामाण्य ठरणें कठीण आहे. हे चारहि प्रकारचे पुरावे बखरींतील मजकुराच्या प्रामाण्याला जर लागू पडत नाहींत, तर मग बखरींतील मजकुराचा खरेखोटेपणा ठरवावयाचा तरी कसा, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ह्या प्रश्नाला उत्तर असें आहे की, मराठी, पारशी, कानडी, इंग्रजी व पोर्तुगीज, अस्सल पत्रें त्या कालीं लिहिलेलीं अशी, जर सांपडलीं तरच बखरींतील मजकुराचा खरेखोटेपणा ठरवितां येईल. अन्यथा हें काम मनाजोगतें व निश्चयात्मक होणार नाहीं. अशीं अस्सल पत्रें आजपर्यंत फारच थोडीं उपलब्ध झालीं आहेत. शहाजहानानें व औरंगझेबानें शहाजीस व शिवाजीस पाठविलेलीं पत्रें, सुरत येथील दप्तर, व अवांतर पांच चार पत्रें एवढाच काय तो अस्सल पुरावा आजपर्यंत मिळाला आहे. ह्या अस्सल पुराव्याच्या जोरावर ग्रांट डफनें शिवाजीच्या चरित्रांतील कांहीं प्रसंगांच्या कालाचा व प्रसंगांच्या मजकुराचा निश्चय करून टाकला आहे. बाकीचा बहुतेक सर्व मजकूर बखरींच्या आधारावर व काफीखानाच्या प्रत्यंतर पुराव्यावर भिस्त ठेवून रचिला आहे. शिवाजीच्या मराठी इतिहासकारांना तर हीं अस्सल पत्रेंहि मिळालेलीं नाहींत. त्यांनीं ग्रांट डफवर सर्व भिस्त ठेवून आपला कार्यभाग उरकून घेतला आहे. असो. तेव्हां ह्या कम-अस्सल बखरींच्या मालिकेंत ग्रांट डफला व त्याच्या अनुयायांनाहि गोंवणे जरूर आहे. येणेंप्रमाणें ही अस्सल पत्रें फारच थोडीं असून त्यांचा उपयोग शिवाजीचा व औरंगझेबाचा संबंध दाखविण्यापुरताच असल्यामुळें व नवीन पत्रें अद्याप बाहेर यावयाला अवकाश असल्यामुळें, बखरींतील ब-याच मजकुराच्या सत्यासत्यतेची कसोटी आपल्याजवळ नाहीं. तेव्हां प्रकृत स्थळीं निव्वळ ह्या बखरींतून जेवढें निष्पन्न होईल तेवढ्यावरच निर्वाह करून घेणें भाग आहे. अस्सल पत्रांसारख्या बहिःप्रमाणांच्या अभावीं हीं निष्पति अंतःप्रमाणांवरून थोडीच व्हावी असें वाटतें. बखरींतील मजकुराच्या सत्यासत्यतेचा अंतःप्रमाणांवरून निर्णय करण्यापूर्वी एक मोठे संकट आड येतें. तें हें कीं बखरींत लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा, संदिग्ध शब्दाचा व मित्तीचा शेवटपर्यंत छडा लावीत गेलें पाहिजे. सभासदी बखर, मल्हाररावाची बखर, शिवदिग्विजय व बाकीच्या बखरी, ह्या सर्वांत जेवढा म्हणून मजकूर आला आहे, तेवढा सगळा विचारांत घेतला पाहिजे; त्यांतील एक ओळही सोडून देतां कामा नये. हा सगळा मजकूर विचारांत घेतल्यावर प्रथम कालानुक्रमाप्रमाणें त्या मजकुराचें वर्गीकरण केलें पाहिजे. मुख्य संकट जें येतें तें हें कालानुक्रमवार वर्गीकरण करण्यांतच येतें. वर्गीकरण झाल्यावर त्या त्या प्रसंगासंबंधींच्या मजकुराचे निरनिराळे पाठ, त्यांतील कमजास्त विशेषनामें हीं सर्व पाहून मग त्या प्रसंगासंबंधीचा मजकूर कांहीं एका अंशाने ग्राह्य धरिला पाहिजे. बहिःप्रमाणांच्या अभावीं निव्वळ अंतःप्रमाणांवरून बखरींतील बहुतेक मजकुरावर विश्वास अंशमात्रानेंच ठेवितां येईल, सर्वांशी किंवा बव्हंशी ठेवितां येणार नाहीं. ह्या अल्पांशाने विश्वसनीय मजकुराला बहिःप्रमाणांचा दुजोरा मिळाला म्हणजे त्याजवर पूर्णपणें विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं. असो. शिवाजीच्या लग्रासंबंधी विचार चालला असतांना हा वाद मध्येंच उपस्थित झाला. शिवाजीला [१] सईबाई [२] सोयराबाई [३] पुतळाबाई, वगैरे चार बायका होत्या म्हणून ग्रांट डफ म्हणतो [डफ १३३]. सईबाई, निंबाळकरांची व सोयराबाई शिरक्यांची मुलगी होतीं असें बखरकारांच्या विरुद्ध त्याचें म्हणणें आहे. चवथ्या बायकोचें नाव त्याला माहीत नव्हतें, तें नांव कदाचित् सगुणाबाई असावें [श्रीरामदास स्वामी यांचे चरित्र प्रकरण ५]. शिवाजीस तीन मुख्य स्त्रिया व दोन उपस्त्रिया होत्या असें रामदासाच्या चरित्रावरून दिसते [कित्ता]. सईबाईखेरीज शिवाजीला इतर सहा बायका होत्या म्हणून सभासद म्हणतो [सभादी बखर ५६]. सईबाई निंबाळकरांची कन्या [सभासद बखर ९]. व सोयराबाई मोहित्यांची कन्या [सभासद ५६] होती असें सभासद लिहितो.