Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

इ. स. १६३७ त म्हणजे शके १५५९ त शिवाजीचा सईबाईशीं विवाह झाला हें ग्रांट डफ, मल्हार रामरावाच्या आधारावर लिहितो (मल्हाररावकृत चरित्र पृष्ठ २८). सईबाई शिर्क्याची कन्या होती असें मल्हारराव म्हणतो, तें डफला पसंत नव्हतें. बाकी शिवदिग्विजयात सईबाई शिर्क्यांच्या कुलांतील होती असें पुनः पुनः म्हटलें आहे (शिवदिग्विजय, पृष्ठ ९९, २०५) व मल्हाररावांचेंहि तेंच म्हणणें आहे. ह्यावरून ग्रांट डफ चुकीचा ठरतो. ग्रांट डफला एखादें अस्सल पत्र सांपडले असल्यास ह्या बहुमताचा कांहींच उपयोग नाहीं, हे मला कबूल आहे. परंतु ग्राटडफची बहुतेक माहिती बखरींवरून रचलेली आहे. प्रस्तुत प्रश्नासंबंधींच्या माहितीचा विशिष्ट आधार त्यानें दिला नाहीं, व शिवदिग्विजय हा ग्रंथ त्याला माहीत नव्हता, ह्या गोष्टी लक्षांत घेतल्या असतां माझेच म्हणणें जास्त विश्वसनीय ठरतें. ह्या ठिकाणीं कोणता आधार विश्वसनीय व कोणता आधार अविश्वसनीय ह्याविषयीं वाद उत्पन्न होण्याचा संभव आहे. तेव्हां ऐतिहासिक प्रमाण व अप्रमाण ह्यासंबंधीं माझीं मतें काय आहेत तें स्पष्ट सांगितल्यास पुष्कळ उलगडा होईल असें वाटतें (१) समकालीन व्यक्तींनीं समकालीन प्रसंग साक्षात् घडत असतांना परमार्थानें लिहिलेले किंवा लिहविलेलें अस्सल पत्र किंवा त्याची नक्कल सर्वांशीं जातीनें प्रमाण होय. (२) समकालीन व्यक्तींनीं आपल्या हयातींतील गतकालीन प्रसंगासंबंधीं लिहिलेले लेख किंवा उल्लेख पहिल्या वर्गांतील प्रमाणांच्या प्रतिकूल्याच्या अभावीं जातीनें प्रमाण होत. (३) विषमकालीन व्यक्तींनीं गतकालासंबंधीं लिहिलेले लेख (अ) पंचायतीपुढें प्रामाणिक साक्षीच्या रूपानें दिलेले असल्यास आणि (ब) बखरी म्हणून योग्य आधारानें लिहिले असल्यास, केवळ स्मृतीवर भरंवसा ठेवून लिहिलेले नसल्यास, व आपल्या कामाचें योग्य शिक्षण मिळून लिहिलेले असल्यास जातीनें प्रमाण समजावे. ह्या तीन प्रकारच्या लेखाखेरीज करून बाकी सर्व लेख कमजास्त प्रमाणानें अविश्वसनीय होत. प्रस्तुत ज्यांची परीक्षा चालली आहे त्या बखरी ह्या तिन्ही वर्गांतील कोणत्याहि एका वर्गांत अतूर्भत होत नाहींत. सभासदी बखर केवळ स्मृतीवर हवाला ठेवून लिहिलेली आहे. मल्हार रामरावानें जुन्या टिपणांचा व अस्सल पत्रांचा उपयोग केला आहे. परंतु योग्य शिक्षण त्याला मिळाले नसल्यामुळें याची बखर प्रमाणभूत समजणें योग्य नाहीं. शिवदिग्विजयांत जुन्या टिपणांचा व पत्रांचा उपयोग केलेला दिसतो व मल्हाररामरावांच्या बखरींतल्यापेक्षां ऐकीव व लेखी अशी जुनी माहिती तींत बरीच सापडतें. परंतु कर्त्याला योग्य शिक्षण न मिळाल्यामुळें तिचें प्रामाण्य मल्हार रामरावाच्या बखरीहून जास्त धरतां येत नाहीं. येणेंप्रमाणें ह्या तिन्हीं बखरींचें प्रामाण्य अव्वल प्रतीचें नाहीं; म्हणजे ह्या बखरी जातीनें प्रमाण नाहींत हें उघड आहे. ह्या बखरी जातीनें प्रमाण नाहींत ह्या विधानाची जास्त फोड करून सांगितली पाहिजे. जो लेख जातीनें प्रमाण असेल त्यांतील मजकूर (१) एकाच ऐतिहासिक प्रसंगाला अनुलक्षून असेल किंवा (२) अनेक प्रसंगांच्या संततीला अनुलक्षून असेल. प्रथमपक्षी प्रसंगाचा काल व स्वतः निश्चित झालेला असतो व द्वितीय पक्षींहि प्रसंगसंततीच्या कालाचें पौर्वापर्य व स्वतः प्रसंग निश्चित झालेले असतात. जातीनें प्रमाण जे असतात, त्यांत कालाचें पौर्वापर्य निश्चित असल्यामुळें प्रसंगाची संततीहि निश्चितच असते. हा निश्चितपणा बखरींतील मजकुरासंबंधीं खात्रींनें करतां येत नाहीं, इतकेच नव्हें तर, प्रसंगाचें वर्णनहि जसा तो घडला असेल तसा असेलच असेंहि सांगतां येत नाहीं. दहा पांच वर्षात घडून येणा-या प्रसंगांची गफलत ह्या बखरींत इतकी काहीं केलेली आढळते की, बखरींतील प्रसंगाची संतती व पौर्वापर्य जसें बखरीत नमूद केले असेल तसें हटकून असेलच असा निश्चय नसतो. ह्या बखरी व्यतिशः अविश्वसनीय आहेतच; परंतु समुच्चयानें किंवा बहुमतानेंहि त्यांना विश्वसनीय धरतां येत नाहीं. मराठी बखरींना मुसलमानी तवारिखांची प्रत्यंतरें देऊन मग प्रसंगांचीं निश्चितता खात्रीने सांगतां येईल असाहि भाग नाहीं कां की, मुसलमानी तवारिखा मराठी बखरींच्याहून जास्त विश्वसनीय आहेत असें नाहीं. कारण ह्या तवारिखा मूळ प्रसंग होऊन ब-याच कालानें लिहिलेल्या असून, लेखकाच्या समकालीन व्यक्तीच्या तोंडून मिळविलेल्या माहितीवरून किंवा बखरीवरूनच लिहिल्या गेल्या आहेत.